पाच मिनिटांच्या पाच साधना

पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग २ - श्वासानुसंधान)

मागील भागात आपण ॐकार साधनेची माहिती घेतली. या भागात आपण दुसर्‍या एका सूक्ष्म साधनेची माहिती घेणार आहोत. ही साधना करण्यासाठी तुम्हाला एक जपमाळ लागेल. ही जपमाळ रुद्राक्षाची वगैरे असण्याची अजिबात गरज नाही. अगदी साध्या प्लास्टीकच्या मण्यांची सुद्धा चालेल. या माळेचा उपयोग तुमची जाणीव साधनेवर ठेवण्याकरता होणार आहे. आता साधना काशी करायची ते पाहू.

  • घरातल्या एखाद्या शांत खोलीत किंवा देवघरात साधंनेकरता आसन घाला. आसन म्हणून चादरीची चौपदरी घडी आणि त्यावर सूती पंचा वापरू शकता.
  • आसनावर पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसा. डोळ्यावर भगभगीत प्रकाश पडणार नाही किंवा जोराने वारा येणार नाही असं पहा.
  • डोळे मिटून शांत चित्ताने क्षणभर बसा.
  • जपमाळ आपल्या उजव्या हातात ठेवा.
  • आता आपली जाणीव आपल्या श्वासांवर ठेवा. जाणीव ठेवणे म्हणजे केवळ होणारे श्वास-उच्छ्वास साक्षी भावाने अनुभवणे. प्रत्येक श्वासावाटे हवा आत येत आहे आणि उच्छ्वासावाटे हवा बाहेर जात आहे याची मनाने नोंद घेणे (किंवा "शोध" घेणे) एवढेच तुम्हाला करायचे आहे.
  • प्रत्येक उच्छवासा नंतर जपमाळेचा एक मणी पुढे सरकवा. अशा प्रकारे प्रत्येक श्वास माळेच्या सहायाने मोजा.
  • साधारणपणे माणूस मिनिटाला पंधरा ते अठरा वेळा श्वसन करतो (प्रत्येक साधकाच्या बाबतीत हा वेग वेगवेगळा असू शकतो). म्हणजे जपमाळेचे १०८ मणी फिरवण्यास ७-८ मिनिटे लागू शकतात. सुरवातीला पूर्ण माळ फिरवणे कठीण वाटले तर पाच मिनिटात जितके मणी फिरवता येतील तितकेच फिरवून थांबा.
  • एक माळ किंवा पाच मिनिटे झाली की माळ बाजूला ठेवा, क्षणभर मनात निर्माण झालेली शांतता अनुभवा आणि मग आसन सोडा.

या साधनेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्वासांची गती मुद्दामून बदलता कामा नये. नैसर्गिक पणे होणारे श्वसन तुम्ही केवळ मोजत आहात. त्यात अन्य कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नका (दीर्घ श्वसन, एक माळ संपवण्यासाठी भराभर श्वास घेणे वगैरे). ही साधना वाचल्यावर कदाचित फार सोपी वाटेल पण शंभरातल्या दहा लोकांनासुद्धा एकशेआठ पैकी एकशेआठ मणी जाणीव ठेऊन मोजता येत नाहीत. बहुतेकांना त्यांचे मन सहज चकवते आणि जाणीव भलतीकडेच ओढून नेते. पहा स्वतः अनुभव घेऊन!

ही साधना आजपा साधेनेची पूर्वतयारी म्हणून खूप उपयोगी आहे. या साधनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एका माळेच्या आतच मन शांत होते. साधकाला एकदम relaxed झाल्यासारखे वाटते. ज्या रोगांचे मूळ अवास्तव ताण-तणावात आहे (जसे उच्च रक्तदाब, निद्रानाश, स्वभावातील चिडचिड वगैरे) त्या रोगांमध्ये ही साधना चांगली उपयोगी पडू शकते.

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 25 February 2014


Tags : योग अध्यात्म साधना

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates