Untitled 1

संचित पापांचा नाश करणारी नादानुसंधान साधना

भारतीय अध्यात्माचा विषय म्हटला की त्यात पाप आणि पुण्य या संकल्पना हमखास आढळतात. अनेक प्राचीन ग्रंथांतून या संकल्पनांचा उहापोह केलेला आढळतो. पाप म्हणजे नक्की काय आणि पुण्य म्हणजे नक्की काय हा एक वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल. अर्थात येथे आपल्याला अशा कोणत्याही चर्चा-चर्वणात जायची गरज नाही. आपापल्या मनात पाप आणि पुण्य यांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्यांच्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र सर्वांनाच करावीशी वाटत असते ती म्हणजे पापांचा समूळ नाश. पापांचा नाश आणि पुण्यांची वृद्धी ही सुखाला कारक ठरणारी गोष्ट असल्याने पुण्यकर्म करण्याबरोबरच जाणते-अजाणते पणी जे पापाचरण घडले आहे त्याचे काही ना काही उपायांनी क्षालन करावे अशी प्रत्येक अध्यात्म साधकाची इच्छा असते.

उपासना मार्गातील देवी-देवतांच्या स्तोत्रांमध्ये त्या-त्या स्तोत्राची फलश्रुती दिलेली असते. या फलश्रुतीत हमखास आढळणारी गोष्ट म्हणजे त्या स्तोत्र पाठाने पापांचा नाश होण्याची दिलेली हमी. अर्थात अशा स्तोत्रांचे एक-दोन पाठ करून काही हाती लागणार नाही हे उघड आहे. त्यासाठी मग त्या स्तोत्राची विधीपूर्वक हजारो-लाखो आवर्तने करून अनुष्ठान वगैरे करण्याची शिफारस केली जाते. आता अशा प्रकारच्या स्तोत्रादी गोष्टींच्या पाठाने खरोखर पापक्षालन होते का हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग आहे.

ज्या प्रमाणे उपासना मार्गातील लोकांना स्तोत्रादी गोष्टींची सोय प्राचीन ऋषीमुनींनी करून ठेवली आहे त्या प्रमाणे योगमार्गी साधकांसाठी पापक्षालनासाठी काही उपाययोजना प्राचीन योग्यांनी सांगितली आहे का असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. त्या अनुषंगाने हठ ग्रंथ काय सुचवतात ते जाणून घेणे नवीन साधकांसाठी उद्बोधक ठरावे.

यम-नियमां खेरीज हठयोग पद्धतीमध्ये शुद्धीक्रिया, आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि ध्यान यांचा प्रामुख्याने समावेश होतो. बाकी सर्व अंगे वगळून थेट ध्यानाभ्यास करणे हे पारंपारिक हठयोग प्रणालीला मान्य नाही. प्रथम अन्नमय कोष आणि प्राणमय कोष यांना पुढील वाटचालीसाठी तयार करायचे आणि मग मनोमय कोष, विज्ञानमय कोष, आनंदमय कोष यांच्या साधनांना हात घालायचा असा हठयोग मार्गाचा परिपाठ आहे. अर्थात साधकाच्या तयारीनुसार आणि सद्यस्थितीनुसार कोणत्या साधना करायच्या हे ठरत असते. यासंबंधी खालील श्लोक पुरेसा बोलका आहे -

तत्त्वं बीजं हठः क्षेत्रम् औदासीन्यं जलं त्रिभिः।
उन्मनी कल्प-लतिका सद्य एव प्रवर्तते ॥

याचा अर्थ असा की आत्मतत्वाचे ध्यान हे बीज आहे. हठयोग ही भूमी आहे आणि भौतिक गोष्टींविषयी औदासिन्य अथवा वैराग्य हे जल आहे. जमीनीत बी पेरून त्याला पाणी घातले की ज्या प्रमाणे रोपटे सृजन पावते त्या प्रमाणे मग उन्मनी अवस्था अनुभवाला येते. मनाला "मारून" त्याला अ-मन करणे हेच हठयोगाचे परम लक्ष्य आहे. त्याविषयी म्हणतात -

सर्वे हठ-लयोपाया राजयोगस्य सिद्धये।
राज-योग-समारूढः पुरुषः काल-वञ्चकः॥

आता राजयोग किंवा सर्वासाधारण भाषेत ज्याला ध्यान-धारणा म्हणतात ही काही एका दिवसांत साधणारी गोष्ट नाही. परंतु योगशास्त्रातील पापक्षालनाचा तो राजमार्ग आहे. पाप आणि पुण्य हे शेवटी चित्तावरील संस्कार असतात. योगशास्त्रात ध्यानाभ्यासाने "चित्तवृत्ती निरोध"  साधायचा असल्याने त्या द्वारे पापक्षय सुद्धा घडतो.

