Untitled 1

अजपा साधनेतील तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान त्रिसूत्री

पतंजली योगसूत्रांत महर्षी पतंजलींनी साधी-सोपी परंतु योगसाधकाला अजपा साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरेल अशी त्रिसूत्री दिलेली आहे. पतंजली मुनींच्या शिकवणीनुसार ही त्रिसूत्री म्हणजे तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. या त्रिसुत्रीला त्यांनी क्रियायोग असं नाव दिलेलं आहे.

तपः स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोगः ॥

आजवर पातंजल योगसुत्रांच्या अनेक अभ्यासकांनी आणि जाणकारांनी या त्रिसूत्रीचे विश्लेषण आपापल्या कुवतीनुसार निरनिराळ्या प्रकारे केलेले आहे. त्यामुळे येथे मी या तीन गोष्टींचा सरधोपट प्रचलित अर्थ न सांगता त्यांचा अजपा साधनेच्या दृष्टीकोनातून अर्थ आणि अजपा साधनेशी त्यांचा कसा घनिष्ठ संबंध आहे ते सांगणार आहे.

तप या शब्दाचा जर शब्दशः अर्थ बघितला तर तो शरीर-मन तापवणे असा आहे. सर्व साधारण लोकांच्या मनात तप म्हणजे एका पायावर उन्हातान्हात उभे राहणे किंवा उपाशी राहून देह सुकवणे वगैरे कल्पना उभ्या रहातात. अनेक प्राचीन ऋषी-मुनींनी अशा प्रकारचे तप केल्याचे दाखले शास्त्रग्रंथांत मिळत असले तरी त्याचा योगाशास्त्रीय अर्थ आणि महत्व काही वेगळेच आहे.

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण नैसर्गिक वृत्तीनुसार आपापल्या Comfort Zone मध्ये रहायला शिकत असतो. कालांतराने हा Comfort Zone शरीर-मनाच्या एवढा अंगवळणी पडून जातो की शरीर-मन या Comfort Zone मधून बाहेर पडण्याची टाळाटाळ करू लागते. प्रत्येक माणूस कोणतेही कार्य इच्छा-ज्ञान-क्रिया या तीन शक्तींच्या जोरावर करत असतो. एकदा का Comfort Zone मध्येच रहाण्याची सवय लागली की मग माणसाच्या या त्रिशक्तीचा विकास खुंटतो. आपल्या मधील सुप्त सामर्थ्याचा विसर पडून या Comfort Zone मध्ये रहाण्यात तो धन्यता मानतो.

तप म्हणजे या रुळलेल्या Comfort Zone मधून जाणीवपूर्वक स्वप्रयत्नाने बाहेर पडणे. थोडक्यात तपाचरण म्हणजे इच्छा-ज्ञान-क्रिया या शक्ती आहेत त्यापेक्षा अधिक विकसित कशा होतील या उद्दिष्टाने केलेला काही गोष्टींचा अभ्यास किंवा सराव. एकदा का हे उद्दिष्ट नीट कळले की मग तुमच्या तपाविषयीच्या चुकीच्या आणि संकुचित कल्पना आपोआप गळून पडतील. हे नीट कळण्यासाठी तपाचे एक छोटे उदाहरण घेऊ. समजा तुम्ही रोज घड्याळाची पाच मिनिटे अजपा ध्यान करत आहात. काही महिन्यांच्या सरावाने तुमचे शरीर-मन त्या पाच मिनिटांच्या साधनेला Comfort Zone मानू लागते. बहुतेक सर्व साधकांचा असा अनुभव असतो की कोणतीही ध्यानात्मक साधना सुरु केली की सुरवातीचे काही दिवस ती चांगली होते. त्यानंतर मग कंटाळा येऊ लागतो. साधनेतील मन उडते. साधनेची टाळाटाळ सुरु होते. साधनेला बसलं की मन भरकटू लागते. असं का होतं? कारण मनाला आता ह्या "पाच मिनिटांची" सवय झालेली असते.

