Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

शिवभक्ताचे आचरण

प्रत्येक शिवभक्ताला आपले आध्यात्मिक आचरण कसे असावे ते माहित असणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने आजच्या काळाला अनुसरून सर्वसामान्य संसारी आयुष्य जगणार्‍या शिवभक्ताचे आचरण कसे असावे ते थोडक्यात येथे देत आहे. 

 • प्रत्येक शिवभक्ताने आपल्या घरात शिवलिंगाची पुजा अवश्य करावी. हे शिवलिंग पाषाण, धातू, स्फटीक अथवा पारद यांपासून बनलेले असावे. श्रीशंकाची तसबीर असो वा नसो पण शिवलिंग जरूर पुजनात ठेवावे. शिवलिंग पुजन करत असताना त्याचा तात्विक अर्थ लक्षात घ्यावा (त्यासाठी या लेखमालेचे आधीचे लेख वाचावे).

 • शिवभक्ताची दोनच आभुषणे असतात - रुद्राक्ष आणि भस्म. आर्थिक दृष्ट्या शक्य असेल तर दोन रुद्राक्षाच्या माळा जरूर बाळगाव्या. एक परिधान करण्यासाठी आणि एक जप करण्यासाठी. रुद्राक्षाचे शरीरावरील सुपरिणाम आधुनिक विज्ञानाच्या आधारे सिद्ध झाले आहेत. भस्म हे वैराग्याचे प्रतिक आहे. दररोज शिवपुजन केल्यावर वा स्नान केल्यावर भस्म जरूर लावावे. जर कार्यालयात जाताना कपाळाला लावलेले भस्म तेथील 'कॉर्पोरेट' वातावरणात बरोबर नाही असे वाटत असेल तर हृदयस्थानी ते लावावे. शेवटी शिव भक्ताच्या हृदयातच तर रहातो! भस्म लावताना 'रज-तम-सत्व' या त्रिगुणांची योगसाधनेने केलेली राख हा सांकेतीक अर्थ ध्यानात घ्यावा.

 • शिवमहिम्न स्तोत्राचे वा अन्य शिवस्तोत्रांचे रोज पठण करावे. मराठीतील 'शिवस्तुती' स्तोत्र प्रसिद्धच आहे. शिवगुणांचे किर्तन, भजन अवश्य करावे. शिवपुराण, शिवकथा यांचे वाचन करावे.

 • सोमवार, प्रदोष, शिवरात्र या दिवशी विशेष रूपाने साधना करावी. शक्य असेल तर उपवास करावा वा फालाहारावर रहावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा शिवमंदिरात अवश्य जावे.

 • व्यसने, मांसाहार, कांदा, लसूण आणि तामसिक पदार्थ यांपासून दूर रहावे. या सर्व गोष्टींचा ध्यानावर वाईट परिणाम होतो.

 • दररोज झोपताना दिवसभरातील सर्व कर्मे (चांगली आणि वाईट) मनोमन शिवचरणी अर्पण करावीत आणि मग शयन करावे.

 • शिवभक्ताने अन्य दैवतांची निंदा करू नये पण त्याचबरोबर शिवनिंदा जेथे होत आहे तेथे क्षणभरही थांबू नये. शिवनिंदकाची संगत कधीही करू नये.

 • जप आणि अजप ह्या शैव आणि नाथ पंथातील मुख्य साधना आहेत. त्या अवश्य कराव्यात. या साधनांनी कुंडलिनी सुखकारकपणे जागृत होते. या साधना शक्यतोवर एकाद्या गुरूकडून घ्याव्यात. मंत्र गुरूमुखातून का घ्यावा हे आपण आधी पाहिले आहेच.

 • शंकरासारखे श्रेष्ठ दैवत नाही, सुषुम्नेसारखा श्रेष्ठ मार्ग नाही, त्रिकुटीसारखे श्रेष्ठ तीर्थ नाही, अजपासारखा श्रेष्ठ जप नाही आणि शांभवी सारखी श्रेष्ठ मुद्रा नाही हे पक्के लक्षात ठेवावे.

 • योगमार्ग प्रत्यक्ष फल देणारा मार्ग आहे. पुस्तकी बडबडीचे येथे काम नाही. व्यर्थ चर्चा, वादविवाद इत्यादींमधे वेळ वाया न घालवता साधनारत असावे. आपणाला फार ज्ञान आहे असा गर्व कधीही करू नये. योगमार्ग हा समुद्र आहे त्यातील एक थेंब एका मानवी आयुष्यात मिळाला तरी जीवन धन्य आहे तेव्हा काही वर्षे साधना केली वा काही अनुभव आले म्हणजे आपले हात आकाशाला लागले अशा भ्रमात राहू नये.

 • योगमार्गातील यमनियम पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करावा.

 • शंकराचे मानवी रूप म्हणजे गुरू. गुरूतत्वाविषयी आपण आधी जाणून घेतले आहेच. जर तुम्ही कोणाला गुरू केले असेल तर गुरूभक्तीत चुकारपणा कधीही करू नये. पाखंडी गुरूंची सावलीही अंगावर पडू देऊ नये. जोवर गुरू मिळत नाही तोवर शास्त्रग्रंथांच्या आधारे नामस्मरणादी साधना कराव्यात.

वरील नियम पाळून साधनारत राहिल्यास एक ना एक दिवस सदाशिव प्रसन्न झाल्याशिवाय रहाणार नाही. जेवढी भक्ती अधिक तेवढी प्रगती अधिक. पराकोटीची भक्ती कशी असते? याच विषयी नाथसाहित्यात प्रचलित असलेली एक सुरस कथा सांगतो.

एकदा गोरक्षनाथ आणि शंकराचा मानसपुत्र वीरभद्र यांच्यात युद्ध सुरू झाले. वीरभद्र देव, यक्षिणी, गण यांच्यासह युद्धात उतरला. गोरक्षनाथांनी एकटे. त्यांनी आपल्या बाजूने लढण्यासाठी पूर्वी मृत झालेल्या रावण, कुंभकर्ण, मेघनाद इत्यादी सर्व राक्षसांना जिवंत केले. घनघोर युद्ध सुरू झाले. राक्षस जागे झालेले पाहून विष्णू घाबरला. तो गोरक्षनाथांना म्हणाला "या एकेका राक्षसाला मारण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागले. आता तु त्यांना परत उठवलेस. हे तु सर्वथा अनुचित केलेस. त्यांना परत नाहिसे कर." गोरक्षनाथ विष्णू आणि शंकराला म्हणाले "मी या सर्व वीरांना भस्मसात तर करीन पण त्यांच्याबरोबर वीरभद्र आणि अन्य देवसैन्यही मारले जाईल." दुसरा काही उपाय दिसेना तेव्हा नाईलाजाने शंकराने होकार दिला. गोरक्षनाथाने मग सर्व सैन्य जाळून भस्मसात केले. आपला मानसपुत्र वीरभद्र गेल्याचे शंकराला दुःख वाटले. तो मुक रुदन करू लागला. ते पाहून गोरक्षनाथांनी विचार केला "अरेरे! काय केले मी हे. बद्रिकारण्यात मी लहान असताना ज्या शिवशंकराने माझे पालनपोषण केले त्याच दयाळू शंकराला आज मी दुःख दिले." गोरक्षनाथ शंकराला म्हणाले "स्वामी! जर काहितरी उपायाने तुम्ही मला वीरभद्राच्या अस्थि या राखेतून ओळखून दिल्यात तर मी संजीवनी विद्येने त्याला परत जीवंत करीन." शंकर युद्धभुमीतून फिरू लागला. मृत वीरांची हाडे कानाला लावून पाहू लागला. वीरभद्र जेथे धारातीर्थी पडला होता तेथील हाडे कानाला लावताच त्यांतून "शिव शिव" असा शब्द उमटलेला त्याला ऐकू आला. ते ऐकून शंकर गोरक्षनाथांना म्हणाला "माझे सर्व गण शिवमय झालेले आहेत. माझ्या खेरीज अन्य नाम त्यांना ठावूक नाही. ह्या घे वीरभद्राच्या अस्थि." गोरक्षनाथांनी मग वीरभद्राला पुनः जीवंत केले.

भक्ती त्या शिवगणांसारखी असली पाहिले. श्वासाश्वासून, रोमारोमातून शिव हा एकच ध्यास उमटला पाहिजे. जीवंत असतानाच नव्हे तर मेल्यानंतरही शिवनामाची अवीट गोडी दरवळली पाहिजे. शिवनामापुढे चारी मुक़्ती तुच्छ! एकदा का स्वतःला सदाशिवाच्या हवाली केले की मग कर्ता करविता तोच. आपण फक्त त्याचे माध्यम!

श्रावण संपत आला आहे. तेव्हा आजच्या लेखाने या लेखमालेला विराम देणार आहे. खरे सांगायचे तर सदाशिवाबद्दाल जेवढे सांगावे तेवढे थोडेच आहे. जो या जगताला केवळ आपल्या अंशरूपाने व्यापून राहिला आहे त्याचे वर्णन अल्पमति मनुष्यप्राणी किती आणि कसे करणार. पुष्पदंत नामक गन्धर्वाने लिहिलेल्या शिवमहिम्नस्तोत्रात सांगितले आहे ते यथार्थच आहे की -

असितगिरीसमं स्यात कज्जलं सिन्धुपात्रे।
सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमुर्वी॥
लिखती यदि गृहित्वा शारदा सर्वकालं।
तदपि तव गुणानामीश पारं न याति॥

हे इश्वरा! सागराच्या पात्रात पर्वताएवढे काजळ कालवून शाई केली, कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी केली, लिहिण्यासाठी कागदाचे पान म्हणून पृथ्वी कल्पली आणि स्वतः सरस्वती जरी सर्वकाळ लिहीत बसली तरीही तुझ्या गुणांचा पार लागणार नाही.

॥श्रीत्र्यम्बकेश्वरार्पणमस्तु॥

या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'शिवोपासना' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या.


Posted On : 04 September 2010


Tags : शिव साधना लेखमाला भक्ती नाथ