Difference between a Sadhaka

योगी कोणास म्हणावे?

योग-अध्यात्म शास्त्रामध्ये 'योगी' हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरला जातो. जर तुम्ही योगशास्त्राची विशेष ओळख नसलेल्या एखाद्या सर्वसामान्य भारतीयाला 'योगी म्हणजे कोण?' असा प्रश्न विचाराल तर तो सांगेल की योगी म्हणजे कोणी एक आत्मसाक्षात्कारी पुरुष, चमत्कार दाखवण्यात अतिशय पटाईत असा सिद्ध पुरुष वा सर्वसंग परित्याग केलेला, शीर्षासनसारखी आसने करणारा, ऊन-वारा-पाऊस यांचा काहीएक परिणाम न होणारा, बहुतेकवेळ हिमालयात घालवणारा असा बैरागी अथवा साधू. याउलट जर हाच प्रश्न तुम्ही अमेरिकेसारख्या एखाद्या पाश्चात्य देशातल्या व्यक्तीला विचारलात तर तुम्हाला 'योगा' करणारा एवढेच उत्तर मिळेल. त्यात परत 'योगा' म्हणजे बहुतेकवेळा 'योगा स्टुडियो'मध्ये जाऊन केलेली योगासने एवढाच अर्थ सांगणार्‍याला अभीप्रेत असतो. 'योगी' शब्दाबद्दलचे वरील दोनही समज अगदी टोकाचे आहेत. योगी म्हणजे काय याबाबत तुम्ही-आम्ही काही निर्णय देण्यापेक्षा गोरक्षनाथांसारख्या दिग्गजाचे याविषयी काय म्हणणे आहे ते पहाणे जास्त संयुक्तिक ठरेल तेव्हा या लेखात त्याविषयीच अधिक माहिती घेऊ.

गोरक्षनाथांनी आपल्या 'सिद्ध सिद्धान्त पद्धती' नामक ग्रंथाच्या सहाव्या उपदेशात योगी, सिद्ध आणि अवधूत या संज्ञांचा ऊहापोह केलेला आहे. सहाव्या उपदेशात ते म्हणतात -

योगी

योगोस्यातीति योगी।
जो योगमार्गाचे अनुसरण करतो तो योगी.

गोरक्षनाथ हे नाथसंप्रदायाचे प्रवर्तक आणि प्रसारक असल्याने येथे योग शब्दाने त्यांना नाथसंप्रदायोक्त कुंडलिनी योग सुचवायचा आहे. आता योगमार्ग म्हणजे काय? केवळ सकाळ संध्याकाळ काही साधना करणे म्हणजे योगमार्ग नव्हे. योगशास्त्राचे दहा यम आणि दहा नियम यांचे आयुष्यभर पालन म्हणजे योगमार्ग अथवा योगजीवन. हठयोग प्रदीपिकेत अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृति, दया, आर्जव, मिताहार आणि शौच हे दहा यम सांगितले आहेत. तर तप, संतोष, आस्तिक्य, दान, इश्च्वरपूजा, सिद्धांतवाक्य श्रवण करणे, लज्जा, मती, जप आणि हवन हे दहा नियम सांगितले आहेत. जी व्यक्ति आपल्या आयुष्यात योगसाधनेबरोबरच या वीस मूल्यांचे कसोशीने पालन करण्याचा प्रयत्न करते केवळ तीच व्यक्ति योगी या संज्ञेस पात्र आहे. योग्याच्या आयुष्याचे प्रथम उद्दीष्ट परमेश्वरप्राप्ती हे असते. अन्य गोष्टींना त्याच्या लेखी दुय्यम स्थान असते.

कुंडलिनी योगामार्गावरील योग्याच्या प्रगतिचे चार टप्पे सांगितले जातात. ते चार टप्पे म्हणजे :

  • आरंभ
  • घट
  • परिचय
  • निष्पत्ति

आरंभावस्थेत योगी योगजीवनाला सुरवात करतो. एखाद्या गुरुकडून दीक्षा घेऊन तो योगसाधनेत स्वतःला पारंगत बनवण्यात प्रयत्नशील असतो. योग्याचा गुरु तीन प्रकारचा असू शकतो - पुरुष गुरु, सूक्ष्म गुरु आणि दैवी गुरु. पुरुष गुरु म्हणजे हाडामासाच्या देहाने शिष्यांना ज्ञान प्रदान करणारा. सूक्ष्म गुरु म्हणजे असे सिद्ध जे सूक्ष्म रूपाने साधकाला दीक्षा देतात. अशी दीक्षा साधारणतः स्वप्नात अथवा ध्यानमग्न अवस्थेत प्राप्त होते. दैवी गुरु म्हणजे साधकाचे आराध्य दैवत. साधकाला आपापल्या पुर्वकर्मानुसार कोणत्या प्रकारचा गुरु प्राप्त होणार ते अवलंबून असते. गुरु कोणत्याही प्रकारचा असो साधक त्या त्या गुरुच्या आज्ञेनेच साधनारत होत असतो.

साधनामार्गावर साधकाची पावले घट्ट रूजली, तो साधनेत पारंगत झाला की घटावस्था सुरू होते. या अवस्थेत योगमार्गावरील प्रगतिची काही चिन्हे साधकाला दिसू लागतात. त्याचा प्राणमय कोष प्रस्फुटित होतो.

परिचय अवस्थेत साधकाची कुंडलिनी जागृत होते. प्राण सुषुम्नेत प्रवेश करू लागतो. चक्रभेदनाला सुरवात होते. योग्याला आपल्या पूर्व कर्माचे ज्ञान होते. लक्षात घ्या की कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हाच योगशास्त्रानुसार साधकाचे अध्यात्मजीवन खर्‍या अर्थाने सुरू होत असते म्हणून त्याला परिचय असे म्हटले जाते.

निष्पत्ति अवस्था एक उच्च कोटीची अवस्था आहे. या अवस्थेत योगी समाधीत स्थिर होतो. तहान-भूक इत्यादि शारीरिक विकारांपासून तो पूर्णतः अलिप्त असतो. त्याची कुंडलिनी सहस्रारात पोहोचते. त्याला आत्मसाक्षात्कार घडतो. तो आपल्या कर्मांचा समूळ नाश करतो. असा योगी सिद्ध बनायला पात्र बनतो.

अर्थात हे सांगितले पाहिजे की वरील वर्णन हे अगदी संक्षेपाने दिलेले आहे. त्यात अनेक सूक्ष्म स्तर आहेत. वरील प्रत्येक पायरी चढण्यास योग्याला अनेक वर्षांचा किंवा अगदी अनेक जन्मांचाही कालावधी लागू शकतो.

वरील विवरणावरून लक्षात आले असेल की योगी म्हणजे वरीलपैकी कोणत्यातरी एका अवस्थेपर्यन्त पोहोचलेला योगसाधक

सिद्ध

विश्वातीतम यथा विश्वमेकमेव विरजते । संयोगेन सदा यस्तू सिद्धयोगी भवेत्तू सः ॥
विश्वातीत (परमेश्वर) आणि विश्व एकच आहेत हे जो अनुभवतो आणि या संयोगावस्थेत जो सदासर्वकाळ स्थिर असतो तो सिद्ध.

योग्याने निष्पत्ति अवस्था प्राप्त केली की तो सिद्धावस्थेला पात्र ठरतो. सिद्ध अष्टसिद्धीना अगदी पुर्णपणे आपल्या ताब्यात ठेऊ शकतो. पंचमहाभूतांवर त्याची सहज सत्ता चालते. अर्थात तो अशा सिद्धिंचा उपयोग सत्कार्मांसाठीच करतो. सिद्ध जड देहाशिवाय विचरण करू शकतो. अनेक देह धारण करू शकतो अथवा निर्माण करू शकतो. अनेक पाखंडी छोट्या मोठ्या सिदधींच्या (ज्यांना योगशास्त्रात क्षुद्र सिद्धि म्हणतात) आधारे लोकांना चमत्कार दाखवून लुबाडतात. ते काही सिद्ध नव्हेत.

सिद्ध हा जीव, आत्मा आणि परमात्मा यातील एकीकरणाचा अनुभव अखंडितपणे घेत असतो. तो जरी जन्म-मृत्युच्या बंधनापासून मुक्त असला तरी शिवतत्वाच्या आज्ञेनेच ब्रह्मांडात विचरण करत असतो. पात्र योग्याना मार्गदर्शन करण्याचे कार्यही तो सिद्ध गुरु या नात्याने पार पाडत असतो. नाथ संप्रदायात असे चौर्‍याशी सिद्ध सांगितले आहेत. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे सर्वांना परिचित असलेले सिद्ध हे त्यांपैकीच. सिद्धांचेही त्यांच्या त्यांच्या मार्गानुसार प्रकार-उपप्रकार आहेत जसे कौल सिद्ध, नाथ सिद्ध इत्यादि.

हे ओघाने आलेच की प्रत्येक सिद्ध हा योगी असतो पण प्रत्येक योगी हा सिद्ध असेल असे मात्र नाही. 

अवधूत

यः सर्वान प्रकृतीविकारान अवधुनोतीत्यवधूतः।
जो सर्व प्रकृतीविकारांना आपल्यापासून दूर ठेवतो तो अवधूत.

अवधूत ही योगमार्गाची परमावस्था आहे. अत्रीपुत्र दत्तात्रेय हे अवधूत शिरोमणि आहेत. त्यांनीच भगवान शंकराच्या आज्ञेने मच्छिंद्रनाथांच्या माध्यमातून नाथ संप्रदायाची गुढी उभारली. अवधूत गीता, अवधूत उपनिषद इत्यादि ग्रंथांतूंनही अवधूत अवस्थेचे वर्णन आढळते. सिद्ध जरी उच्च कोटीचे असले तरी ते शेवटी मायेच्या अथवा प्रकृतीच्या अधिपत्याखालीच कार्य करतात. अवधूत हा प्रकृतीच्या कोणत्याही नियमांनी बांधला जात नाही. तो साक्षात शिवस्वरूप असतो.  अवधूतांचेही प्रकार आहेत जसे कौल अवधूत, शैव अवधूत, वीर अवधूत वगैरे. 

हे ओघाने आलेच की प्रत्येक अवधूत हा सिद्ध असतो पण प्रत्येक सिद्ध हा अवधूत असेल असे मात्र नाही.

ज्यांना योगमार्गाची प्रामाणिकपणे कास धरायची आहे अशा सर्वच साधकांनी योगमार्गाची ही गहन वाट लक्षात घेऊन कोणत्याही उथळ गोष्टींना आणि अहंकाराला महत्व न देता साधनारत रहावे हेच योग्य ठरेल.

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 09 July 2012


Tags : Yoga योग अध्यात्म हठयोग क्रियायोग अष्टांगयोग कुंडलिनी साधना नाथ