पाच मिनिटांच्या पाच साधना

पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग ३ - भक्ति प्राणायाम)

लेखमालेच्या  या भागात आपण तिसर्‍या साधनेची माहिती घेणार आहोत. ही साधना भक्ति मार्गाकडे ओढा असलेल्या साधकांसाठी चांगली आहे. विशेषतः ज्यांना आपल्या उपास्य दैवतेची पूजा-अर्चा करायला आवडते त्यांना ही साधना छान वाटेल. या लेखापुरते या साधनेचे नामकरण आपण "भक्ति प्राणायाम" असे करू कारण यात भक्ति आणि प्राणायाम या दोघांचाही संगम आहे. आता साधना कशी करायची ते पाहू.

 • या साधनेकरता देवाला वाहता येतील अशी काही फुलं घ्या. एका मोठ्या तबकामध्ये त्या फुलांच्या पाकळ्या सुट्या करून एकत्र जमवून ठेवा.
 • घरातल्या एखाद्या शांत खोलीत किंवा देवघरात साधंनेकरता आसन घाला. आसन म्हणून चादरीची चौपदरी घडी आणि त्यावर सूती पंचा वापरू शकता.
 • आसनावर देवाच्या तसबीरीकडे किंवा मूर्ति कडे तोंड करून बसा. मनाला प्रसन्न वाटल्यासाठी उदबत्ती किंवा निरांजन लावू शकता.
 • डोळे मिटून शांत चित्ताने क्षणभर बसा.
 • आता डोळे उघडून देवाच्या तसबीरीकडे बघा. दैवतेच्या चित्राला किंवा मूर्तीला पायापासून डोक्यापर्यंत आणि डोक्यापासून पायापर्यंत असे नीट भक्तिपूर्ण नजरेने बघून घ्या.
 • आता तबाकातील फुलांच्या चिमुट-दोन चिमुट पाकळ्या उजव्या हातात घ्या.
 • डोळे उघडेच ठेवून श्वास हळू हळू दीर्घपणे आत घ्या. श्वास तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत भरला की तो आताच रोखून ठेवा. श्वास रोखल्यावर कोणताही अतिरिक्त तणाव जाणवता कामा नये.
 • आता आपल्या उपास्य दैवतेचा कोणताही स्तुतीपर श्लोक किंवा मंत्र हळू आवाजात शांत चित्ताने म्हणा. हा श्लोक मोठा असल्यास अति उत्तम. उदाहरणार्थ, देवीचा "सर्व मंगल मांगल्ये" हा श्लोक किंवा पुराणोक्त मृत्युंजय मंत्र.  
 • श्लोक पुर्णपणे म्हणेपर्यंत तुमचा श्वास आताच कोंडलेला असेल अर्थात तुम्ही कुंभक करत असाल.
 • श्लोक म्हणून पूर्ण झाला की हातातल्या फुलांच्या पाकळ्या दैवतेच्या चरणांशी अर्पण करा.
 • लगेच श्वास हळू हळू बाहेर सोडा. लक्षात ठेवा श्वास अत्यंत हळूवार आणि संथपणे बाहेर गेला पाहिजे.
 • हे या क्रियेचे एक आवर्तन झाले.
 • आता श्वास हळू हळू आत घेत परत पूर्वीप्रमाणे फुलांच्या पाकळ्या हातात घ्या.
 • अशी एका मागून एक आवर्तने ११, २१, ५१, १०८ अशा पटीत करा. सुरवातीला पाच मिनिटांत किती आवर्तने बसतात ते मोजा आणि मग तेवढी आवर्तने करा. जर अधिक वेळ देऊ शकत असाल तर आवर्तने वाढवा.

या साधनेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडलेला श्लोक किंवा मंत्र. जर हा मंत्र फार छोटा असेल तर कुंभक फारच थोडा काळ घडेल आणि जर मंत्र फार मोठा असेल तर कुंभक ताकदीबाहेर घडेल. थोड्याशा प्रयोगांनंतर तुम्हाला चपलख मंत्र सहज कळून येईल. ज्या व्यक्तींना ध्यानासाठी आवश्यक असलेले "डोळे मिटून बसणे" काही कारणाने जड जाते त्यांनाही ही साधना आवडेल.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 03 March 2014


Tags : योग अध्यात्म साधना प्राणायाम

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates