Untitled 1

सांत ते अनंत

मानवाच्या एकूण जडणघडणीत त्याच्या मेंदूची अत्यंत मोलाची भूमिका आहे. एके काळी माणूस जंगलात रहात असे. प्रगती करत करत तो आजच्या आधुनिक रहाणीमाना पर्यंत येऊन ठेपलेला आहे. हा त्याच्या भौतिक प्रगतीचा टप्पा विस्मयचकीत करणारा आहे. परंतु एक पटकन जाणवणारा विरोधाभास म्हणजे या प्रवासात माणसाच्या शरीरात मात्र तेवढा अमुलाग्र बदल झालेला नाही. हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाला जे शरीरावयव होते तेच आधुनिक मानवालाही आहेत. थोडक्यात सांगायचे तर मानवाच्या अवती-भोवतीच्या वातावरणात आणि जीवनशैलीत प्रचंड बदल झालेला आहे परंतु जीवन जगण्यासाठी त्याला ईश्वराने दिलेले जे उपकरण अर्थात शरीर ते मात्र फारसे बदललेले नाही.

शास्त्रज्ञ असे म्हणतात की मानवी मेंदू हा मुदामच काहीसा नकारात्मक पद्धतीने प्रोग्राम केला गेला आहे. दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे द्यायची झाली तर...

१. आपण जेंव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटतो तेंव्हा आपण पटकन त्याच्यावर भरवसा करत नाही. तो वाईट असेल, फसवा असेल अशी शंका आपल्या मनात कुठेतरी घर करून असते.

२. सर्वसाधारणपणे अन्न दिसतात पोटभर खाण्याची आज्ञा मेंदू सोडत असतो. नंतर अन्न नाही मिळालं तर? ही आशंका मनात कुठेतरी खोल रुजलेली असते.

३. आयुष्यात घडलेले वाईट प्रसंग मनात जास्त घट्ट रुजलेले असतात. माणसं असे प्रसंग किंवा घटना वारंवार उगाळताना दिसतात.

आधुनिक विज्ञानाने मानवी मेंदू विषयी बरंच संशोधन केलेलं आहे. शास्त्रज्ञांच्या मते मानवी मेंदूतील ही नकारात्मकता त्याच्या स्वसंरक्षणासाठी तयार झालेली आहे. आयुष्यात घडणारा प्रत्येक प्रसंग, मग तो चांगला सो अथवा वाईट, मनावर आपला ठसा उमटवून जातो. हा ठसा जेवढा खोल उमटला असेल तेवढा तो पुसण्यास कठीण. साधारणतः आयुष्यातील वाईट घटना खोल ठसा उमटवतात, चांगल्या घटना मध्यम स्वरूपाचा ठसा उमटवतात तर ना चांगल्या ना वाईट अशा घटना अस्पष्ट ठसा उमटवतात. असे असंख्य जन्मांतले असंख्य संस्कार मानवी मनावर होत असतात. माणसाच्या वर्तनातून अनेकदा हे संस्कार अभिव्यक्त होतांना आपल्याला दिसतात.

एखादा साधक जेंव्हा अध्यात्ममार्गावर येतो तेंव्हा त्याला ह्या नकारात्माकतेशी सामना करणे भाग पडते. अध्यात्म म्हणजे सांत ते अनंत असा प्रवास. मानवी मेंदू ह्या प्रवासासाठी लगेच तयार होत नाही. कारण आजवरच्या अनुभवांमुळे आणि संस्कारांमुळे तो मर्यादित जगण्याला सरावलेला असतो. सांत हा तुलनात्मक दृष्ट्या नकारात्मक प्रांत असतो तर अनंत हा सकारात्मक. पूर्व संस्कारांमुळे मन सांत प्रांतात स्वतःला रमवत असते. त्या पुढेही काही आहे हे त्याचा मेंदू सहज मान्य करत नाही. तुम्हाला असे अनेक साधक आढळतील की जे अनेक वर्ष साधना करत आहेत परंतु संस्कारांच्या सपाट्यातून अजूनही अडकल्यामुळे आध्यात्मिक प्रगतीस दुरावले आहेत.

जर यातून सुटका करून घ्यायची असेल तर प्रत्येक योगसाधकाला आपल्या मेंदूला rewire करणे आवश्यक असते. तेंव्हा कोठे एक दिवस तो "अहं" या स्तरावारून "सोहं" या स्तरावर पोहोचतो. समाधी या शब्दाचा अर्थं आहे बुद्धीची समानता. वरील विवेचनावरून योगिजन समत्वभावाचा संदेश का देतात ते ही सहज कळून येईल. समत्वभावाचा अंगीकार केल्याने मनावरील संस्कार अतिशय धूसर स्वरूपात होतात. परिणामी त्यांना पुसणे त्यामानाने सोपे असते. सुदैवाने ध्यानाच्या नियमित सरावाने असे rewiring शक्य होते. अर्थात त्यासाठी नियमित प्रयत्न आवश्यक ठरतात.

असो.

सर्व वाचक ध्यान मार्गाची कास धरून सांत ते अनंत या प्रवासात आगेकूच करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 18 Mar 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates