Get initiated into Ajapa Dhyana and Kriya. Online guidance and initiation sessions for selected individuals and small groups by Bipin Joshi. More details here.

Untitled 1

श्रीगणपती विषयी दहा गोष्टी

गणपती हे सगळयांचेच आवडते दैवत आहे. महाराष्ट्रात तर घराघरात श्रीगणेशाची पूजा-उपासना होत असते. या दैवतेविषयी सर्वसाधारण लोकांना माहित नसलेल्या दहा गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

१. नाथ संप्रदायात श्रीशंकराचे नाव आहे आदिनाथ, पार्वतीचे नाव आहे उदयनाथ आणि श्रीगणपतीचे नाव आहे "गजबेली गजकंथडी नाथ". गजबेली म्हणजे हत्तीची सोंड आणि गजकंथडी म्हणजे हत्तीची कातडी अर्थात गजचर्म. याचा अर्थ असा की हत्तीसारखी सोंड असलेला आणि गजचर्मधारी नाथ सिद्ध योगी म्हणजे श्रीगजानन.

२. पार्वतीने गणपतीला आपल्या मळापासून बनवला अशी कथा सांगतात. पार्वती म्हणजे आदिमाया किंवा प्रकृति. मळ म्हणजे माती. माती म्हणजे पृथ्वीतत्व. त्यामुळेच श्रीगणेशाला पृथ्वीतत्वाचे दैवत मानतात.

३. सर्वसाधारणतः घराघरात श्रीगणेशाची उपासना वैदिक पद्धतीने करण्यात येत असली तरी गणेश उपासनेची आगमोक्त पद्धतीही आढळते. गणपतीचे अनेक प्रकारचे मंत्र आहेत जसे नाम मंत्र, वैदिक मंत्र, पौराणिक मंत्र, आगमोक्त मंत्र, शाबर मंत्र इत्यादी. त्यांतील योग्य मंत्र काळजीपूर्वक निवडणे आवश्यक ठरते. प्राचीन ग्रंथांत त्याविषयी विस्त्ताराने विधी-विधान आढळते. अर्थात अशी उपासना त्या त्या मार्गावरील योग्य गुरुच्या सानिद्धात राहून करणेच श्रेयस्कर ठरते.

४. गणपतीची भक्तीमार्गाने उपासना खरे तर सगळ्यांनी करायला पाहिजे. ज्यांची रास वृषभ, कन्या किंवा मकर आहे त्यांनी तर ती अवश्यमेव केली पाहिजे. येथे एक सांगू इच्छितो की आजकाल लोकांचा असा कल आढळतो की दैवतेविषयी थोडीफार भक्ती असली की झालं. मग उपासना कशीही आणि कधीही करा काही फरक पडत नाही. उपासना शास्त्राच्या दृष्टीने हे बरीबर नाही. आजच्या काळात कर्मकांडाचा अतिरेक टाळला पाहिजे हे जरी खरं असलं तरी उपासना हा काही पोरखेळ किंवा टाईमपास म्हणून करण्याची गोष्ट नाही. ती आवश्यक पत्थ्ये पाळून, उपास्य दैवतेचा यथोचित आदरसन्मान करून, विधी-विधानासहित केली तरच शीघ्र आणि पूर्ण लाभ मिळतो. त्यामुळे अनुभव सिद्ध ग्रंथांतून किंवा जाणकार व्यक्तीकडून नीट माहिती करून घ्यावी.

५. कुंडलिनी योगशास्त्रात गणपतीला मुलाधार चक्राची देवता मानतात. मुलाधार चक्र हे पृथ्वीतत्वाचे प्रधान स्थान आहे. कुंडलिनी योगी प्रथमतः गणेश उपासानेद्वारे मुलाधार जागृत करतो आणि मग गणपतीच्या आशीर्वादाने कुंडलिनीरुपी पार्वती अर्थात आदिमाया जागृत करतो. गणपती अथर्वशीर्ष सांगते - मूलाधारस्थितोऽसि नित्यम् - अर्थात गणपतीचा वास मुलाधार चक्रापाशी नित्य असतो.

६. अष्टमुखी रुद्राक्ष गणपती स्वरूप मानला जातो. त्यामुळे तो यथाविधी धारण केल्याने अथवा त्याचे पूजन केल्याने गणेश पूजनाचे फळ मिळते अशी मान्यता आहे. 

७. पृथ्वीतत्वाचा संबंध कफ प्रकृतीशी आहे. व्यावहारिकता, भैतिक सुख-समृद्धी, स्थिरता यांच्याशी सुद्धा आहे. गणपती या सर्व गुणांची अधिष्ठात्री देवता आहे.

८.  गणपतिला दुर्वा प्रिय आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे. पण या दुर्वा ताज्या, मृदू आणि कोमल असायला हव्यात. अशा दुर्वाना "बालतृणम्‌" म्हणतात.

९. गणपतीला "एकदंत" आहे पण या एका दाता संदर्भात विविध कथा आढळतात. एका कथेनुसार कैलास पर्वतावर विष्णुरूपी परशुराम श्रीशंकराला भेटायला गेले असता गणपतीने त्यांना अडविले. त्यानंतर परशुराम आणि गणपती यांच्यामध्ये झालेल्या युद्धात गणपतीला आपला एक दात गमवावा लागला. अन्य एका मान्यतेनुसार कार्तिकेय आणि गणपती लहान असतांना त्यांच्या भांडणात गणपतीचा दात तुटला.  अजून एका कथेनुसार गजमुखासूर नामक राक्षसाशी युद्ध करण्यासाठी शस्त्र म्हणून गणपतीने स्वतः आपला दात तोडला.

१०.  गणांचा अधिपती तो गणपती. पण हे पद गणपतीला केवळ श्रीशांकाराचा पुत्र म्हणून मिळालेलं नाही. गणपती उच्च कोटीचा योगी होता, सिद्ध होता, मुलाधाराचा आणि पृथ्वीतत्वाचा स्वामी होता. त्याच्या या योग्यतेच्या आधारावरच श्रीशंकराने त्याला हे पद प्रदान केलेलं आहे. भाळी चंद्र, नागाचे यज्ञोपवीत इत्यादी कुंडलिनी योगाचे सूक्ष्म संकेत दर्शवणारे अलंकार श्रीगणेशही धारण करतो ते त्यामुळेच. नाथ संप्रदायाच्या "नवनाथ" नामावलीत श्रीगणेशाला स्थान मिळाले आहे ते ही त्यामुळेच.

असो. सर्व वाचकांना श्रीगणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 25 Aug 2017
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates