भक्तीचा अनाहत परमेश्वर प्राप्तीस

भक्तीचा अनाहत

बिपीन जोशी यांचा हा लेख "श्रीवासुदेव निवास" या संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकाच्या ऑक्टोबर २०१६ मधील अंकात प्रथम प्रकाशित झाला आहे. आमच्या अन्य वाचकांनाही तो वाचता यावा या हेतूने तो येथेही उपलब्ध करून देत आहोत.

परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणून जे काही मार्ग ज्ञात आहेत त्या सर्वच मार्गांनी भक्तीची उपयोगिता कमी-अधिक प्रमाणात मान्य केलेली आहे. महाराष्ट्रातील संत परंपरेची शिकवण भक्तिरसात चिंब न्हाऊन निघालेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी नाथ साम्प्रदायोक्त कुंडलिनी योगाला भक्तीचा सुंदर मुलामा दिलेला आहे. प्राचीन योगग्रंथांत चार प्रकारचा योग वर्णन केलेला आपल्याला दिसतो. ते चार प्रकार म्हणजे – मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग. या सर्वच साधानामार्गांवर भक्तीची आवश्यकता प्रतिपादित केलेली आहे. केवळ ईश्वरभक्तीच नाही तर गुरुभक्तीही योगमार्गावरील सफलतेसाठी अत्यावश्यक मानली गेली आहे. कुंडलिनी योगशास्त्रानुसार भक्तीचा आणि अनाहत चक्राचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळेच प्रत्येक साधकासाठी अनाहत चक्र, त्याचे स्वरूप, त्याचे महत्व आणि त्याचा भक्तीशी आणि ध्यानमार्गाशी असलेला संबंध जाणून घेणे उद्बोधक ठरते.

अनेक प्राचीन योग आणि आगम ग्रंथांमध्ये षटचक्रांचे विस्तृत विवेचन केले गेले आहे. प्राचीन ग्रंथांमधील या चक्राच्या वर्णनात काही भेद आढळतात. त्या भेदांच्या किचकट विश्लेषणामध्ये न गुरफटता आपण अनाहत चक्राचे स्वरूप थोडक्यात जाणून घेऊया.  अनाहत चक्र किंवा अनाहत कमल हे छातीच्या मध्यभागी बरोब्बर मागील बाजूस सुषुम्ना नाडीमध्ये विराजमान आहे. ‘अनाहत’ म्हणजे कोणत्याही आघाताशिवाय निर्माण झालेला नाद. सर्वसाधारणपणे जेंव्हा दोन गोष्टी एकमेकांवर आपटतात तेंव्हा नाद उत्पन्न होतो हे आपल्याला माहीतच आहे. गुरुकृपेने जेंव्हा निद्रिस्त कुंडलिनी शक्ती जागृत होते तेंव्हा सुषुम्ना नाडीमध्ये अनाहत नाद निर्माण होत असतात. साधक ध्यानावस्थेत ते ऐकु शकतो. अनाहत नाद प्रथमतः येथे निर्माण होतात म्हणूनच या चक्राला अनाहत चक्र असे नामाभिधान प्राप्त झाले आहे.

अनाहत चक्र हे वायुतत्वाचे स्थान आहे. श्वसन संस्थेशी अर्थात वायूशी संबंधित असलेली  फुप्फुसांसारखी इंद्रिये अनाहत चक्राच्या जवळ आहेत त्यावरून त्याचा वायुतत्वाशी असलेला संबंध सहज लक्षात येण्यासारखा आहे. म्हणूनच की काय अनाहत चक्राचा रंग वायूशी साधर्म्य दाखवणारा धुम्रवर्ण किंवा नीलवर्ण असा मानला गेला आहे. वायुतत्वाचे बीज असलेले  ‘यं’ हे बीजाक्षर अनाहत चक्राला दिले गेले आहे. अनाहत चक्राचा हरीण या प्राण्याशी संबंध दर्शवलेला आहे. वायुवेगाने धावू शकणारे हरीण हे वायुतत्वाला साजेसे आहे हे उघडच आहे. अनाहत चक्राचा प्रभाव हृदय, फुफ्फुसे, छाती, थायमस ग्रंथी या भागांवर चालतो. कुंडलिनी योगशास्त्रात चक्रांना ‘कमळे’ असेही म्हटले जाते. त्यानुसार अनाहत कमल हे बारा पाकळ्यांनी अथवा दलांनी युक्त आहे. त्या बारा पाकळ्यांवर अनुक्रमे कं, खं, गं, घं, ङं, चं, छं, जं, झं, ञं, टं, ठं ही अक्षरे विराजमान आहेत. संस्कृत वर्णमालेतील त्या त्या अक्षरांची स्पंदने अनाहत चक्राशी निगडीत आहेत असा त्याचा योगगर्भ अर्थ आहे.

