Ajapa Yoga : Kriya and Meditation Online Course || Build your personal kriya and meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

ब्रह्म मुहुर्तावरील योग साधना - भाग १

पारंपारिक योग साधनेत ब्रह्म मुहूर्ताच्या काळात योग साधना करण्याचा सल्ला तुम्ही नक्कीच वाचला किंवा ऐकला असेल. योगमार्गावर, ध्यानमार्गावर नुकतेच पाऊल ठेवलेल्या साधकांच्या मनात हा प्रश्न हमखास रेंगाळत असतो की ब्रह्म मुहूर्तावर साधना करावी का आणि ती केल्याने काही विशेष असा फायदा होतो का? आज आपण त्याविषयीच काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

प्रथम ब्रह्म मुहूर्त म्हणजे नक्की काय ते आपण जाणून घेणार आहोत. आधुनिक काळात विशेषतः इंटरनेट आणि संगणकाच्या युगात आपला दिवस मध्यरात्री बारा वाजता संपतो आणि मग बारा ओलांडून आपण दुसऱ्या दिवसात प्रवेश करतो. जुन्या काळी जेंव्हा आजच्यासारखी कालमापनाची साधने उपलब्ध नाचती तेंव्हा सूर्योदय ते सूर्यास्त म्हणजे दिवस आणि सूर्यास्त ते दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय म्हणजे रात्र अशी निसर्गाच्या घड्याळाशी सुसंगत अशी आखणी होती.

दर दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने दिवस आणि रात्र यांच्या वेळा आणि कालावधी सुद्धा रोज बदलता असतो हे ओघाने आलेच. अगदी बाळबोध वाटले तरी विषय नीट समजण्या करता पटकन एक उदाहरण घेऊ.

केवळ उदाहरणासाठी असे समजा की सूर्योदय सकाळी ६ वाजता आहे आणि सूर्यास्त संध्याकाळी ६ वाजता आहे. म्हणजेच चोवीस तासांच्या कालावधीत बारा तासांचा दिवस आणि बारा तासाची रात्र आहे. प्राचीन कालगणने नुसार दिवस आणि रात्र यांची विभागणी प्रत्येकी १५ मुहुर्तांमध्ये केलेली आहे. म्हणजेच दिवसाचे १५ मुहूर्त आणि रात्रीचे १५ मुहूर्त असे एकूण ३० मुहूर्त चोवीस तासांत असतात. आपल्या उदाहरणात १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असल्याने चोवीस तासात प्रत्येकी ४८ मिनिटांचे एकूण ३० मुहूर्त होतील.

वरील उल्लेखलेल्या प्रत्येक मुहूर्ताला नावे देण्यात आलेली आहेत. दिवसातील (आपल्या उदाहरणानुसार सकाळी सहा ते संध्याकाळी सहा) जे १५ मुहूर्त आहेत त्यांची नावे अनुक्रमे रुद्र, आहि, मित्र, पितॄ, वसु, वाराह, विश्वेदेवा, विधि, सतमुखी, पुरुहूत, वाहिनी, नक्तनकरा, वरुण, अर्यमा, आणि भग अशी आहेत. रात्रीचे (आपल्या उदाहरणानुसार संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा) जे १५ मुहूर्त आहेत त्यांची नावे अनुक्रमे गिरीश, अजपाद, अहिरबुध्न्य, पुष्य, अश्विनी, यम, अग्नि, विधातॄ, कण्ड, अदिति, जीव/अमृत, विष्णु, युमिगद्युति, ब्रह्म आणि समुद्रम अशी आहेत.

आता नीट बघा. वरील नामावलीत ब्रह्म मुहूर्त हा रात्रीचा चौदावा मुहूर्त आहे. तो रात्रीच्या शेवटच्या मुहूर्ताच्या एक पायरी आधी आणि दिवसाच्या पहिल्या मुहूर्ताच्या दोन पायऱ्या आधी आलेला आहे. याचाच अर्थ असा की ब्रह्म मुहूर्ताची सुरुवात सूर्योदयाच्या आगोदर रात्रीच्या शेवटच्या दोन मुहुर्तांच्या कालावधी नुसार होईल.

जर आपल्या उदाहरणानुसार आपल्याला ब्रह्म मुहूर्ताची वेळ काढायची असेल तर सकाळी सहाच्या आगोदर सुमारे ९६ मिनिटे (४८ X 2 = ९६) ही वेळ काढावी लागेल. आपल्या उदाहरणात पहाटे चार वाजून चोवीस मिनिटांनी ब्रह्म मुहूर्त सुरु होईल आणि त्यानंतर ४८ मिनिटांनी सुमारे पाच वाजून बारा मिनिटांनी तो संपेल.

वरील आकडेमोड केवळ विषय समजण्यासाठी दिलेली आहे. ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय आणि त्याची वेळ कशी समजते हे ढोबळमानाने कळावे एवढाच उद्देश या आकडेमोडी मागे आहे. दर दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने ब्रह्म मुहूर्ताचा वेळ सुद्धा रोज वेगवेगळा असतो. एखाद्या दिवशीची ब्रह्म मुहूर्ताची वेळ जाणून घेण्यासाठी पंचांग किंवा दिनदर्शिका हाच सर्वात सोपा आणि अचूक मार्ग आहे.

या छोटेखानी लेखात आपण ब्रह्म मुहुर्ताविषयी मुलभूत माहिती जाणून घेतली. ब्रह्म मुहूर्ताचा योग साधनेसाठी कसा उपयोग करायचा ते पुन्हा कधीतरी जाणून घेऊ.

असो.

काळाचाही काळ असलेला भगवान महाकाल सर्व वाचकांना ब्रह्म मार्गावरील वाटचालीकरता अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 12 September 2022