Learn the royal path of Ajapa Yoga. Course conducted by Bipin Joshi in Thane. Read more...

Untitled 1

भैरो बाबाचा जन्म आणि महात्म्य

आज भैरव जयंती आहे. आजच्या दिवशी भगवान भैरवनाथ उत्पन्न झाले अशी मान्यता आहे. भैरव भगवान उत्पन्न कसे झाले त्याची एक रोचक कथा पुराणांमध्ये वर्णन केलेली आपल्याला आढळते. ती थोडक्यात अशी...

एकदा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात भांडण सुरु झाले की विश्वात परम तत्व कोण आहे. ब्रह्मदेव म्हणत होता की माझामुळे जगाची उत्पत्ति झाली त्यामुळे अर्थातच मी श्रेष्ठ आहे. विष्णू त्याला समजावत होता की मुळात ब्रह्मदेवाची उत्पत्ति विष्णू नाभिकमलातून झालेली असल्याने ब्रह्मयाचे अस्तित्व विष्णूवर अवलंबून आहे. त्यामुळे अर्थातच विष्णू तत्व श्रेष्ठ आहे. हा वाद वाढतच गेला आणि त्यांच्यात जोरदार भांडण सुरु झाले. वेदांचे म्हणणे सर्वाना प्रमाण म्हणून शेवटी ते वेदांकडे निर्णय मिळण्यासाठी गेले. वेदांनी एकमुखानी सांगितले की ना ब्रह्मा श्रेष्ठ आहे ना विष्णू. चराचर जगत त्याच्यावर अवलंबून आहे ते शिव तत्वच सर्वश्रेष्ठ आहे.

वेदांचा हा निर्णय विष्णूने आदराने स्वीकारला पण ब्रह्मदेवाला तो रुचला नाही. ब्रह्मदेवाला मूलतः पाच मुखे होती. त्यांतील चार मुखे ज्ञान सांगत असत तर पाचवे "निरुद्योगी" मुख व्यर्थ बडबड करण्यात वेळ घालवत असे. वेदांचा हा निर्णय ऐकून ब्रह्मदेव रागावला आणि रागाच्या भरात त्याचे पाचवे मुख भगवान शंकराला शिव्याशाप देऊ लागले. जो शंकर दिगंबर अवस्थेत भस्म फासून स्मशानात रहातो तो श्रेष्ठ कसा? जो स्वतःचा महाल नाही म्हणून गिरीकंदरांत रहातो तो श्रेष्ठ कसा? जो भूताखेतांमध्ये रमतो, जो वेदबाह्य वर्तन करतो तो श्रेष्ठ कसा? अशा अनेक गोष्टी ते पाचवे मुख बरळू लागले.

एका मर्यादेपर्यंत भगवान शंकराने ही निंदा सहन केली. पण ब्रह्मदेव थांबत नाही हे पाहून मग मात्र रौद्र रूप धारण केले. शिवातेजापासून एक अक्राळ-विक्राळ पुरुष उत्पन्न झाला. त्याने शंकराला वंदन केले आणि आपल्या धारधार नखांनी ब्रह्माचे ते पाचवे मुख छेदून टाकले. त्या दिवसापासून ब्रह्मदेवाला चारच मुखे राहिली. त्या काळपुरुषाकडून ब्रह्महत्या घडली होती. त्यामुळे ते पाचवे मुख त्याच्या हाताला "पाप" म्हणून चिकटून राहिले.

भगवान शंकर त्या पुरुषाला म्हणाले - "तू भैरव या नावाने प्रसिद्ध होशील. तू जरी माझ्या आज्ञेने ब्रह्माचे मुख छेदले असलेस तरी त्यामुळे तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली आहे. आता तू पापक्षालनार्थ पृथ्वीवरची तीर्थे भ्रमण कर. ज्या ठिकाणी हे मस्तक तुझ्या हातापासून विलग होईल त्याठिकाणी तू स्थायिक हो. त्या ठिकाणी तू लोकांना मुक्ती प्रदान करणारा होशील. त्यांचे भय-कष्ट हरण करणारा होशील."

भैरवाने मग शिवाज्ञेनुसार भ्रमण सुरु केले. काशी क्षेत्री आल्यावर (कपाल मोचन तीर्थ) त्याच्या हातापासून ते मस्तक विलग झाले. त्याला ब्रह्महत्येपासून सुटका मिळाली. तो काशीला स्थायिक झाला. "काशी का कोतवाल" या नावाने तो आजही प्रसिद्ध आहे.

तर असा हा शंकराचा भैरव अवतार. भैरवाला काही ग्रंथांत काली मातेचा पुत्र किंवा शिव गण मानले आहे. तो क्षेत्रपालही आहे. जुन्या शिवमंदिरांमध्ये भैरव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवश्य विराजमान असतो. शंकराला भेटण्याआधी भैरवाची परवानगी घ्यावी लागते. त्याने आत सोडलं तरच शिवदर्शन संभव होतं अशी संकल्पना त्यामागे आहे. अनेक देवी मंदिरांमध्ये सुद्धा भैरव हा रक्षक किंवा द्वारपाल म्हणून आपल्याला दिसतो. भैरव हा जरी क्रूर, भयानक, काहीसा भयप्रद असा देव असला तरी भक्तांसाठी मात्र तो दयाळू असतो. आजही गावागावात "भैरो बाबा" किंवा "भैरवनाथ" म्हणून त्याची मंदिरं आढळतात. भैरवाची अनेक रूपे आढळतात ज्यांमध्ये "अष्टभैरव" प्रधान मानले जातात. 

नाथ संप्रदायाचे आणि भैरव देवाचा घनिष्ठ संबंध आहे. काही नाथ साहित्यात असा उल्लेख आढळतो की मच्छिंद्र - गोरक्ष आदी नाथांनी मंत्रयुद्ध करून अष्टभैरवांवर विजय मिळवला होता. असे असले तरी नाथ पंथात भैरव पूजनीय देव म्हणूनच ओळखला जातो. कोठेही त्याला कनिष्ठ वागणूक दिलेली आढळत नाही. त्याचे "काशी का कोतवाल" हे स्थान अढळ आणि आदरणीयच मानलेले आपल्याला दिसते. किंबहुना नाथ सिद्धांनी भैरवकृपेच्या जोरावर अनेक लोकोपयोगी गोष्टी साध्य केल्या असे म्हणता येईल. त्यामुळेच भैरव देवाचे शाबर मंत्रही खुप प्रचलित आहेत.

आजच्या दिवशी अनेक भक्तगण भैरव देवाची उपासना करतात. उपासनेमध्ये भैरव मंदिरात दर्शन घेणे, फुलं-तेल-नैवेद्य अर्पण करणे, स्तोत्र आणि नामस्मरण इत्यादींचा समावेश होतो.

असो. एका अर्थाने भैरव जन्म दुष्टांचा नाश आणि साधकांचे भयहरण या उद्देशांनी झालेला आहे हे स्पष्ट जाणवते. तेंव्हा तो भाव लक्षात घेऊन या शिवावताराच्या चरणी लीन व्हावे हे उत्तम.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 10 Nov 2017