अशा या अनाहत चक्रात मनाचा वास मानला गेला आहे. मन याचा अर्थ मानवी जीवनातील भाव-भावना. तात्पर्य हे की अनाहत चक्र मनोव्यापार आणि भावना यांवर ताबा ठेवणारे चक्र आहे. मानवी भावभावनांची अभिव्यक्ती असंख्य प्रकाराने होत असते. त्यातील काही भावना योगमार्गाला पोषक असतात तर काही योगमार्गाला मारक असतात. उदाहरणार्थ - काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य यांसारख्या भावना योगजीवनाला मारक ठरतात. याउलट निखळ प्रेम, भक्ती, अनासक्ती, वैराग्य अशा भावना योगजीवनाला पोषक ठरतात. षटचक्रांचा विचार केल्यास अनाहत चक्र हा चक्रसंस्थेचा मध्य ठरतो. मुलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर ही खालील तीन चक्रे भोगासक्ती प्रधान तर विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार ही वरील तीन चक्रे वैराग्य प्रधान. त्यामुळे सर्वसाधारण साधकासाठी अनाहत चक्र ह्या दोन्ही टोकांचा सुवर्णमध्य ठरतो.

वरील विवेचनावरून अनाहत चक्र आणि भक्ती यांचा अन्योन्न संबंध कसा आहे हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. भक्ती ही  सुद्धा मनाची एक अभिव्यक्ती असल्याने अनाहत चक्रच्या जागृतीचा आणि भक्तीच्या तीव्रतेचा थेट संबंध आहे. योग-अध्यात्म मार्गावर अनेक प्रकारचे साधक आढळतात. सर्वांचीच परमेश्वरावरील भक्ती सारखी असत नाही. मंद, मध्यम, तीव्र आणि तीव्रतर असे साधकांचे भेद सांगितले जातात. त्या भेदांनुसार साधकाच्या भक्तीची तीव्रताही भिन्न भिन्न असते. अनाहत चक्र किती प्रमाणात शुद्ध झाले आहे, किती प्रमाणात ‘उधडले’ आहे त्यावर ही भक्तीची तीव्रता अवलंबून असते.

अनाहत चक्र हे ‘विष्णू ग्रंथी’ चे स्थान मानले गेले आहे. ग्रंथी या शब्दाने भावभावनांचे बंधन असा अर्थ सूचित केला गेला आहे. विष्णू ग्रंथीचे भेदन झाले अर्थात भावभावनांवर पूर्ण ताबा मिळाला की भक्तीची प्रगल्भताही वाढत जाते. ‘गौणी भक्ती’ कडून साधक ‘परा भक्ती’ कडे प्रस्थान करतो. या सर्व प्रवासात गुरुप्रसादाने जागृत झालेली कुंडलिनी, तिने केलेले अनाहत चक्राचे उन्मीलन, शक्तीने केलेले विष्णू ग्रंथीचे भेदन या गोष्टी महत्वाच्या ठरतात.

अनाहत चक्राचा भक्तीशी कसा घनिष्ठ संबंध आहे जाणून घेतल्यावर आता कुंडलिनी योगशास्त्रात भक्ती द्वारे ध्यान आणि तदनंतर समाधी कशी साधता येईल ते पाहुया. घेरंड मुनींच्या ‘घेरंड संहितेत’ या विषयाचे विवरण केलेले आहे. घेरंड मुनींनी ध्यान तीन प्रकारचे सांगितले आहे – स्थूल ध्यान, ज्योतीर्ध्यान आणि सूक्ष्म ध्यान. पैकी स्थूल ध्यान भक्तीमार्गाशी निगडीत आहे. स्थूल ध्यानाचेही दोन प्रकार घेरंड संहितेत वर्णन केले आहेत. त्यापैकी एक अनाहत चक्राशी आणि एक सहस्रार चक्राशी निगडीत आहे. अर्थात सर्वसाधारण साधकाच्या दृष्टीने प्रथम अनाहत चक्र आणि मग सहस्रार चक्र असा क्रमच श्रेयस्कर आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखात आपण अनाहत चक्राशी निगडीत असा पहिला प्रकारच विचारात घेणार आहोत.

घेरंड मुनी म्हणतात –

अथ स्थूलध्यानम् -
स्वकायहृदये ध्यायेत् सुधासागरमुत्तमम्।
तन्मध्ये रत्नद्वीपं तु सुरत्नवालुकामयम् ॥
चतुर्दिक्षु नीपतरुं बहुपुष्पसमन्वितम्।
नीपोपवनसंकुलैर्वेष्ठितं परिखा इव ॥
मालतीमल्लिकाजातीकेशरैश्चम्पकैस्तथा।
पारिजातैः स्थलपद्मैर्गन्धामोदितदिङ्मुखैः ॥
तन्मध्ये संस्मरेद्योगी कल्पवृक्षं मनोहरम्।
चतुःशाखाचतुर्वेदं नित्यपुष्पफलान्वितम् ॥
भ्रमराः कोकिलास्तत्र गुञ्जन्ति निगदन्ति च।
ध्यायेत्तत्र स्थिरो भूत्वा महामाणिक्यमण्डपम् ॥
तन्मध्ये तु स्मरेद्योगी पर्यङ्कं सुमनोहरम्।
तत्रेष्टदेवतां ध्यायेत्यद्ध्यानं गुरुभाषितम् ॥७॥
यस्य देवस्य यद्रूपं यथा भूषणावाहनम्।
तद्रूपं ध्यायते नित्यं स्थूलध्यानमिदं विदुः ॥

वरील श्लोकांचा थोडक्यात सारांश असा की साधकाने आपल्या हृदयात ध्यान लावावे. अशी कल्पना करावी की त्या ठिकाणी अमृताने भरलेला सागर आहे. त्या सागरामध्ये एक रत्नखचित द्वीप आहे. त्या द्वीपावरील वाळू रत्नांच्या चूर्णासारखी लखलखीत आहे. या द्वीपात फळांनी लगडलेले आणि फुलांनी बहरलेले अनेक वृक्ष आहेत. त्या वृक्षांनी त्या द्वीपाची शोभा वृद्धिंगत झालेली आहे. अनेक प्रकारचे सुगंधी वृक्ष जसे मालती, मल्लिका, चमेली, केशर, चंपा, पारिजात, आणि स्थलपद्म त्या द्वीपावर सर्वत्र विखुरले आहेत. त्या द्वीपाच्या कानाकोपऱ्यात या फुलांचा सुगंध दरवळत आहे.

अशी कल्पना करावी की या द्वीपाच्या मध्यभागी एक मनोहर कल्पवृक्ष आहे. त्याच्या चार फांद्या चार वेदांचे प्रतिनिधित्व करत आहेत. हा सुंदर कल्पवृक्ष फळाफुलांनी बहरलेला आहे. संपूर्ण द्वीपावर कोकीळ पक्षी आणि भ्रमर यांचा गुंजारव कानी पडत आहे. या द्वीपावर एक चबुतरा आहे. तो अनेक प्रकारच्या हिरे, माणिक, रत्ने यांनी मढवलेला आहे. त्या चबुतऱ्यावर तुमचे इष्ट दैवत विराजमान झालेले आहेत. आता आपल्या इष्ट दैवातेवर आपल्या गुरुंनी  सांगितलेल्या पद्धतीने ध्यान करावे. आपापल्या इष्ट स्वरूपानुसार आवाहन करून वस्त्र, अलंकार, वाहन इत्यादी गोष्टींचे ध्यान करावे. त्या रूपाशी तादात्म्य साधण्याचा सराव करावा. यालाच विद्वान स्थूल ध्यान असे म्हणतात.

घेरंड मुनींनी सांगितलेली स्थूल ध्यानाची पद्धत किती छान, सोपी आणि अप्रगत साधकाच्या मनाला सुद्धा गोडी लावणारी आहे हे वरील वर्णन वाचताच लक्षात येते. घेरंड मुनींनी उल्लेखलेले हृदय स्थान हे अनाहत चक्राच्या प्रभावाखालील स्थान आहे हे सहज लक्षात आल्याशिवाय रहात नाही. आपापल्या श्रेद्धेनुसार इष्ट म्हणून येथे आपापल्या गुरुदेवांचे ध्यानही करता येईल.

दृढपणे साधनारत रहाणाऱ्या आणि वरील प्रमाणे भक्तीयुक्त ध्यान करणाऱ्या साधकाला यथावकाश भक्तीयोगातील समाधी अवस्था प्राप्त होते. त्याविषयी घेरंड मुनी सांगतात –

अथ भक्तियोगसमाधिः-
स्वकीयहृदये ध्यायेदिष्टदेवस्वरूपकम्।
चिन्तयेद् भक्तियोगेन परमाह्लादपूर्वकम् ॥
आनन्दाश्रुपुलकेन दशाभावः प्रजायते।
समाधिः सम्भवेत्तेन सम्भवेच्च मनोन्मनी ॥

याचा थोडक्यात अर्थ असा की आपल्या हृदयात अर्थात अनाहत चक्रात आधी वर्णन केल्याप्रमाणे आपल्या इष्ट दैवतेच्या स्वरूपाचे ध्यान करावे. हे ध्यान अतिशय भक्तिपूर्वक आणि आल्हाद्पुर्वक करावे. या ध्यानाने अष्टसात्विक भाव जागुत होतात, आनंदाश्रू वाहू लागतात आणि शरीर पुलकित होऊन उठते. मन अतिशय एकाग्र होऊन उन्मन होते आणि समाधी लागते.


घेरंड मुनींनी केलेले हे वर्णन वाचूनच भक्तिभावाने ओथंबून जायला होतं मग साधनारत राहणाऱ्या साधकांना प्रत्यक्ष अनुभूतीही मिळेल यात शंकाच नाही. भक्तीचा हा अनाहत सर्व साधकांना लाभो अशी श्रीदत्तचरणी  प्रार्थना करून हा लेख संपवतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 11 November 2016


Tags : Meditation Kundalini Chakras