Untitled 1

अजपा साधनेतील घाम, कंप आणि स्थैर्य

हठयोगात कुंभकयुक्त प्राणायाम हा आत्यंतिक महत्वाचा घटक मानला जातो. परंतु कुंभकयुक्त प्राणायाम ही सगळ्यांना साधणारी गोष्ट नाही. या उलट अजपा साधना सगळ्यांना सहज साधणारी आहे. आज अजपा साधनेत प्राणमय कोषाची शुद्धी व्हायला सुरवात झाली की काय काय अनुभव साधकाला येतात ते थोडक्यात सांगणार आहे.

येथे एक लक्षात ठेवायला हवे की अजपा साधनेची थोडी प्रगत अवस्था ज्यांनी साधली आहे त्यांनाच हे अनुभव येतील. नुकतीच ज्यांनी अजपा सुरवात केली आहे त्यांना असे अनुभव येण्यास काही काळ जावा लागेल. अजपा साधनेत मुद्दाम कुंभक केला जात नाही किंवा श्वासांची गतीही मुद्दाम अवरोधिली जात नाही. तुमच्यापैकी ज्यांच्या हातून नित्य नियमाने विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त अजपा साधना घडत आहे त्यांना पहिला अनुभव येईल तो हा की दर मिनिटाला होणाऱ्या श्वासांची संख्या कमी-कमी व्यायला लागेल. आपोआप. कोणतीही यत्न न करता. सर्वसाधारण माणसाचे श्वास दर मिनिटाला १५ ते १८ च्या आसपास घडत असतात. अजपा साधना अंगात "मुरली" की मग ही संख्या कमी-कमी होऊ लागते. उदाहरणार्थ, कोणाचे मिनिटाला १२ किंवा १० होतील. पुढेपुढे तर त्याही पेक्षा अगदी कमी होतील. शेवटी काहीना केवल कुंभक सुद्धा अनुभवास येईल. अर्थात ही खुप प्रगत अवस्था आहे. अनेक वर्षे लागतात ही अनुभूती यायला.

हठयोगातील नाडीशोधन प्राणायामात इडा आणि पिंगला नाड्यांनी आलटून पालटून प्राणायाम केला जातो आणि शरीरातील नाडीजाल शुद्ध केले जाते. अजपा साधनेत "आलटून-पालटून" हा प्रकार नसला तरी कालांतराने स्वर आपोआप सारखे होऊ लागतात. स्वर सारखे होऊ लागले की नाडीशुद्धी सुद्धा होऊ लागते. अशाप्रकारे नाडीशुद्धीला सुरवात झाली की मग पहिले चिन्ह प्रगट होते ते म्हणजे साधनेच्या वेळी शरीराला मंद मंद घाम यायला लागतो. सर्वसाधारण उकाड्यामुळे जो घाम येतो तो आपल्याला नकोसा वाटतो. तो लगेच पुसून टाकावा अशी इच्छा होते. याउलट अजपा साधनेच्या वेळी येणारा हा जो घाम असतो तो काहीसा हवाहवासा वाटतो. संपूर्ण शरीरभर घामाची नाजूक जाळी पसरली आहे असं वाटते. ज्ञानेश्वरी मध्ये श्रीकृष्णाचे विश्वरूप दर्शन घडल्यावर अंगभर अष्टसात्विक भाव दाटून घामाची नाजूक जाळी पसरली असं जे वर्णन आहे तसं काहीसं वाटतं हा घाम आल्यावर. योगग्रंथांचा निर्देश मानायचा झाला तर जर साधना आटपून तुम्हाला कोठे घराबाहेर जायचे नसेल तर हा आलेला घाम टॉवेलला पुसू नये. हलक्या हातांनी तो शरीरावर मालिश केल्यासारखा पुसून टाकावा कारण तो प्राणउर्जेने चार्ज झालेला असतो. अर्थात या बाबतीत तारतम्य बाळगावे. दुराग्रह करू नये. जर घामाला खुप दुर्गंधी येत असेल किंवा कुठे बाहेर जायचे असेल तर तो पुसून टाकलेलाच बरा.

हा झाला प्राण शुद्धीचा पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यात शरीरात प्राणाची प्रत्यक्ष हालचाल जाणवते. मेरुदंडातून एक मंद मंद कंपने मुलाधाराकडून सहस्राराकडे जातांना जाणवतात. कधी कधी एखादी मुंगी मेरूदंडावरून चालतेय अशी हुळहुळ जाणवते. अजून शुद्धी झाली, प्राणशक्तीचा विकास होऊ लागला की प्राण शरीरात उसळ्या मारायला लागते. आपण लहानपणी क्रिकेटचा रबरी चेंडू घ्यायला दुकानात जायचो. चेंडू घेण्यापूर्वी तो जमिनीवर किंवा भिंतीवर आपटून तो नीट टप्पा खातोय ना याची खात्री करायचो आणि मगच तो विकत घ्यायचो. शरीरस्थ प्राण त्या चेंडूसारख्या टणाटण उसळ्या मारायला लागतो साधनेला बसलं की. असा अनुभव जेंव्हा तुम्हाला पहिल्यांदा येईल तेंव्हा गडबडून जायला होतं. कधीकधी असं वाटतं की शरीर आसनावरून वर उचललं जात आहे. प्रत्यक्षात तसं काही होत नसतं पण तसं भासमान होतं कारण आतापर्यंत अन्नमय कोष आणि प्राणमय कोषांची असलेली घट्ट जुळणी साधनेच्या काळापुरती जराशी विस्कळीत झालेली असते.

असं करता करता त्याच्याही पुढची अवस्था प्राप्त होईल. ती म्हणजे प्राणांचे स्थैर्य. योगमतानुसार प्राण आणि मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्राणाची बाह्य गती खुंटून ती सुषुम्ना नाडीमधून जायला लागला की प्राणलय आणि मनोलय दोन्ही साधू लागते. मनाला एकप्रकारची दृढता, स्थिरता आणि शांती अनुभवाला येते. आपण सगळ्यांनी कधी ना कधी बोटीतून जातांना नदीच्या किंवा तलावाच्या तळाचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. बहुतेक वेळा लाटा आणि पाण्यातील कचरा, शेवाळ वगैरे अशुद्धी मुळे आपल्याला तळ दिसतंच नाही. जेंव्हा पाणी शुद्ध, शांत आणि स्तब्ध असेल तेंव्हाच आपल्याला तळ दिसतो. अजपा साधनेत सुद्धा हाच प्रकार घडून येतो.

या अवस्थेनंतर पुढे काय काय घडतं ते आज सांगत नाही. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

असो.

योगाभ्यासी वाचक अजपा साधनेला सर्वोपरी मानून शिव-दत्तकृपेने योगमार्गावर अग्रेसर होवोत ह्या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 26 August 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates