Untitled 1

हठविद्येच्या गोपनीयतेची आवश्यकता

लेखक : बिपीन जोशी

हठविद्या परं गोप्या योगिना सिद्धिमिच्छता।
भवेद्विर्यवती गुप्ता निर्वीर्या तु प्रकाशिता॥

ज्या योग्याला हठयोगात सिद्धी मिळवायची आहे त्याने हठविद्या अत्यंत गुप्त ठेवावी. गुप्त ठेवल्याने ती फळ देते पण उघड केल्याने ती फलहिन ठरते.

स्वात्मारामाने येथे एक महत्वाचा मुद्दा सांगितला आहे. विशेषतः नवीन साधकांसाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. हठविद्या गोपनीय राखली तरच ती फलप्रद होते. अन्यथा ती निष्फळ ठरते असे स्वात्मारामाचे सांगणे आहे. आधुनिक विचारसरणीचे साधक अनेकदा अशा गोपनीयतेला विरोध करताना आढळतात. पण त्यातील खरे मर्म समजून घेतले पाहिजे.

हठविद्या गोपनीय राखणे हे स्वात्मारामाचे सांगणे दोन अर्थांनी आहे. एक म्हणजे हठविद्येच्या साधना गोपनीय राखणे आणि दुसरे म्हणजे हठविद्येचा अभ्यास करत असताना आलेले अनुभव गोपनीय राखणे. मागल्या भागात आपण पाहिले की स्वात्मारामाच्या काळीही नाथपंथात अनेकानेक गुरूपरंपरा अस्तित्वात होत्या. त्या सर्वच परंपरांचे एकमेकाशी सख्य नसे. एकमेकाशी स्पर्धा, आपापली परंपरा पसरवण्याचा प्रयत्न, आपापली परंपराच श्रेष्ठ कशी आहे ते पटवण्याचा खटाटोप त्यावेळीही होत होताच. त्यामुळे आपल्या परंपरेच्या साधना दुसर्‍या परंपरेच्या साधकांबरोबर उघडपणे चर्चिल्या जात नसत. ते एका अर्थी बरोबरच आहे. कारण प्रत्येक परंपरेची स्वतःची अशी एक शिकवण आणि विचारसरणी असते. त्या परंपरेची साधना त्या शिकवणीला पोषक अशी असते. जर अशा अनेक विचारसरणींची आणि साधनांची भेसळ झाली तर साधकाला उत्तम दर्जाची विद्या मिळत नाही. आजही अनेक ठिकाणी असा वैचारीक गोंधळ वा भेसळ आपल्याला आढळून येते. भारतात आज अध्यात्ममार्गाचे साधारण चित्र असे आहे की उपनिषदांचे अद्वैत तत्वज्ञान शंकराचार्य प्रणीत मायावादाच्या विवरणासह सर्वोच्च म्हणून स्विकारलेले दिसते पण उपनिषदोक्त ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी अवलंबलेले मार्ग मात्र योग, तंत्र, शैव, शाक्त, भक्ती असे द्वैताधिष्ठीत आढळतात. हिंदू धर्मशास्त्रावर शंकराचार्यांच्या मायावादाचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की अनेकदा भाष्यकार हे द्वैताधिष्ठीत मार्ग (प्रसंगी त्यांच्या मुळ तत्वांची तोडमोड करून) अद्वैतच कसे आहेत हे हिरिरीने सांगताना आढळतात. या सरमिसळीची गरज आणि त्यांचे खरे मर्म समजले नाही तर नवखा साधक गोंधळून जाऊ शकतो. एकिकडे अद्वैत मताप्रमाणे (नेति, नेति) म्हणायचे की हे शरीर असत्य, नश्वर आहे, हा देह म्हणजे ब्रह्म नव्हे आणि दुसरीकडे त्याच शरीरात चक्रे, नाड्या, कुंडलिनी शोधत बसायची हे अनेक साधकांना गोंधळून टाकते. असो. तर सांगायचा मुद्दा हा की नाना परंपरांची संभाव्य आणि चुकीची भेसळ टाळण्यासाठी हठविद्या गुप्त राखण्याचा सल्ला प्राचीन योगग्रंथ देतात.

हठविद्या गुप्त राखण्याचे दुसरे महत्वाचे कारण आहे गुरूपणाची संभाव्य हाव. येथे स्वात्मारामाने उल्लेखलेली सिद्धी आहे राजयोगाची प्राप्ती. अनेक भाष्यकारांनी वरील श्लोकातील सिद्धी या शब्दाचा अर्थ अष्टमहासिद्धी असा केला आहे. मला ते बरोबर वाटत नाही. स्वात्मारामाने प्रथमपासूनच स्पष्टपणे सांगितले आहे की हठयोगाचे प्रयोजन राजयोगाची प्राप्ती हेच आहे. अन्य काही नाही. तेव्हा सिद्धी याचा अर्थ 'इच्छित वस्तूची प्राप्ती' असाच करणे योग्य ठरेल. ज्या योग्याला राजयोगरूपी सिद्धी मिळवायची असेल त्याने आपले सर्व लक्ष साधेनेवर केंद्रित करणे गरजेचे आहे. अनेक वेळा असे दिसते की अध्यात्ममार्गावर आत्ता कुठे वाटचाल सुरू केली आहे असे साधक दुसर्‍याला योग शिकवायला निघतात. या मागे मिळणारी प्रसिद्धी, नाव आणि गुरूपणा हीच कारणे बहुतेकवेळा असतात. लोक येतात, पाया पडतात, मान देतात यातच अशा साधकांना सुख वाटत असते. आपण खरोखरच योग शिकवायला पात्र आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारायला त्यांना वेळच नसतो. मग आपल्या या उपद्व्यापाला ते 'योग प्रसार' असे गोंडस नावही देतात. अनेकदा लोकांना हे लक्षातच येत नाही की 'आरोग्यासाठी योग' आणि 'अध्यात्म्यासाठी योग' यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. केवळ पुस्तकी ज्ञान लोकांच्या तोंडावर फेकणारे त्यांची फसवणूक करतातच पण स्वतःचीही घोर फसवणूक करत असतात. या 'गुरूपणाच्या' विळख्यात अडकायला वेळ लागत नाही. अध्यात्म मार्गावरून च्युत होण्याचेच हे लक्षण आहे. यासाठी प्रत्येक साधकाने जोवर परिपक्वता येत नाही तोवर आपल्या मार्गाविषयी गोपनीयता पाळणेच श्रेयस्कर आहे. याच साठी स्वात्माराम नवीन साधकाला हठविद्येची गोपनीयता पाळावयास सांगत आहे.

