Untitled 1

अजपा साधनेद्वारे भूतशुद्धी आणि कुंडलिनी चक्रधारणा

आज दिनांक ९ मार्च २०२० रोजी होळी साजरी होत आहे. आज संध्याकाळी तुमच्यापैकी अनेकजण उत्साहात होलिका दहन करणार असतील यात शंका नाही. होळीच्या प्रथेमागील पौराणिक कथा, होळीचा अनिष्ट रूढी नष्ट करण्याचा संदेश वगैरे गोष्टी तर तुम्हा सर्वांनाच परिचित आहेत. होळीच्या अनुषंगाने आपल्याकडे अक्षरशः खंडीभर उपाय, तोडगे वगैरे प्रचलित आहेत. असे उपाय खरोखरच किती उपयोगी पडतात हा शेवटी ज्याच्या-त्याच्या विश्वासाचा आणि आस्थेचा प्रश्न आहे. जो-तो व्यक्ती आपापल्या कुवतीनुसार आत्मोन्नती साधण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एक योगसाधक म्हणून यासर्व कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन होळीचा सूक्ष्म अर्थ योगसाधकाने जाणून घेतला पाहिजे. मंत्रयोगातील साधनांकारीता होळीची रात्र अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. जे वाचक मी आगोदर दिलेली महाशिवरात्रीची साधना करू शकले नाहीत त्यांनी होळीच्या रात्रीचा काळ चुकवू नये. काहीतरी साधना करण्याचा प्रयत्न यथामती अवश्य करावा.

आज या लेखाच्या माध्यमातून कुंडलिनी योगशास्त्रातील एका महत्वाच्या साधनेविषयी सांगणार आहे. ही साधना आहे भूतशुद्धी किंवा तत्वशुद्धी. मानवी पिंड पंचमहाभुतांपासून बनलेला आहे. पंचमहाभुते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आणि आकाश.  या पंचमहाभूतांच्या पेक्षा तरल मन-बुद्धी-अहंकार आहेत. कुंडलिनी योगशास्त्रात पंचमहाभूतांच्या शुद्धीकारणाला अत्यंत महत्व आहे कारण त्यांचा सुषुम्ना मार्गावरील चक्रांशी घनिष्ठ संबंध आहे. तेंव्हा हा लेख नीट लक्ष देऊन वाचा. ही साधना कधी करायची आहे ते लेखाच्या शेवटी दिलेलं आहे. ती वेळही कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करावा. एका गोष्ट लक्षात घ्या की ही साधना अजपा साधनेच्या काही महिने तरी सराव असलेल्यांसाठी आहे. एकदम नवीन साधकांनी आधी अजपा साधनेची "बेसिक टेकनिक" नीट आत्मसात करावी आणि मगच ह्या साधनेकडे वळावे.

होळीच्या दिवशी रात्री अजपा भूतशुद्धी साधना करण्यासाठी तुम्हाला काही साहित्य जमवावे लागेल. तुमच्या रोजच्या साधनेचं लोकरी / उनी आसन पसरून त्यावर स्थानापन्न व्हावे. समोर एका छोट्या चौरंगावर किंवा पाटावर शुभ्र पांढरे अथवा लाल रंगाचे कापड अंथरावे. त्यावर एक मोठ्या आकाराचा तेलाचा दिपक ठेवावा. हा दिवा शक्यतो धातूचा नको. मातीचा असावा आणि तो थोड्या मोठ्या आकाराचा असावा. त्यात कोणतेही गोडं तेल टाकावे. तुपाचा दिवा सुद्धा वापरू शकता परंतु खुप तूप लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलच वापरा असं मी सांगेन. दिव्याचा आकार असा असावा की तो किमान दोन तास तेवत राहिला पाहिजे. दिव्याची वात शुभ्र कापसाची असावी. साधनेच्या खोलीत काहीसा अंधार करून किंवा मंद प्रकाश करून दिपक प्रज्वलित करावा.

वर सांगितलेला विधी फक्त होळीच्या दिवशी रात्री साधनेची सुरवात करत असाल तरच करायचा आहे. अन्य दिवशी साधना करत असतांना तो परत-परत करण्याची गरज नाही.

काही काळ प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करावे पण त्राटक करू नये. मनातल्या मनात ज्योत, प्राणशक्ती आणि आंतरिक शुद्धी यांचे सूक्ष्म नाते जोडण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर डोळे हलकेच बंद करून घ्यावेत आणि नैसर्गिक पणे घडणाऱ्या श्वास-प्रश्वासावर मन ठेवावे. काहीच मिनिटांत तुम्ही अजपाच्या "बेसिक टेकनिक" मध्ये प्रवेश केलेला असेल.

आता हळूहळू मेरुदंड आणि सुषुम्ना यांची जाणीव मनात ठसवण्याचा प्रयत्न करावा. मुलाधारापासून सुरु करत सहस्रार चक्रापर्यंत सातही चक्रे आणि त्यांतून जाणारी सुषुम्ना स्पष्ट पहाण्याचा प्रयत्न करावा. आता साधनेचा महत्वाचा भाग सुरु होतो.

आता श्वास आत घेत असतांना अशी कल्पना करा की आत येत असलेली प्राणशक्ती ही श्वासांवाटे थेट मुलाधार चक्रात जात आहे. मुलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाचे केंद्र आहे. ही कल्पना करत असतांनाच मनातल्या मनात पृथ्वी तत्वाचा बीजमंत्र "लं" चे हळुवार मानसिक उच्चारण करा. श्वास आत रोखून अजिबात धरायचा नाही. सुखदपणे आणि नैसर्गिकपणे तो बाहेर सोडा.  श्वास बाहेर पडत असतांना तो पृथ्वी तत्वातील सर्व अशुद्धी बाहेर घेऊन जात आहे अशी कल्पना करा. असे लागोपाठ २१ श्वास मुलाधार चक्रावर करायचे आहेत. हे श्वास तुम्ही बोटांच्या पेरांवर मोजू शकता. माळ वापरायची नाही.

मुलाधार चक्रानंतर आता स्वाधिष्ठान चक्रावर जाणीव न्या आणि वरील प्रमाणेच जल तत्वाच्या बीजमंत्राचा अर्थात "वं" बीजाचा जप २१ वेळा करा. त्या नंतर मणिपुर चक्रावर अग्नीतत्वाच्या बीजमंत्राचा अर्थात "रं" जप करा. अशाच प्रकारे वायुबीज अर्थात "यं", आकाश बीज अर्थात "हं", ओंकार आणि गुरुमंत्र / इष्टमंत्र यांचा अजपा सहित जप अनुक्रमे अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार चक्रांवर करा.

मुलाधार ते सहस्रार हे झाले भूतशुद्धी साधनेचे अर्धे आवर्तन. आता उलट्या दिशेने सुरवात करायची आहे. सहस्रार ते मुलाधार असा २१-२१ वेळा जप करत करत खाली यायचे आहे. सहस्रारातून उतरून तुम्ही मूलाधारात परत आलात की साधनेचे एक पूर्ण आवर्तन झाले. हे आवर्तन करण्यास तुम्हाला लागणारा वेळ हा भिन्न-भिन्न असेल. जर हाती बराच वेळ असेल तर एकापेक्षा अधिक आवर्तने सुद्धा करू शकता. मुलाधार चक्रात आल्यावर भूतशुद्धीची क्रिया विसर्जित करून हलकेच डोळे उघडा, समोरच्या दिव्याच्या ज्योतीवर काही काळ आधी सांगितल्या प्रमाणे लक्ष केंद्रित करा.

जर हाती वेळ आहे असे वाटत असेल तर तुमच्या इष्ट मंत्राच्या १, ३, ५ माळा करायला हरकत नाही. साधना आपल्या इष्ट दैवतेला समर्पित करून आसन उचला.

आता ही साधना होळीच्या दिवशी कधी करायची आहे ते सांगतो. होळीच्या दिवशी संध्याकाली सुमार ६:३० ते ८:३० या काळात ही साधना करायची आहे. मी असं सांगीन की साडेसहा वाजता सुरु करा म्हणजे कितीही वेळ लागला तरी साधना वरील time window मध्ये व्यवस्थित संपेल. जर काही कारणांनी वेळ चुकली तर रात्री ११ पर्यंत कधीही एक-दोन तास ही साधना करू शकता. ती वेळही जर चुकली तर रात्री ११.४० ते १२.४० या दरम्यान करू शकता. साधना संपल्यावर त्या दिवशी तरी मौन पाळून लवकरात लवकर निद्राधीन व्हावे. जर रोज ह्या साधनेला वेळ देता येणं शक्य असेल तर होळीच्या दिवशी सुरु करून सलग किमान ४५ दिवस नियमितपणे करण्याचा प्रयत्न करावा. भूतशुद्धी सुद्धा काही एका दिवसांत होत नाही. साधकाच्या तयारी नुसार अनेक वर्षांचा काळ लागू शकतो. या साधनेचे छोटे आवर्तन (३, ५, ७ श्वास / चक्र) तरी दैनंदिन साधनेत समाविष्ट करावे. रोजच्या साधनेत दिव्याचा प्रयोग नाही केला तरी चालेल. बाकी विधी तोच.

विस्तारभयास्तव येथे थोडक्यात हा विधी सांगितला परंतु साधना सुरु करण्यासाठी तो पुरेसा आहे. या साधनेतील अधिक योगगम्य गोष्टी पुन्हा कधीतरी सांगीन. आशा आहे योगमार्गाची आवड असणारे वाचक अजपा भूतशुद्धी साधनेचा उपयोग नक्कीच करतील.

असो.

पंचमहाभूतांवर अधिराज्य गाजवणारी जगदंबा कुंडलिनी सर्व "भूतशुद्धी" अभ्यासकांचे कल्याण करून त्यांना योग्य मार्ग दाखवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 09 March 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates