Untitled 1

पिपीलिका मार्ग आणि विहंगम मार्ग

योगमार्गावरील साधकाला जर असं विचारले की योगमार्गाचे अंतिम उद्दिष्ट काय तर निर्विकल्प समाधी, मनाची निरुद्धावास्था, कैवल्य, परमपद, शिवत्व वगैरे उत्तरे मिळतील. अंतिम उद्दिष्ट म्हणून जी काही अवस्था शास्त्रग्रंथांत विषद केलेळी आहे ती प्राप्त करून घेण्याचे ढोबळमानाने दोन मार्ग प्राचीन योग्यांनी सांगितले आहेत. एक आहे पिपीलिका मार्ग आणि दुसरा आहे विहंगम मार्ग. याशिवाय मीन मार्ग, मर्कट मार्ग वगैरेही सांगितले जातात परंतु हे दोन प्रधान आहेत.

पिपीलिका म्हणजे मुंगी. समजा एखाद्या मुंगीला झाडाच्या शेंड्यावर जायचे आहे तर ती कशी जाईल? अर्थातच ती हळू हळू संथ गतीने चढत चढत तेथपर्यंत पोहोचेल. पिपीलिका मार्ग हा सुद्धा असाच आहे. हठयोगोक्त साधना जसे नेती-धौती-कपालभाती आदी शुद्धीक्रिया, आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा वगैरे करत टप्प्याटप्प्याने साधक ध्यानयोगाच्या वेशीपर्यंत पोहोचतो. हे उघड आहे की पिपीलिका मार्ग मुंगीप्रमाणे संथ गतीचा मार्ग आहे. पिपीलिका मार्ग हा संथ असला तरी तो निरुपयोगी आहे असे अजिबात नाही. अनेक साधकांना थेट ध्यानयोग नीट साधत नाही. त्यांना वर उल्लेखलेला क्रियात्मक पिपीलिका मार्गाच श्रेयस्कर ठरतो. पुढे शरीर-मनाची शुद्धी साधल्यावर मग ते ध्यानमार्गावर आरूढ होऊ शकतात.

विहंग म्हणजे पक्षी. समजा एकाद्या पक्ष्याला झाडाच्या शेंड्यावर जायचे आहे तर तो कसा जाईल? तो पक्षी काही मुंगीप्रमाणे हळू हळू चालत बसणार नाही. तो थेट उडत जाऊन झाडाचा शेंडा गाठेल. विहंगम मार्ग हा असा आहे. यात साधक टप्प्याटप्प्याने हळूहळू न जाता एकदम ध्यानयोगाच्या भूमीवर आरोहण करतो. ध्यानयोगोक्त साधना करणारा थेट अमनस्क योगाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत असतो. मनाला निर्विचार करून ते अ-मन करणे म्हणजे अमनस्क योग. हा योग साधण्याचे अनेक प्रकार आहेत जसे लययोगातील नादश्रवण किंवा राजयोगातील सगुण / निर्गुण ध्यान किंवा शांभवी मुद्रा / उन्मनी मुद्रा इत्यादी ध्यानात्मक मुद्रा. प्राणशक्तीच्या श्वास-प्रच्छ्वास रूपाने घटीत होणारी अजपा, सोहं, हंस,  अजपा गायत्री वगैरे नावांनी ओळखली जाणारी प्राचीन ध्यानपद्धती सुद्धा याच प्रकारात मोडते.

आता साधकाने पिपीलिका मार्गाने जावे की विहंगम मार्गाने जावे हे सर्वस्वी त्याच्या तयारीवर आणि आवडीवर अवलंबून आहे. विहंगम मार्ग जरी लवकर उद्दिष्टाप्रत नेणारा असला तरी तो सर्वांनाच जमेल असे नाही.  जर आवश्यक ती पूर्वपीठीका तयार न करता एखादा जर विहंगम मार्गांनी गेला तर त्याला निराशाच पदरी पडू शकते किंवा प्रगतीला खुप वेळ लागू शकतो. कदाचित अशी निराशा टाळण्यासाठीच पारंपारिक नाथ संप्रदायात हठयोगाला खुप महत्व प्राप्त झाले असावे. अर्थात हठयोगातील कठीण आसने, कुंभकयुक्त प्राणायाम, बंध, मुद्रा ह्या देखील सर्वांनाच जमतात असं नाही. सर्वांनाच त्यांची गरज असते असेही नाही. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात संत ज्ञानेश्वरांनी जो कुंडलिनी योग वर्णन केलेला आहे ती प्रामुख्याने ध्यान साधनाच आहे.  सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की ज्यांनी काही प्रमाणात तरी आंतरिक शुद्धी साधली आहे त्यांना विहंगम मार्ग अधिक योग्य ठरतो. साधकाने घायकुतीला न येता आपली विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला काय जमेल, रुचेल त्या बाबत निर्णय घ्यावा हे उत्तम राहील.

थोडे विषयांतर वाटले तरी एका प्रसिद्ध सत्पुरुषाच्या जीवनातील एक लीला प्रसंग येथे सांगावासा वाटतो...

एकदा हा सत्पुरुष जंगलात वास्तव्याला होता. एक दिवस जवळच्या गावातला एक माणूस त्याच्याकडे आला आणि म्हणाला - "मला मोक्ष दाखवा." तो सत्पुरुष अवधून वृत्तीचा आणि काहीसा फटकळ स्वभावाचा होता. त्याने ओळखले की या माणसाची अजून तयारी झालेली नाही. त्याने प्रथमतः त्या माणसाला "तू त्या वाटेला जाऊ नकोस" असे सांगितले. तो माणूस काही ऐकेना. तो सारखा त्या सत्पुरुषाचा पिच्छा पुरवू लागला. "मला मोक्ष दाखवा" अशी सारखी गळ घालू लागला. आग्रह करू लागला. असं करता करता एक वेळ अशी आली की तो सत्पुरुष संतापला. त्या माणसाला म्हणाला - "मुर्खा, हा बघ मोक्ष.". तत्क्षणी त्या माणसाला असे दिसले की आसमंतात असंख्य विषारी साप भरून राहिले आहेत आणि ते त्याच्याकडे पहात फुत्कार टाकत आहेत. हे दृश्य पाहून तो माणूस एवढा घाबरला की तो ठार वेडा झाला. इकडे तो सत्पुरुष शांतपणे जंगलात निघून गेला.

आपण कोठे प्रवासाला गेलो असतांना काही प्रवासी आपल्या पुढे गेलेले असतात तर काही आपल्या मागून प्रवास करत असतात. आपण काही त्या पुढे गेलेल्या प्रवाशांशी ईर्ष्या किंवा असूया बाळगत नाही. तसेच आपल्या मागून येणाऱ्या प्रवासांना हीन किंवा तुच्छ मानत नाही. आपण काय करतो तर आपला स्वतःचा प्रवास कसा सुगम आणि जलद गतीने होईल याकडे सारे लक्ष देतो. अनंताच्या वाटेवरती सुद्धा अशीच वाटचाल करणे, मग तो पिपीलिका मार्ग असो वा विहंगम मार्ग असो,  हितकर आहे.

असो.

जगद्नियंता सांब सदाशिव सर्व वाचकांना आपापल्या निवडलेल्या मार्गावरून सुखनैव मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणा आणि शक्ती देवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 03 June 2019