Untitled 1

नवनाथ पोथीच्या द्विशतक पूर्तीच्या निमित्ताने

नाथ संप्रदायाचे जनक मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांचा काळ साधारण दहावे-अकरावे शतक असा मानला जातो. नाथ पंथ पा मूलतः योगप्रधान शैव संप्रदाय आहे हे स्पष्टच दिसून येते. परंतु कालांतराने त्यात सर्वच देवी-देवतांचा समावेश होत गेला. जेंव्हा एखादी गोष्ट लोकप्रिय होते तेंव्हा आपसूक सार्वजण त्या गोष्टीशी आपले नाते जोडण्यास उत्सुक होतात. त्यांत सामावले जातात. नाथ संप्रदायाच्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे घडले.

संत ज्ञानेश्वरांच्या नंतरच्या काळात भक्तिमार्गाचा आणि वैष्णवमताचा जो एक विलक्षण प्रभाव महाराष्ट्रातील संत परंपरेवर दिसून येतो तोच प्रभाव महाराष्ट्रातील नाथ पंथावरही पडला. असं म्हणतात की गहिनीनाथांकडून ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडाना कृष्णभक्तीचा ठेवा मिळाला. ह्याच ठेव्याच्या आधारे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये नाथ साम्प्रदायोक्त कुंडलिनी योग आणि भक्तिमार्ग यांची अनोखी जुळणी केली.

भक्तीमार्गावरील साहित्याचे एक वैशिष्ठ्य म्हणजे नानाविध लीला-ग्रंथ. आपापल्या उपास्य दैवातेच्या अथवा सद्गुरुंच्या लीला रसाळपणे वर्णन करायच्या आणि भक्तिरसात तल्लीन होऊन जायचे हा जणू एक भक्ती साधनेचा भागच बनला. श्रीगुरुचरित्र, दत्तमहात्म्य, दत्तपुराण, शिवलीलामृत, गुरूलीलामृत, श्रीगजानन विजय, श्रीशंकर गीता अशा अनेकानेक रचनांमध्ये सुद्धा लीलावर्णन हा महत्वाचा भाग आहे. नवनाथांच्या लीला, त्यांचे चमत्कार, त्याच्या विषयीच्या सुरस कथा यांचा असाच एक ग्रंथ मराठी नाथ भक्तांमध्ये लोकप्रिय पावला. तो ग्रंथ म्हणजे नवनाथ भक्तिसार.

नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ शके १७४१ मध्ये (म्हणजे ई.स. १८१९) जन्माला आला. तिथीनुसार ४ जून २०१९ रोजी या ग्रंथाला २०० वर्षे पूर्ण झाली आहेत. चाळीस अध्याय असलेला हा ओवीबद्ध ग्रंथ महाराष्ट्रातील नवनाथ भक्तांमध्ये अतिशय लोकप्रिय आणि प्रासादिक म्हणून मान्यता पावला आहे. नवनाथांचे अयोनीसंभव अवतरण, त्यांचे चमत्कार, त्यांच्या योगसिद्धी, पराकोटीचे वैराग्य, देवी-देवतांशी केलेली मंत्रयुद्धे अशा आश्चर्यकारक प्रसंगांनी ओतप्रोत भरलेला असा हा पवित्र ग्रंथ कोणाही नाथ भक्ताला आवडेल असा आहे. हा रसाळ आणि सुगम ग्रंथ लोकप्रिय होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यातील अध्याय वाचनाने भौतिक फायद्यांची पदोपदी दिलेली हमी. ग्रंथ पाठकाला आश्वासित करतो की ग्रंथातील चाळीस अध्याय म्हणजे जणू शक्तिशाली मंत्रच आहेत आणि ते पाठकांचे दुःख हरतील.  साहजिकच सर्वसाधारण, भोळ्याभाबड्या, संसारिक कटकटीनी ग्रासलेल्या भक्तांना या ग्रंथाने आकर्षित न केले तरच नवल. ज्ञानेश्वरी किंवा गुरुचरित्राप्रमाणेच नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण अनेक नाथ भक्तांच्या घरी आवडीने केले जाते. अर्थात एखादा ग्रंथ वाचून असे भौतिक फायदे होतात का हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि अनुभवाचा भाग आहे.