आता जर तुम्हाला मनाची ध्यान करण्याची क्षमता वाढवायची असेल तर तुम्हाला हा तयार झालेला Comfort Zone तोडावा लागेल. त्याशिवाय पुढचा Comfort Zone तयार होणार नाही. मग काय करता येईल? एक गोष्ट तुम्ही करू शकता तो म्हणजे अजपा जपाची "अनुष्ठाने" मधून-मधून करत रहायची. अनुष्ठान करत असतांना परमेश्वराला साक्षी मानून संकल्प सोडायचा की पुढील चाळीस दिवस (किंवा जेवढे दिवस तुम्ही ठरवले असतील तेवढे दिवस) कोणताही खंड न पाडता मी रोज पाच मिनिटा ऐवजी एक तास साधना करीन. आता जेंव्हा तुम्ही असा संकल्प सोडता तेंव्हा तुम्हाला तुमची इच्छा-ज्ञान-क्रिया शक्ती वाढवणे क्रमप्राप्त ठरते. अशी "अनुष्ठाने" वेळोवेळी केल्यानंतर एक दिवस असा येतो की एक तास अजपा जप करणे अगदी सहज जमू लागते. आता तुम्ही आधीच्या Comfort Zone मधून अधिक उन्नत अशा नवीन Comfort Zone मध्ये शिरकाव करता. मला वाटतं तपाचरणाचे रहस्य तुम्हाला आता कळले असेल.

या Comfort Zone चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो तुम्हाला तुमच्या मूळ उद्दिष्टाचा विसर पाडतो. क्षणभर थांबा आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे विचार करा की मी अमुक-अमुक वर्षांपूर्वी योगमार्गावर पाऊल टाकत असतांना ज्या काही संकल्पना घेऊन आलो होतो त्या आजही माझ्या मनात तशाच ताज्या आणि ठसठशीत आहेत का. तुमच्यापैकी अनेकांचे उत्तर नकारार्थी असेल. असं का होतं? कारण दैनंदिन आयुष्याच्या रेट्यात तुम्ही साधना तर करता पण त्या साधना करण्यामागचे उद्दिष्ट विसरता. नित्य साधना तुम्ही भलेही करत असाल पण ती साधना काळाच्या ओघात यांत्रिकपणे घडू लागले. त्या साधने मागील उद्दिष्ठ धूसर होऊ लागते. असं होऊ नये म्हणून तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते ती म्हणजे क्रीयायोगाचा दुसरा घटक अर्थात स्वाध्याय.

स्वाध्याय या शब्दाचा ढोबळ अर्थ जरी शास्त्र ग्रंथांचे अध्ययन असा असला तरी त्यामागील सूक्ष्म अर्थ ध्यानात घ्यायला हवा. आपण भगवत गीता, ज्ञानेश्वरी, उपनिषद वगैरे शास्त्रग्रंथ का वाचतो? आपण शास्त्रग्रंथ वाचतो ते त्यांतील अध्यात्म तत्वाचे विश्लेषण मनावर ठसावे म्हणून. शास्त्रग्रंथ हे काही कथासंग्रह किंवा कादंबरी नाहीत की जे एकदा वाचले तरी पुरातील. शास्त्रग्रंथ अथांग सागर आहेत. त्यांतील तत्वांचे मनन, चिंतन आणि अनुशीलन केल्यावरच ते ज्ञान मनावर ठसेल. अन्यथा कालांतराने ती धूसर होऊन परत ग्लानी येईल. अशा "ग्लानीत" कितीही साधना केली तरी ती कदापि फलीभूत होणार नाही. 

