Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

Untitled 1

श्रावणातील अजपा योग आणि शिव उपासना - पूर्वतयारी

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी संवाद साधला त्यातील अनेकांच्या मनात एक प्रश्न होता की लवकरच श्रावण येत आहे तर अजपा योगाभ्यासाच्या दृष्टीने काय आणि कशी तयारी करायची. या छोट्या पोस्ट मध्ये त्याविषयीच थोडक्यात जाणून घेऊ यात.

१. आपल्याकडे श्रावण दिनांक २९ जुलै रोजी सुरु होत आहे आणि दिनांक २७ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे हा महिनाभराचा कालखंड शिव साधनेसाठी उत्तम आहे.

२. घरात एखादी पूजा असेल तर आपण पुजेची काहीशी काळवंडलेली भांडी चासून पुसून लखलखीत करतो. या कालखंडात एक गोष्ट प्रामुख्याने करायची ती म्हणजे अजपा योगाच्या आपल्या सर्व क्रिया अशाच "घासून-पुसून" लखलखीत करून घ्यायच्या. बऱ्याच वेळा कालौघात क्रिया बोथट झालेल्या असतात. ध्यानधारणा यांत्रिकपणे होत असते. तो सगळा आळस आणि मरगळ झटकून टाकून क्रिया परत ताज्या टवटवीत मनाने होतील असे पहायचे.

३. या काळात अजपा योगात आपण वापरत असलेले सर्व मंत्र अगदी छानपणे वैखरी, उपांशु आणि मानसिक अशा तीनही स्तरांवर नीट बसवून घ्यायचे. बऱ्याच वेळा मानसिक जप करतांना जीभ किंवा ओठ हलवायची इच्छा होते. तसं होता कामा नये. मानसिक म्हणजे मानसिक. मनातून मंत्र मुखात उतरता कामा नये.

४. अजपा योगाचे फायदे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर दृगोचर होतात. हे घडण्यासाठी क्रियांची बैठक नीट बसलेली असायला हवी. एक क्रिया संपवून दुसऱ्या क्रियेत जाण्याचा जो भाग असतो तो मनाचा पोत विचलित होऊ न देता सफाईदारपणे झाला पाहिजे. क्रियांच्या आवर्तनांची मोजदात आणि वेळेची गणना सहज सफाईदारपणे व्ह्यायला हवी.

५. ध्यानाच्या लोकरीच्या आसनाला नीट प्रकारे सूर्य, चंद्र आणि अग्नि दाखवून घ्यायचे श्रावण सुरु होण्यापूर्वीच. ते विधी-विधान कसं करायच ते विस्ताराने आगोदरच सांगितले आहे. त्यामुळे येथे पुनरावृत्ती करत नाही.

६. रुद्राक्षाची धारण करण्याची आणि जप करण्याची माळ नीट साफ करून घ्यायची. या माळा घामाने आणि हातावर फिरवल्याने काहीशा तेलकट झालेल्या असतात. त्यांवर धूळ आणि मळ बसलेला असतो. तो सर्व नीट हलका साबण आणि टूथब्रश यांच्या सहाय्याने साफ करायचा. माळा कधीही ओल्या ठेवायच्या नाहीत. त्या स्वच्छ फडक्याने पुसून कोरड्या करायच्या. त्यांनाही सूर्य, चंद्र आणि अग्नि दाखवायचा आणि मगच वापरायला घ्यायच्या.

७. पूजेत असलेले शिवलिंग / फोटो / मूर्ती नीट साफ करून घ्यावा. या काळात नवीन शिवलिंग सुद्धा आणू शकता. काही वेळा असं होतं की लोकं मोठ्या उत्साहाने शिवलिंग स्थापन करतात पण नंतर रोजच्या-रोज त्याची पूजा-उपासना, साफ-सफाई आणि देखभाल करण्याचा कंटाळा करतात. खात्री वाटत नसेल तर नवीन काही खरेदी करण्यापेक्षा जवळपासच्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणेच जास्त श्रेयस्कर ठरते. योग्याचे स्वयंभू लिंग मुलाधारात आहे आणि जगदंबा कुंडलिनी त्यावर वेटोळे घालून सुखनैव पहुडलेली आहे. श्रीगणेश त्या स्वयंभू लिंगाचे सदैव रक्षण करत आहे. हे शिवलिंग योग्यासाठी जास्त महत्वाचे असते.

८. श्रावणात अजपा योगाच्या क्रियांना स्वरसाधना आणि नादश्रवण साधनेची जोड देण्याचा प्रयत्न करावा. विशेषतः झोपण्यापूर्वी अजपाची शेवटची क्रिया करत-करत काही काळ नादश्रवण करावे आणि मग निद्रिस्त व्हावे.

९. या कालखंडात शरीरशुद्धी किंवा आजकाल ज्याला चमकदार भाषेत Body Detox म्हणतात ती करण्याचा प्रयत्न करावा. गरम पाणी, मध, लिंबाचा रस ते त्रिफळा चूर्णापर्यंत अनेक गोष्टी यासाठी वापरता येतात. परंतु हे सर्व एखाद्या जाणकार तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने केल्यास अधिक चांगले राहील. नश्वर शरीरावर हे सगळे सोपस्कार करण्यामागे ज्ञानेश्वरीत सांगितलेला "पिंडे पिंडाचा ग्रासू" हा सिद्धांत आहे हे नेहमी लक्षात घ्यावे.

१०. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या कालखंडात आनंदी आणि उत्साही राहावे. आपण करत असलेली योगसाधना हे काही डोक्यावरचे ओझे नाही. योगसाधना स्वतःला नीट आतून-बाहेरून जाणून घेण्याचा एक प्रयत्न असतो. स्वतःतील चांगले आणि वाईट नीट उमगून घेऊन त्यांमध्ये सुधारणा करण्याचा तो एक उपक्रम असतो. अंतरंगात दडलेला आत्म्याचा सहज-आनंद परत प्रस्थापित करण्याचा तो एक यत्न असतो. हा यत्न जेवढ्या जास्त प्रमाणात तुमचा सहज स्वभाव बनून जाईल तेवढे तुम्ही या मार्गावर अधिक रमून जाल. अधिक अग्रेसर व्हाल.

असो.

हलाहलाच्या आगीला सहज रिचवणारा आणि भक्ताच्या हातच्या लोटाभर पाण्याच्या अभिषेकाने प्रसन्न होणारा शंभूमहादेव सर्व वाचकांचा श्रावण योगमय करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स साठी अजपा ध्यानाची ओंनलाईन सेशन्स. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 15 July 2022