या ग्रंथाच्या रचयित्याने ग्रंथामध्ये स्वतःचा उल्लेख धुंडीसुत मालुकवी असा केलेला आहे. मालुकवीने स्वतःच असेही सांगितले आहे की हा ग्रंथ त्याने गोरक्ष किमयागार नावाचा अन्य एक ग्रंथ आधारभूत मानून लिहिला आहे. मालुकवीच्या ओव्यांवरून असं वाटतं की गोरक्ष किमयागार हा स्वतः गोरक्षनाथांनी लिहिला असावा. काही ठिकाणी मालुकवीने श्रोत्यांना असेही सांगितले आहे की माझ्या ओवीबद्ध रचनेचा विश्वास नसेल तर खात्री करण्यासाठी मूळ गोरक्ष किमयागार अवश्य पडताळून पहावा. यावरून असं वाटतं की मालुकवीने आपली रचना केली त्याकाळी गोरक्ष किमयागार सहज उपलब्ध असावा.

आश्चर्याची गोष्ट अशी की गोरक्ष किमयागार हा ग्रंथ आज अप्राप्य झालेला आहे. मूळ प्रमाणग्रंथच आज सहज उपलब्ध नसल्यामुळे मालुकवीने लिहिलेली नवनाथांची चरित्रे आणि मूळ ग्रंथ यांचा एकत्रितपणे अभ्यास करणे अशक्य होऊन बसले आहे. प्राचीन काळचे अनेक योग-अध्यात्म ग्रंथ आजही उपलब्ध आहेत, अनेक प्रकाशकांनी ते वेळोवेळी प्रकाशितही केले आहेत परंतु १८१९ पर्यंत उपलब्ध असलेला गोरक्ष किमयागार आज सहज उपलब्ध असू नये ही जिज्ञासू नाथ भक्तांना चुटपूट लावणारी गोष्ट आहे.

नवनाथ भक्तिसार ग्रंथांत मालुकवीने जी नवनाथ परंपरा वर्णन केलेली आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे -

१. मच्छिंद्रनाथ २. गोरक्षनाथ ३. गहिनीनाथ ४. जालिंदरनाथ ५. कानिफनाथ ६.  भर्तरीनाथ ७. रेवणनाथ ८. नागनाथ ९. चर्पटीनाथ 

ग्रंथानुसार नवनाथ हे नवनारायणांचे अवतार आहेत. वरीलपैकी गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि कानिफनाथ सोडले तर अन्य नाथ हे दत्तात्रेयांचे थेट शिष्य आहेत. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचे, गहिनीनाथ गोरक्षनाथांचे तर कानिफनाथ जालिंदरनाथांचे शिष्य आहेत. मच्छिंद्रनाथांना मच्छीच्या पोटात असतांना भगवान शंकराकडून आणि नंतर विधिवत दत्तात्रेयांकडून असा दुहेरी ज्ञानलाभ झालेला आहे. 

नाथ संप्रदायात प्रचलित असणारा जो नवनाथ शाबर मंत्र आहे त्यापेक्षा ही परंपरा भिन्न आहे. अर्थात या भिन्नतेमुळे मालुकवीच्या ग्रंथाला काही उणेपणा येत नाही. बहुदा परंपरेतला हा फरक स्थळ-कालपरत्वे आला असावा.

असो.

मालुकवीची रचना मराठी भाषिक नवनाथ भक्तांमध्ये परम आदरणीय आणि अत्यंत लोकप्रिय झाली आहे हे मात्र निश्चित. त्यासाठी मालुकवीला आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथाला शतशः प्रणाम.

समस्त योगमार्गाचा उगम आणि गंतव्य असलेला भगवान आदिनाथ सर्व वाचकांना भक्ती, योग आणि ज्ञान प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 10 June 2019