अजपा ध्यानाचा चरमबिंदू आहे "सोहं" अर्थात आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाची प्रत्यक्ष अनुभूती. परंतु ही अनुभूती काही एका दिवसांत येणारी नाही. अनेक वर्षांची कठोर साधना करावी तेंव्हाच हे साधू शकेल. जर शास्त्रग्रंथांतील सोहं भाव मनःपटलावर ताजा असेल तर साधनेला हुरूप येतो. साधना यांत्रिक न बनता ती एका विशिष्ठ सुस्पष्ट उद्दिष्टाप्रत नेणारी ठरते. अजपा साधनेचा "सोहं" भाव हा काही नुसता मानसिक उच्चारण्याचा जप मंत्र नाही. आपल्या विवेकबुद्धीने सोहं च्या गर्भित अर्थाकडे पाहिले पाहिजे. ज्ञानगर्भ अंतःकरणाने "अहं" ते "सोहं" आणि "सोहं" ते "ओम" पर्यंतची उत्क्रांती जाणून घेतली पाहिजे. स्वाध्याय या दुसऱ्या घटकाचे महत्व हे असे आहे.

पतंजली मुनींच्या क्रीयायोगातील तिसरा घटक आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे सर्व काही ईश्वराला समर्पित करणे. सर्वसाधारणपणे ईश्वर या शब्दाचा अर्थ God किंवा देव असा घेतला जातो. अजपा योगशास्त्राच्या दृष्टीने मात्र मी थोडा अधिक स्पष्ट आणि सूक्ष्म अर्थ सांगीन. जर योगशास्त्राचे ग्रंथ नीट अभ्यासले तर आपल्याला असं आढळेल की "ईश्वर" हा शब्द भगवान शंकराला उद्देशून वापरलेला आहे. अजपा योग हा शिवमुखातून पार्वतीला कथन केला गेलेला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. भगवान शंकराखेरीज अन्य कोणत्याही देवाला "ईश्वर" हा प्रतीवाचक शब्द सहसा वापरला जात नाही. भगवान शंकराचे कोणतेही स्थान घ्या - काशीविश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, रामेश्वर, महाकालेश्वर पासून ते अगदी कौपिनेश्वर पर्यंत "ईश्वर" हे नामाभिधान भगवान शंकराला उद्देशूनच वापरलेले आहे. शिव एकटा ईश्वर असून बाकी सारे जगत नश्वर आहे. अध्यात्म मार्गावर नानाविध श्रद्धास्थाने जोपासणारे साधक असतात परंतु ज्या प्रमाणे सर्व नद्या समुद्राला मिळतात त्या प्रमाणे सर्व मार्ग हे शेवटी निर्गुण निराकार "ईश्वराला" अर्थात शिवतत्वाला मिळतात.

दैनंदिन जीवनात साधकाच्या मनावर "मी" पणाची असंख्य पुटं चढत असतात. अगदी अजपा साधना सुद्धा अज्ञानी जीव "मी श्वास घेतो" या अहं भावनेसहित करत असतो. साधना करता करता जेंव्हा हे लक्षात येते की अरे श्वास "मी" घेत नसून शिवाची "जीवशक्ती" घेत आहे तेंव्हा अहं आपसूक गळून पडतो. श्वास घेणंही आपल्या हातातील गोष्ट नाही. ती ईश्वरी शक्तीच्या अखत्यारीतील गोष्ट आहे. हे एकदा अनुभवास आले की मग हातून घडणारे नित्य कर्म सुद्धा ईश्वरा प्रीत्यर्थ घडू लागते. सर्व काही ईश्वरासाठी करण्याची सवय अंगी भिनू लागते. ही कठीण गोष्ट आहे. इतक्या सहाजासहजी साधत नाही. परंतु निग्रहाने पुन्हा-पुन्हा प्रयत्न केल्यास हळूहळू जमू लागते. मग द्वैताकडून अद्वैताकडे जो प्रवास आहे त्यासाठी साधक तयार होतो.

वरील विवेचनावरून तुम्हाला अजपा साधकांसाठी तप-स्वाध्याय-ईश्वरप्रणिधान ही त्रिसूत्री कशी आवश्यक आहे ते उमगले असेल अशी आशा आहे.

असो.

अजपा गायत्रीचा स्वयमेव होणारा अमोघ जप सर्व योगाभ्यासी वाचकांना तप-स्वाध्याय-ईश्वरप्रणिधान ही त्रिसूत्री सुखपूर्वक प्रदान करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 02 March 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates