Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

Untitled 1

श्रीकृष्णाच्या बासरीतील कुंडलिनी योग

आज एक आठवण करून द्यायला हवी की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला मोहरात्री असं म्हणतात. मागे त्या विषयी मी विस्ताराने लिहिले आहे. त्यामुळे पुनरावृत्ती करत नाही. मोहरात्रीच्या काळात केलेली श्रीकृष्ण उपासना तर उत्तम असतेच परंतु या काळात केलेल्या अन्य उपासना-साधना देखील अतिशय शुभ फलदायी मानल्या जातात. तुम्ही सर्व सुजाण वाचक मोहरात्रीचा हा काळ आपापल्या आवडीची साधना-उपासना करून सत्कारणी लावाल अशी आशा आहे. फार काही पाल्हाळ लावण्यापेक्षा आज श्रीकृष्णाच्या बासरीत दडलेल्या कुंडलिनी योगा विषयी दोन शब्द सांगतो.

१. मानवी शरीरातील मेरुदंड म्हणजे जणू श्रीकृष्णाची बासरी.

२. मेरुदंडाच्या आतून धावणारी सुषुम्ना नाडी म्हणजे बासरीच्या आतील पोकळ नलिका.

३. सुषुम्ना मार्गावर योजलेली चक्रे म्हणजे जणू बासरीची छिद्रे. पंचमहाभूते, मन,बुद्धी, अहंकार अशा "अष्टधा" रूपांमध्ये प्रकटलेली प्रकृती शरीरस्थ चक्रांच्या माध्यामाने पिंडाचा कारभार चालवते.

४. बासरीच्या टोकाच्या छिद्रामधून वादक जशी फुंकर घालतो तसं परमेश्वर या चक्रांमध्ये आणि नाडीजालामध्ये प्राण फुंकतो. हा प्राण अजपा गायत्रीच्या रूपाने २१६०० वेळा श्वासोच्छ्वासांच्या माध्यमातून प्रकट होतो.

५. बासरीच्या छिद्रांचा वापर करून वादक सुंदर संगीत निर्माण करतो. त्याचप्रमाणे चक्रांवर प्राणांचा अभिषेक करून योगी निरनिराळ्या अनाहत नादांचा आस्वाद घेतो. हे दशविध अनाहत नाद अजपाच्या साक्षीने रोमारोमात भक्तीचा हुंकार अलगद फोहोचवतात.

६. बासरीच्या आतील पोकळी भरून टाकली तर त्यांत फुंकर भरता येईल का? त्याचप्रमाणे सुषुम्ना नाडीत जन्मो-जन्मींची अशुद्धी भरलेली असेल तर त्यांत कुंडलिनीचे संचरण होणार नाही. योगशास्त्रात शरीरशुद्धी आणि मनःशुद्धीला महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे त्यामागे शरीरस्थ नाडीजालात शक्तीसंचार नीट घडून यावा आणि शक्तीला शिवाची भेट घेण्याचा मार्ग मोकळा व्हावा हा हेतू असतो.

७. बासरीतून उमटणारे स्वर सहसा कर्कश्श नसतात. सुखद आणि आल्हाददायकच असतात. त्याच प्रमाणे शिव मुखातून प्रकट झालेला अजपा योग सुद्धा सहज आणि सुखमयरीत्या कुंडलिनी जागरण करतो. योगशास्त्रात अनेकानेक साधना आणि पद्धती आहेत. जो तो आपापल्या श्रद्धेनुसार आपली साधना प्रणाली निवडत असतो. नैसर्गिक श्वासांच्या माध्यमातून घडणारा अजपा जप स्वयमेव घटीत होणारी ईश्वरप्रदत्त साधना असल्याने अर्थातच सहज आहे, सुखद आहे, स्वभावतःच सिद्ध आहे.

८. बासरी वादन करत असतांना वादक अगदी जीव ओतून मनाच्या तरल गाभ्यातून स्वर साधत असतो. तेंव्हाच श्रोत्यांच्या काळजाला हात घालणारे संगीत निर्माण होते. कुंडलिनीची प्रसन्नता प्राप्त करायची असेल तर निव्वक योगक्रिया करून चालत नाही. श्रद्धा-सबुरी-शिस्त-समर्पण या गुणांच्या जोरावर त्या ईश्वराला आणि ईश्वरीला तुमच्या आध्यात्मिक ओढीची खात्री पटवून द्यावी लागते. तेंव्हाच त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो.

ही इवलीशी पोस्ट लिहून झाल्यावर लक्षात आलं की "अष्टमीच्या" निमित्ताने लिहिलेल्या या पोस्टमध्ये योगायोगाने बासरी विषयक हे "आठ बिंदू" आपसूक आले आहेत. जणू श्रीकृष्णानेच वदवून घेतल्या प्रमाणे. त्यामुळे लिहून झाल्यानंतर त्यांना अनुक्रमांक दिले आहेत.

असो.

अर्जुनाला प्राण आणि अपानाद्वारे होणाऱ्या अजपा जप रूपी यज्ञाची ओळख करून देणारा भगवान श्रीकृष्ण सर्व वाचकांना योगमार्गावरील वाटचालीकरता प्रेरणा देवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स साठी अजपा ध्यानाची ओंनलाईन सेशन्स. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 18 August 2022