ध्यानाच्या अनेकानेक पद्धती आहेत. हठयोगात त्यांतील "नादश्रवण" अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. काटेकोरपणे बघायचे झाले तर नादश्रवण ही लययोगाची साधना आहे. परंतु बहुतेक सर्व हठ ग्रंथांमध्ये तिचे विवेचन कमी-अधिक प्रमाणात आलेले आहे. नादश्रवण साधनेत षण्मुखी मुद्रा धारण करून प्रथमतः कर्णांत उद्भवणारे "नाद" लक्षपूर्वक श्रवण केले जातात. जशी जशी मनाची एकाग्रता वाढत जाते तसे तसे नाद सूक्ष्म होत जातात आणि यथावकाश "अनाहत नाद" उत्पन्न होतात. नादाच्या अशा दहा प्रकारांचे वर्णन आपल्याला योगग्रंथांत आढळते. अनाहत नाद ऐकता ऐकता पापक्षालन कसे होते ते खालील श्लोकावरून समजून येईल -

सदा नादानुसन्धानात् क्षीयन्ते पाप-संचयाः।
निरञ्जने विलीयेते निश्चितं चित्त-मारुतौ॥

सदा नादानुसंधान केल्याने पापांचा संचय नष्ट होतो. चित्त आणि प्राणवायू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नादश्रवणाने चित्त आणि प्राण दोन्ही निरंजन अशा परमात्म्यामध्ये विलीन होतात. हठयोगात नादश्रवण ही एक श्रेष्ठ साधना का मानकी गेली आहे हे आता तुम्हाला कळू शकेल.

हठयोगाच्या बहुतेक अभ्यासकांचा असा गैरसमज असतो की नादश्रवण करण्यासाठी केवळ षण्मुखी मुद्रा हाच मार्ग आहे. असं वाटण्याचे कारण म्हणजे बहुतेक सर्व हठ ग्रंथांत नादश्रवण हे षण्मुखीच्या सहाय्यानेच विषद केलेले आहे. परंतु त्यामागील रहस्य नीट जाणून घेतले पाहिजे.

नादश्रवणाचे दोन मार्ग आहेत - प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. षण्मुखी मुद्रा किंवा "कान झाकून" करण्याची कोणतीही मुद्रा हा नादश्रवणाचा थेट मार्ग आहे. यात तुम्ही तुमची जाणीव अंतरंगांत उमटणाऱ्या ध्वनींवर केंद्रित करत असता. याचाच अर्थ तुमच्या ध्यानाचा विषय हा नाद असतो. प्रथमतः स्थूल नाद ऐकु येतात. नंतर नंतर ते क्रमशः सूक्ष्म होत जातात. जे नाद स्थूल कर्णांनी ऐकु येतात ते काही खऱ्या अर्थाने अनाहत नाद नव्हेत. जेंव्हा ध्यान प्रगल्भ बनते तेंव्हा त्याची झेप पृथ्वी, जल आणि अग्नि तत्वांना मागे टाकून वायू आणि आकाश तत्वांपर्यंत पोहोचू लागते. त्यावेळेस अनाहत चक्राच्या ठिकाणी अनाहत नाद उत्पन्न होतात. तात्पर्य हे की अनाहत नाद हे सुशुम्नेमध्ये निर्माण होत असतात. नादश्रवण किंवा तत्सम ध्यान क्रियांमध्ये ध्यानाचा विषयच नाद असल्याने ध्यान प्रगाढ झाले की अनाहत नाद आपोआप ऐकु येऊ लागतात.

अप्रत्यक्ष साधनांची गोष्ट थोडी वेगळी असते. उदाहरण म्हणून येथे असं गृहीत धरू की तुम्ही अजपा ध्यान करत आहात. आता अजपा ध्यान ही काही षण्मुखी मुद्रेप्रमाणे नादश्रवणाची थेट साधना नाही. त्यामुळे तुमच्या ध्यानाचा विषय हा नाद नसून तो नैसर्गिक श्वासोच्छ्वास हा असतो. पुढे पुढे ध्यानाचा विषय हा स्थूल श्वास न रहाता श्वासांमागील प्राणशक्ती बनतो. साधकाची सुषुम्ना अगदी छान मोकळी होऊ लागते. केवळ मानसिक संकल्पाने त्याला सुषुम्ना आणि कुंडलिनी चालवता येऊ लागते. "शक्तीचालन" सुखनैव घडू लागते की कुंडलिनी तत्वांचे सोपान ओलांडून प्राणशक्तीच्या स्त्रोताकडे झेपाऊ लागते. त्यावेळी वायू आणि आकाश तत्वांचे शुद्धीकरण सहजच होते आणि ध्यानीमनी नसतांना त्याला अनाहत नादांची प्रचीती येते. अप्रत्यक्ष नादश्रवण हे असे घडते.

नादानुसंधान कोणत्याही प्रकाराने घडत असो ते साधकाचे कल्याणच करते यात शंका नाही. नादानुसंधाना व्यतिरिक्त अजूनही काही पापक्षालनाचे योगशास्त्रीय उपाय आहेत. त्यांविषयी पुन्हा कधीतरी जाणून घेऊ.

असो.

दशविध नाद उत्पन्न करणाऱ्या आदिशक्ती कुंडलिनीच्या कृपेने अभ्यासू साधकांना नादश्रवणाची अवीट गोडी चाखायला मिळो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 18 May 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates