Untitled 1

मच्छिंद्रनाथांचा कौलाचार  


(Image is used for representation purpose only.)

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एक किंवा एकापेक्षा अधिक भूमिका (मुलगा, वडील, भाऊ, मॅनेजर, बिझनेसमन वगैरे वगैरे) निभावत असतो. या प्रत्येक भूमिकेचे काही आचार-विचार असतात. अध्यात्मिक जीवनही त्याला अपवाद नाही. प्राचीन काळी भारतात अध्यात्ममार्गांचा जो वटवृक्ष बहरला होता त्या वृक्षाला अनेक फांद्या होत्या. प्रत्येक फांदीच स्वतःच असं एक वैशिष्ठ होतं आणि आचार-विचारही होते.

त्यातीलच एक समृद्ध शाखा म्हणजे नाथ संप्रदाय. नाथ पंथाचा आचार-विचार म्हटलं की लोकांना गोरक्षनाथांचा सिद्ध-सिद्धांत-पद्धती आठवतो. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक असणाऱ्या गोरक्षनाथांनी लिहिलेला सिद्ध-सिद्धांत-पद्धती हा नाथ पंथीयांसाठी प्रमाणग्रंथ आहे हे खरेच परंतु नाथ संप्रदायाचा सखोल अभ्यास केल्यास आपल्याला त्याची पाळेमुळे मच्छिंद्रनाथांच्या मूळ पंथाशी अर्थात कौलमार्गाशी घेऊन जातात.

कौलामार्गाचे आचार-विचार कौलाचार म्हणून प्रसिद्ध आहेत. आजच्या या पोस्ट मध्ये कौलाचाराच्या फार खोलात जात नाही पण प्राचीन ग्रंथांत वर्णन केलेले "सप्त आचार" थोडक्यात खाली देत आहे :

१. वेदाचार

२. वैष्णवाचार

३. शैवाचार

४. दक्षिणाचार

५. वामाचार

६. सिद्धांताचार

७. कौलाचार 

हे सात आचार एकापेक्षा एक श्रेष्ठ मानले गेले आहेत.  याचा अर्थ असा की सर्वात श्रेष्ठ आचार आहे "कौलाचार". कौलाचारापेक्षा श्रेष्ठ आचार अन्य कोणताही नाही. प्राचीन ग्रंथांत या आचारांचे वर्गीकरण साधकाच्या "पशु", "वीर", आणि "दिव्य" भावांप्रमाणे केलेलेही आपल्याला आढळून येते. कौलाचाराचेही "अशुद्ध" आणि "शुद्ध" असे विभाग पाडता येतील.

मच्छिंद्रनाथ हे कौलमार्गी सिद्ध होते. कौलमार्गाला सोडचीठ्ठी देऊन त्यांनी भगवान दत्तात्रेयांच्या आदेशाने योग-प्रधान अशा नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. परंतु कौलाचाराची शिकवण नाथ पंथात सूक्ष्म रूपाने कायमची घर करून राहिली. मच्छिंद्रनाथांच्या या शिकवणीवर वैराग्यशील गोरक्षनाथांनी पंथाचे पुढील प्रवर्तन केले.

आज "कौलाचाराच्या" फार खोलात जात नाही पण "घटस्थापनेच्या" दिवशी हे सांगण्याचे कारण म्हणजे कौलमार्गात शक्ती उपासनेला आणि कुंडलिनी शक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. नवनाथांनी "शाबरी माई" ची उपासना करूनच लोककल्याणार्थ शाबरी-मंत्रांची रचना केली हे ही लक्षात घेण्यासारखे आहे.

आदीशक्ती जगदंबा कुंडलिनी सर्व अजपा साधकांना योग्य मार्ग दाखवो अशी विनम्र प्रार्थना करून लेखणीला येथेच विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 10 October 2018