Untitled 1

अवधूताची बारा लक्षणे आणि अजपा गायत्री

या आठवड्यात दिनांक ११ डिसेंबर २०१९ रोजी श्रीदत्त जयंती साजरी होणार आहे. भगवान दत्तात्रेयांची ओळख ही "देव" म्हणून तर आहेच पण त्याही पेक्षा काकणभर जास्त ती "गुरु" आणि "अवधूत" म्हणून आहे. भारतीय अध्यात्माचा इतिहास अभ्यासला तर या प्रकांड शक्तीच्या अवधूताला सर्वच पंथांच्या आणि परंपरांच्या योगी, साधू, संन्यासी, सिद्ध गणांमध्ये काय मानाचे स्थान होते ते सहज कळण्यासारखे आहे.

भगवान दत्तात्रेयांकडे ज्याचे कर्तुत्व जाते अशा रचनांपैकी एक म्हणजे अवधूत गीता. आता गंमत बघा. भगवत गीता ही कृष्णार्जुन संवादाच्या स्वरूपात विराजमान आहे. भगवत गीतेत "कोण कोणाला म्हणाले" ते अगदी सुस्पष्ट आहे. अर्जुन प्रश्न करतो आणि भगवान श्रीकृष्ण त्याला उत्तरे आणि दिग्दर्शन करतो असा प्रकार त्यामध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जेंव्हा गीता सांगितली तेंव्हा अर्जुन हा नवशिका साधक होता. सर्वसामान्य लोकांना जशी सुख-दु:ख छळतात तशी ती त्यालाही छळत होती. त्यांतून बाहेर पडून यथास्थित कर्माचरण करण्याचा उपदेश श्रीकृष्णाने त्याला दिला. थोडक्यात नवशिका साधक आणि उच्च कोटीचा गुरु यांच्यात जसा संवाद होईत तसाच तो भगवत गीतेत आहे. त्यामुळे भगवत गीतेतील शिकवण ही साधकाच्या कलाकलाने घेणे, समजावणे, सोपे करून सांगणे, पर्याय सुचवणे असे सर्व मार्ग चोखाळताना आपल्याला दिसते. भगवत गीतेत भक्ती आणि भक्तियोग हा महत्वाचा घटक असल्याने ती द्वैताच्या भूमिकेवर विशेष भर देणारी प्रतीत होते.

अवधूत गीता मात्र त्यापेक्षा भिन्न आहे. हा अद्वैत ज्ञानाचा सार ग्रंथ आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अवधूत गीता नवशिक्या साधकांसाठी जरा जड जाणे शक्य आहे. त्यांतील ज्ञान हे एवढ्या प्रगल्भ भूमिकेतून मांडलेले आहे की सर्वसामान्य नुकतीच योगमार्गाची वाटचाल सुरु केलेल्या साधकाला त्या ज्ञानगर्भ उपदेशाचे काहीसे "अपचन" होणे शक्य आहे. त्यांना कदाचित हे ज्ञान रुक्ष आणि काहीसे "बोरिंग" वाटण्याची शक्यता आहे. साधनेच्या आधाराने ज्यांनी काही अंशी तरी विवेक, वैराग्य आणि अनुभूती प्राप्त केलेली आहे त्यांना मात्र हे ज्ञान अमृत वाटेल.

गंमत अशी की मुळात अवधूत गीता हा नक्की कोणामधला संवाद आहे ह्या विषयी ठोस माहिती त्यांत नाही. भगवान दत्तात्रेयांच्या मुखातून हे ज्ञान बाहेर पडलेला आहे असं ग्रंथातच स्पष्ट सांगितलं आहे परंतु सुमारे २९० च्या आसपास श्लोक आणि आठ अध्यायात विराजलेले हे अद्वैत सिद्धांताचे विवरण दत्तात्रेयांनी नक्की कोणाला सांगितले याविषयी स्पष्ट उलगडा होत नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या काही अवधूत गीतेच्या प्रतींमध्ये मला खालील ओळ सापडली.

॥ इति श्रीदत्तात्रेयविरचितं अवधूतगीतायां स्वामिकार्तिक संवादे स्वात्मसंवित्त्युपदेशे मोक्षनिर्णयो नाम षष्ठोऽध्याय : ॥

परंतु सर्वच प्रतींमध्ये ही ओळ नाही. जर वरील ओळ ग्राह्य मानायची ठरवली तर अवधूत गीता ही भगवान दत्तात्रेय आणि "स्वामी कार्तिक" यांतील संवाद आहे असं वाटतं. यांत आलेली स्वामी कार्तिक ही शब्द रचना भगवान शंकराचा पुत्र कार्तिक स्वामीची आठवण करून दिल्याशिवाय रहात नाही. तसं जर असेल तर हा संवाद किती उच्च कोटीचा असला पाहिजे याची कल्पना आपल्याला करता येईल. अर्थात हा "जर तर" चा भाग जरी सोडला तरी त्यांतील ज्ञान हे उच्च कोटीची अवस्था प्रतिपादित करते हे निश्चित.

अवधूत गीतेचा काळ साधारण ९ वे किंवा १० वे शतक असा मानला जातो. ढोबळमानानी हा कालखंड मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ आणि एकूणच नाथ संप्रदायाच्या भरभराटीच्या काळाशी समांतर आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. अवधूत दत्तात्रेयांचे नाथ संप्रदायाशी असलेले अतूट नाते आणि नाथ संप्रदायात अवधूत अवस्थेला असलेले महत्व हे ही लक्षात घेण्यासारखे आहे. या दोन्ही विचारधारांचे शैव विचारधारेशी असलेले जवळचे नाते सुद्धा महत्वाचे आहे. अशी ही अवधूत गीता समस्त योगी जनांना नेहमीच प्रिय वाटत आली आहे हे ओघाने आलेच.

असो. जास्त विषयांतर न करता लेखाच्या मूळ विषयाकडे येतो.

अवधूत गीतेत भगवान दत्तात्रेयांनी अवधूताची बारा लक्षणे सांगितली आहेत. मूळ ग्रंथांत केवळ चार-पाच श्लोकांत ती प्रतिपादित करण्यात आलेली आहेत. इथे मी त्यांची मांडणी अजपा साधनेच्या दृष्टीकोनातून थोड्या वेगळ्या प्रकारे करत आहे. त्याचं कारण असं की ही बारा लक्षणे अतिशय उच्च कोटीची आहेत. ती जर नुसतीच श्लोकार्थ म्हणून वाचली तर कोरडी वाटण्याचा संभव आहे. ज्याप्रमाणे आकाशातील चंद्र एखाद्याला दिसत नसेल तर आपण झाडाची फांदी त्याच्यासमोर धरतो आणि सांगतो - "आता ह्या फांदीच्या वर आकाशात बघ". त्याचप्रमाणे अजपा साधनेच्या अनुषंगाने ह्या बारा लक्षणांकडे पाहिल्यास ती थोडी सुकर वाटतील आणि विषय समजायला सोपा वाटेल अशी आशा आहे.

दत्तात्रेयांनी ही बारा लक्षणे चार गटांत विभागली आहेत. अवधूत या शब्दात चार अक्षरे आहेत (अ + व + धू + त). एकेका अक्षराचा एक गट असे चार गट. म्हणजेच "अ" काराची तीन लक्षणे, "व" काराची तीन लक्षणे, "धू" काराची तीन लक्षणे आणि "त" काराची तीन लक्षणे अशी ही बारा लक्षणांची विभागणी आहे.

"अ" कार गटातील तीन लक्षणे खालीलप्रमाणे.

१. आशा पाश यांपासून मुक्त असणे

२.  आदी-मध्य-अंत अर्थात अंतर्बाह्य निर्मळता

३. आनंदात नित्य मग्न असणे

अजपा साधना करत असतांना "सोहं-हंस" चा उद्घोष साधक करत असतो. साधनेत प्रगती होऊ लागली की सर्वच स्तरांवरील वखवख शमन होत आहे असा खात्रीशीर अनुभव साधकाला येऊ लागतो. एकदा हे शमन होऊ लागले की आशा-अपेक्षा आणि त्यांमुळे येणारे अनुबंध आपोआप गळून पडायला सुरवात होते. अजपा साधना हा एका अर्थी सहज प्राणायामाचा अभ्यास आहे. प्राणायाम शरीर-मनाला अंतर्बाह्य शुद्ध करतो हे योगशास्त्रीय सत्य आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोष ओलांडून साधक जेंव्हा आनंदमय कोषाच्या भूमिकेवर आरूढ होतो तेंव्हा त्याला दिवसातील बराच काळ आनंदात निमग्न रहाता येऊ लागते.

"व" कार गटातील लक्षणे अशी आहेत.

१. समस्त वासनांचा त्याग केलेला.

२. वक्तव्य ज्याचे निरामय बनले आहे असा.

३. वर्तमानात राहणारा.

वासनांचा त्याग सहजपणे घडत नाही. त्यासाठी विवेकशक्ती जागृत व्हावी लागते. अजपा साधना दीर्घकाळ केल्यानंतर जेंव्हा विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र जागृत होऊ लागते तेंव्हा विवेकशक्ती प्रबल बनते परिणामी वासनांचा त्याग किंवा उपशम साधक करू शकतो. येथे वक्तव्य म्हणजे "वाणी" असा अर्थ मी घेत आहे. योगशास्त्रात ज्या "चत्वार वाचा" सांगितल्या आहेत त्या म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. या वाणीच्या स्तरांचा चक्रांशी घनिष्ठ संबंध आहे. अजपा साधना करता करता जशी जशी कुंडलिनी जागृत होऊ लागते तशी तशी साधकाची वाणीही जणू बदलून जाते. साधकाला मौन आवडू लागते. मितभाषी आणि मधुर बोल हा त्याचा स्थायीभाव बनू लागतो. अजपा साधनेत श्वासांवर मन ठेवणे असल्याने भूतकाळाची आणि भविष्याची जाणीव न रहाता चालू श्वासांवर अर्थात वर्तमानावर मन चिकटून रहाते. साधना संपल्यावर सुद्धा वर्तमानात जगणे साधकाला जमू लागते.

"धू" काराची लक्षणे दत्तात्रेयांनी अशी सांगितली आहेत:

१.  शरीर धूलीधूसर असलेला

२.  ज्याने चित्त धुतलेलं आहे असा.

३. धारणा ध्यान आदी संकल्पयुक्त साधनांपासून मुक्त असलेला

जेंव्हा साधकाला अंतरंगातून आपसूक उमलणारा आनंद प्राप्त होतो तेंव्हा त्याची रहाणी आणि जीवनशैली आपसूकच साधी बनते. त्याला वस्त्र-अलंकारादी गोष्टींत रस वाटेनासा होतो. उच्चतर अवस्थेत आपले शरीर "धूलीधूसर" अर्थात धुळीने माखलेले असले तरी त्याला त्याचे काही वाटेनासे होते इतका तो आत्मानंदात डुंबत असतो. शरीर जरी धुळीने माखलेले असले तरी अशा साधकाचे मन मात्र स्वच्छ धुतलेले अर्थात "धुतचित्त" असते. अशा उच्चकोटीच्या साधकाला ध्यान-धारणादी क्रिया निराळ्या कराव्या लागत नाहीत. सहज भावाने नैसर्गिकपणे २१६०० वेळा होणारी "अजपा गायत्री" हीच त्याची साधना बनते.

"त" काराची लक्षणे सांगतांना दत्तात्रेय म्हणतात:

१. तत्वचिंता धारण केलेला.

२. चिंता आणि चेष्टा रहित

३. अहंकाररुपी तम विरहित

अजपा साधनेत "सोहं" हा तत्वविचार गोवालेलाच आहे. सुरवातीला हा विचार केवळ वैचारिक स्थरावर असतो. जशी जशी साधना दृढ होत जाते तशी तशी या विचाराची अनुभूतीही प्रकट होऊ लागते. सर्वत्र ब्रह्म भरलेलं आहे किंवा संपूर्ण जगत शिवमय आहे ही या तत्वचिंतेची पराकाष्ठा आहे. एकदा तत्वचिंता धारण केली की मग अन्य चिंता आपसूक गळून पडतात हे ओघाने आलेच. अजपा गायत्रीवर आरूढ झाल्यावर एक दिवस "अहं" क्षीण होऊन "सो" मध्ये विलीन होतो आणि केवळ ओमकार रहातो.

भगवान दत्तात्रेयांनी वर्णन केलेली ही बारा लक्षणे अत्यंत उच्च कोटीची प्रगती दर्शवतात. सामान्य साधकाला कदाचित ती कधी प्रचीतीस येणारही नाहीत परंतु संत-सत्पुरुषांची चरित्रे डोळसपणे पाहिल्यास त्यांत यांतील अनेक लक्षणे आपल्याला आढळतील. ही लक्षणे माहित असल्याचा एक फायदा म्हणजे आपल्या अंतरंगात त्यांना पोषक वातावरण आहे का याची पडताळणी करता येणे शक्य होते. त्या दृष्टीने सजग रहाता येते. स्वतः दत्तात्रेयांनी अवधूत गीतेतच सांगितले आहे की सर्वप्रकारच्या लोकांनी, भक्तांनी,  पंडितांनी आणि वेदमार्ग जाणणाऱ्यानी ही लक्षणे माहित करून घेतली पाहिजेत.

असो.

येऊ घातलेल्या श्रीदत्त जयंतीच्या पवित्र दिवशी सर्व योगाभ्यासी वाचक दत्तात्रेयांनी दाखवलेल्या अवधूत मार्गावर अग्रेसर होवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 09 December 2019