नवीन साधकाला अजून एक प्रकारची गोपनीयता पाळणे आवश्यक आहे. हठयोगाची साधना दिर्घकाळ नेटाने केल्यावर काही विलक्षण अनुभव साधकाला येऊ लागतात. काही साधक हे अनुभव लगेच जगजाहीर करतात. साधकावस्थेत तसे कधीही करू नये. एक तर तुमचे साधनाकालातील अनुभव हे तुमचे वैयत्तिक अनुभव असतात. जगातील सामान्य माणसाना ते क नाहीत. कित्येकदा ते तुमच्यावर अविश्वास दाखवतील वा 'डोके ठिकाणावर आहे ना' असे तरी विचारतील! तेव्हा साधकाने हा उतावळेपणा टाळायला हवा. केवळ तुमच्या गुरूला आणि परमेश्वरालाच हे अनुभव सांगावेत. एकदा का तुम्ही पक्व अवस्थेला पोचलात की मग हा नियम पाळायची तितकीशी गरज नाही. पक्वावस्थेत कोणते अनुभव जगाला सांगयचे आणि कोणते नाही ते तुम्ही तुमचे ठरवू शकता. 

स्वात्मारामाने साधकाना धोक्याची सुचनाही दिलेली आहे की जर तुम्ही हठविद्या आणि तुमचे अनुभव उघड केलेत तर तुमची साधना निष्फळ ठरेल. काहींना ही सुचना म्हणजे लहान मुलांना जसे खोटा खोटा बागुलबुवा दाखवून घाबरवतात तसे वाटेल. काही अंशी जरी ते बरोबर असले तरी त्यात तथ्यांशही आहे. काही साधकांचा असा अनुभव आहे की साधनेतील अनुभव उघड केल्याने ते अनुभव थांबतात वा कमी होतात. समजा तुमच्याकडे गुळाचा एक खडा आहे. जर तुम्ही तो खडा पेलाभर पाण्यात टाकलात तर पाणी चांगले गोड होईल पण जर तोच खडा एखाद्या मोठ्या समुद्रात टाकला तर तो समुद्र काही गोड होणार नाही. अगदी हेच साधनेच्या अपक्व अवस्थेत होत असते. काही काळ साधना केल्यावर तुमचा आध्यात्मिक 'बॅंक बॅलंस' वाढत्तो हे खरे पण ती पुंजी तुम्ही सार्‍या जगाबरोबर वाटत बसलात तर ती क्षणात संपते. स्वामी विवेकानंदांची गोष्ट येथे लक्षात घेण्यासारखी आहे. रामकृष्ण परमहंसांनी दिलेली साधना काही काळ केल्यावर नरेन्द्राच्या अंगी काही सामर्थ्य आले. आपल्या सामर्थ्याची प्रचीती घेण्यासाठी त्याने आपल्या एका मित्राला समोर बसवले आणि त्याला स्पर्श करून म्हटले, 'मला काय वाटते ते नंतर सांग'. त्या मित्राने नंतर 'आपल्या अंगातून तीव्र स्पन्दने जात आहेत' असे वाटले असे नंतर सांगितले. संध्याकाळी परमहंसांनी नरेन्द्राला बोलावले आणि रागावून म्हणाले, 'काय हे! आताच कोठे जमवायला सुरवात केली आहे. तेवढ्यात खर्चाला सुरवात." विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा रामकृष्ण तेथे हजरही नव्हते. त्या मित्राचे अध्यात्म जीवनही फारच बदलले. तो मुळचा भक्तीमार्गाचा होता पण ज्ञानयोगमार्गी नरेन्द्राच्या 'स्पन्दनां'मुळे तो नास्तिक बनला. अपक्वावस्थेतील नरेन्द्राच्या या करामतीमुळे ना धड भक्तीमार्ग ना धड ज्ञानमार्ग अशी त्याची अवस्था झाली. असो. तर सांगण्याचा मुद्दा हा की साधकाने आपली साधना आणि अनुभव अपक्वावस्थेत कोणाला सांगू नयेत असे स्वात्मारामाचे सांगणे आहे.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 04 December 2009


Tags : योग अध्यात्म हठयोग कुंडलिनी चक्रे साधना योगग्रंथ लेखमाला नाथ