Learn the royal path of Ajapa Yoga. Course conducted by Bipin Joshi in Thane. Read more...

गुरुचा शोध

मराठी माणसाला ज्ञानेश्वरीची निराळी ओळख सांगण्याची गरज नाही. मीही ज्ञानेश्वरी विषयी बरेच वाचले होते पण संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष अभ्यासण्याचा योग कधी आला नव्हता.  त्या दिवसानंतर प्रथमच मी ज्ञानेश्वरी अथ पासून इति पर्यंन्त वाचून काढली. सहाव्या अध्यायाने मला वेडावून टाकले.

नागिणीचे पिले । कुंकुमे नाहले । वळण घेऊनि आले । सेजे जैसे ॥
तैशी ती कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निदेली असे ॥

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर कुंडलिनी जागृतिचे अनुभव एकामागून एक उलगडत  होते. कुंडलिनी योग आत्मसात करण्याचा मनाचा निश्चय आपोआप दृढावत गेला. नंतर हठयोग प्रदिपीका, घेरंड संहिता, शिव संहिता, योग उपनिषदे इत्यादी ग्रंथांबरोबरच रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, परमहंस योगानंद, परमहंस सत्यानंद सरस्वती इत्यादींचे लेखन अभ्यासले. त्या वरून एक गोष्ट लक्षात आली की या मार्गावर गुरू पाहिजे. झाले. गुरूचा शोध सुरू झाला.

प्रथम ठाणे-मुंबई परिसरातील मान्यवर योग संस्थांची माहिती काढली. असे लक्षात आले की बहुतेक सर्वच संस्थांचे ध्येय 'आरोग्यासाठी योग' हे आहे. कुंडलिनी योग खात्रिशीरपणे कोणीच शिकवत नव्हते. त्या नंतर काही योगशिक्षकांना भेटलो. पण ते सगळे पुस्तकि पंडित निघाले. ते कुंडलिनी विषयी उत्साहाने बोलत पण मी जेंव्हा त्यांना उत्सुकतेपोटी विचारी कि 'तुम्ही कुंडलिनी जागृती अनुभवली आहे का?' तेंव्हा ते गडबडून जात. काही प्रामाणिक पणे 'नाही' असे उत्तर देत, काही हा मार्ग धोकादायक आहे असे सांगत तर काही या माझ्या प्रश्नावरच वैतागत (कधी कधी सत्य स्विकारणे किती अवघड असते!). कृपया लक्षात घ्या की या प्रश्नांमागील माझा प्रामाणिक हेतू योग्य गूरू मिळवणे हा होता. कोणाला कमी लेखणे हा हेतू कधीच नव्हता. असो.

शेवटी एक दिवस निर्णय घेतला की हे 'गुरू शोधन' बंद करायचे व स्वत:च काही निवडक साधना सूरु करायच्या. गुरू शिवाय हा मार्ग कठीण आहे ह्याची कल्पना होती पण 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' हे पटत नव्हते. योग्य गुरू मिळेपर्यंत तरी आपली आपण साधना करावी असा निश्चय केला. एका शुभ दिवशी पहाटे लवकर उठलो. स्नान करून इष्ट देवतेची व ज्ञानेश्वरीची पूजा केली. त्यानंतर ज्ञानेश्वरीला गुरू ग्रंथ मानून कुंडलिनी योग साधनेची शपथ घेतली.

ज्ञानेश्वरी व शिव संहितेतील साधनांनी मला जास्त आकर्षित केले होते व त्यांतील काही निवडक प्राणायाम, मुद्रा व धारणा मी करू लागलो. सुरवातीस थोडे जड गेले पण काही काळानंतर सर्व सुरळीत सूरु झाले. नोकरी करत असल्याने योग ग्रंथात सांगितल्या प्रमाणे दिवसातून चार वेळा प्राणायाम जमत नसे. तरी दिवसातून तीन वेळा मी प्राणसाधना करू लागलो. त्यातील एक वेळ मध्यरात्री बारा नंतरची असे. रात्रीच्या नि:शब्द गूढ अंधारात शिव संहितेतील मंत्र आठवत आठवत साधना करण्यात काही औरच मजा वाटे. या मध्यरात्रीच्या साधनेमूळे दिवसा खूप झोप येत असे पण कालांतराने त्याची सवय झाली. काही महिन्यांच्या नियमीत सरावानंतर काही छोटे छोटे अनुभव येऊ लागले. माझी 'स्वयं दिक्षा' कार्य करत आहे हे पाहून मनाला समाधान तर वाटलेच पण आपण योग्य मार्गाने जात आहोत याची खात्री पटत गेली. त्यावेळी मला माहीत नव्हते की काही वर्षांनी मला एक आगळीवेगळी दिक्षा मिळणार आहे.

महत्वाच्या टिपा:

  • मी स्वत: प्रत्यक्ष गुरुशिवाय साधना केली याचा अर्थ मी हाच मार्ग सर्वांना सुचवत आहे असे मानण्याचे अजिबात कारण नाही. य़ोग्य गुरू भेटल्यास अवश्य त्याच्या चरणांशी बसून साधनामार्गावर आरूढ व्हावे.
  • नवीन साधकांना सांगावेसे वाटते की त्यांनी प्राणायाम अतिशय काळजीपूर्वक करावा. सुरवातीला दिवसातून फक्त एकदाच मोजक्या प्रमाणात प्राण साधना करावी. कुंभक आणि आवर्तने अतिशय सावकाश वाढवावीत. अति प्राणायामाने कुंडलिनी फार लवकर जागृत होऊ शकते आणि बर्‍याचदा अशी जागृत झालेली शक्ती हाताळण्यास कठीण जाते.

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'देवाच्या डाव्या हाती' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 02 Jun 2009


Tags : योग अध्यात्म शिव कुंडलिनी चक्रे साधना देवाच्या डाव्या हाती लेखमाला पुस्तके