हठयोग प्रदीपिका - एक ओळख

लेखक : बिपीन जोशी

कुंडलिनी योगशास्त्रावर अनेक प्राचीन योगग्रंथ उपलब्ध आहेत. त्या सर्वांमधे हठयोग प्रदीपिका, घेरंड संहिता आणि शिव संहिता हे प्रमूख आहेत. यांमधेही हठयोग प्रदिपिका जास्त लोकप्रिय आहे. मनावर ताबा मिळवणे हे जरी अध्यात्म मार्गावरील प्रत्येकाचे उद्दिष्ठ असले तरी ते साधण्यासाठी अवलंबिलेले मार्ग वेगवेगळे असतात. योग्यांसाठी हा मार्ग असतो कुंडलिनी जागृतीचा आणि कुंडलिनी जागृतीसाठी हठयोग ही एक महत्वाची साधना पद्धती आहे.

हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ स्वात्माराम नामक नाथपंथीय योग्याने लिहिला आहे. स्वात्माराम नक्की कोण होता या विषयी हठयोग प्रदीपिकेत काही ठोस माहिती नसली तरी तो एक अत्यंत उच्च दर्जाचा योगी असला पाहिजे हे नक्की. त्याने हठयोग प्रदीपिकेच्या माध्यमातून हठयोगातील काही मार्गदर्शक तत्वे आणि साधना एकत्र संकलित केल्या. हठयोग प्रदीपिकेचे त्याने चार मुख्य भाग केले. ते असे:

 • आसने (67 श्लोक)
 • षट्कर्मे आणि प्राणायाम (78 श्लोक)
 • मुद्रा आणि बंध (130 श्लोक)
 • समाधी (114 श्लोक)

काही प्रतींमधे हठयोग प्रदीपिकेचा पाचवा भागही आढळतो जो चुकिच्या प्राणायामाने निर्माण झालेले रोग कसे घालवावे त्याची चर्चा आढळते. आसने आणि शुद्धीक्रिया यां द्वारे प्रथम शरीरशुद्धी करायची. त्यानंतर प्राणायामाने नाडीशोधन करायचे. मग मुद्रांद्वारे सुप्त कुंडलिनीला जागृत करायचे. शेवटी जागृत कुंडलिनीच्या मदतीने नादश्रवणाच्या अभ्यासाद्वारे समाधी साधायची असा मार्ग हठयोग प्रदीपिकेत सांगितला आहे.

हठयोग प्रदीपिकेतील साधनांचा विचार करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे:

 • हठयोग प्रदीपिका म्हणजे हठयोगावरील 'शेवटचा शब्द' नव्हे. या ग्रंथात स्वात्मारामाने आपल्या स्वतःच्या परम्परेला अनुसरून हठ शास्त्राची माहिती दिलेली आहे. हठयोगातही अनेक भिन्न भिन्न मतप्रवाह आणि विचारधारा आहेत.
 • हठयोग प्रदीपिकेत हठयोगातील सर्वच साधना दिलेल्या नाहित. उदाहरणार्थ स्वात्मारामाने जप, छायापुरुष दर्शन इत्यादी साधना दिलेल्या नाहीत परंतु या साधनाही नाथसंप्रदायामधे आणि अन्य ग्रंथांमधे महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत.
 • हठयोग प्रदीपिकेतील काही साधना अन्य योगग्रंथांतील त्याच नावाच्या साधनांशी जुळत नाहीत. उदाहरणार्थ हठयोग प्रदीपिकेतील वज्रोली, सहजोली आणि अमरोली शिव संहितेतील याच साधनांपेक्षा भिन्न आहेत. शक्तीचालन मुद्राही भिन्न आहे. तेव्हा स्वात्माराम ज्या संप्रदायाचा होता त्या संप्रदायाच्या पद्धती त्याने आपल्या ग्रंथात दिलेल्या आहेत असेच आपल्याला मानावे लागते.
 • हठयोग प्रदीपिकेतील सर्वच गोष्टी बरोबर वा ग्राह्य असतीलच असे नाही. हठयोग प्रदीपिकेशी समकालीन मानल्या गेलेल्या हठरत्नावली नामक ग्रंथात श्रीनिवासयोगी नामक लेखकाने स्वात्माराच्या काही मतांशी स्पष्टपणे असहमती दर्शवली आहे.
 • स्वात्माराने ज्या काळी हा ग्रंथ लिहिला त्या काळीही विविध संप्रयदायांमधे मतभेद होते असे दिसते. तेव्हा हठयोग प्रदीपिकेतील साधना आणि तत्वे ही स्वात्मारामाच्या पंथानुसार 'सर्वश्रेष्ठ' मानल्या गेल्या आहेत. इतर पंथांनी त्या तशा मानल्या असतीलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.
 • गोरक्षनाथ प्रणीत नाथ संप्रदाय हा एक शैव पंथ आहे. हठयोग प्रदीपिकेत नाथ संप्रदायाच्या तत्वज्ञानापेक्षा त्याच्या साधनांची चर्चा विस्तृतपणे केलेली आढळते. त्यामुळे काही ठिकाणी वाचक गोंधळून जाण्याची शक्यता आहे.
 • हठयोग प्रदीपिकेतील काही श्लोक आणि विचार हे स्वात्मारामाने अन्य तंत्रग्रंथांतून जसेच्या तसे घेतले आहेत (उदाहरणार्थ वज्रोली मुद्रा वा हठयोग गुप्त ठेवण्याबद्दलचे श्लोक). हाच प्रकार इतर योगग्रंथांतही दिसून येतो. याचा अर्थ असा की स्वात्मारामाने (आणि अन्य योगग्रंथांच्या निर्मात्यांनी) आपल्या ग्रंथाची निर्मीती करताना इतर कोणत्यातरी ग्रंथांचा सहाय्य ग्रंथ म्हणून उपयोग केला असणे शक्य आहे.

या लेखमालेद्वारे आपण हठयोग प्रदीपिकेतील काही महत्वाच्या तत्वांचा आणि साधनांचा विचार करणार आहोत. हठयोग प्रदीपिकेतील सर्वच श्लोकांचे भाषांतर देणे हा काही या लेखमालेचा हेतू नाही. केवळ निवडक महत्वाच्या श्लोकाचेच स्पष्टिकरण आपण येथे पाहणार आहोत. विशेषतः आपण योगासनांचा फारसा विचार येथे करणार नाही कारण आजकाल कोणत्याही योगासनांच्या पुस्तकात त्यांविषयी माहीती सहज मिळू शकते.

आशा आहे तुम्हाला ही लेखमाला आवडेल.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 05 November 2009


Tags : योग अध्यात्म हठयोग कुंडलिनी चक्रे साधना योगग्रंथ लेखमाला नाथ