Untitled 1

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी विषयी काही...

ज्ञानेश्वरी माझा गुरुग्रंथ तर आहेच पण माझ्या आवडीच्या नित्यापाठातील योगाग्रंथांपैकी एक आहे. माझी आणि ज्ञानेश्वरीची भेट कशी झाली, त्या नंतरच्या काही वर्षात त्र्यंबकेश्वर येथे शिवकृपेने माझी कुंडलिनी जागृत कशी झाली आणि मला आदिनाथ ते ज्ञाननाथ या सिद्ध नाथ परंपरेचे ज्योर्तीमय दर्शन कसे घडले ते मी "देवाच्या डाव्या हाती" या पुस्तकात सविस्तर सांगितले आहे. तेव्हा त्याची पुनरावृत्ती करत नाही.

मला स्वतःला ज्ञानेश्वरी का आवडते आणि आपलीशी वाटते ते सांगण्यापूर्वी सारथी प्रकाशनाच्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमधील एक छोटी गोष्ट सांगतो...

एकदा एका वारकर्‍याला विचारण्यात आले की - "आपण गीतेवरील अन्य ग्रंथ का वाचीत नाही?" यावर त्याने फार छान उत्तर दिले. तो म्हणाला - "आपल्या आईला भरपूर व पोटभर दूध असताना, बाळानं कोणाच्या तोंडाकडे कशाला पाहावं?"

ज्ञानेश्वरीच्या बाबतीत वरील विधान तंतोतंत खरे आहे. मी स्वतः योगशास्त्रावरचे डझनावारी प्राचीन ग्रंथ अभ्यासले आहेत. पण ज्ञानेश्वरीची चव कोणाला नाही.  आजची पिढी योग, अध्यात्म याकडे आकर्षिली जात आहे. परंतु बर्‍याचदा हे आकर्षण पाश्चात्य किंवा आधुनिक लेखकांची "spirituality" वरील पुस्तके वाचण्यापुरते आणि पांडित्यपूर्ण तात्विक चर्चा करण्यापुरते मर्यादित असते. अध्यात्म हा प्रत्यक्ष साधनेद्वारा अनुभवण्याचा विषय आहे, पुस्तकी वाचनाचा नाही याचा विसर पडलेला दिसतो. ज्याला कुंडलिनी योगमार्गावर अग्रेसर व्हायचे आहे त्याने ज्ञानेश्वरीचा अभ्यास जरूर केला पाहिजे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणजे ओव्या पाठ करणे किंवा पारायण करणे नव्हे. ज्याला या गोष्टी करायच्या आहेत त्यांनी त्या जरूर कराव्यात पण केवळ ज्ञानेश्वरी मुखोद्गत करून काही आध्यात्मिक प्रगति साधणार नाही. ज्ञानेश्वरीतील शिकवणीचा दैनंदिन जीवनात सराव करणे म्हणजे ज्ञानेश्वरीचा खर्‍या अर्थाने अभ्यास करणे.

मला ज्ञानेश्वरी आवडते ते केवळ मी ज्ञानेश्वरीमुळे योगमार्गावर आलो म्हणून नाही तर तिच्या काही खास वैशिष्ठांमुळे. मला ज्ञानेश्वरी अन्य गीता ग्रंथांच्या तुलनेने वेगळी का वाटते असं जर कोणी विचारील तर त्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे :

सर्व अध्यात्म ग्रंथांचे सार

जेव्हा एखादी सुशिक्षित आणि शहरी जीवन जगणारी व्यक्ति योग-अध्यात्ममार्गावर पाऊल ठेवते तेव्हा तिच्यासाठी ज्ञान मिळवण्याचा पहिला मार्ग असतो तो योगविषयक साहित्याचा. प्रश्न असा आहे की पुस्तके वाचून वाचून किती वाचणार. जगातील सर्वच ग्रंथ काही साधक वाचू शकत नाही. त्यात परत निरनिराळ्या लेखकांची पार्श्वभूमी आणि लिहाण्याची शैली भिन्न असते. वाचलेल्या शंभर पुस्तकांपैकी सगळ्यांचे अचूक विश्लेषण कारणे किंवा संदर्भ लावणे बहुतेकांसाठी जडच जाते. त्यातूनच मग पुस्तकी पांडित्याचा अहंकार बळावतो. प्रत्यक्ष साधना राहते बाजूला आणि पुस्तकी ज्ञान मात्र वाढते भारंभार.

प्राचीन भारतीय विचारसारणीनुसार सर्व ज्ञान वेदांमधून आलेले आहे. अर्थात येथे वेद म्हणजे काही विशिष्ट पुस्तके असा संकुचित अर्थ घेऊन उपयोग नाही. वेदांचा पसारा एवढा की त्यातून ऋषीमुनींनी उपनिषद नामक "वेदान्त" अर्थात वेदांचा शेवट निर्माण केला. तुम्ही जर प्राचीन उपनिषदांचा अभ्यास कराल तर तुम्हाला असे आढळेत की त्यामध्ये कर्मकांड अजिबात नाही. केवळ एक ब्रह्म सर्व चराचर विश्वात कसे भरलेले आहे त्याचे विश्लेषण उपनिषदांमध्ये आढळते. म्हणूनच उपनिषदे म्हणजे वेदांचे सार असे म्हटले जाते. पुढे लोकांना भौतिक सुखोपभोगाच्या आधीक्यामुळे उपनिषदे कळणे कठीण होऊन बसले. त्यावर उपाय म्हणून व्यासांनी भगवत गीता महाभारतात गोवली असे मानले जाते. म्हणजे भगवत गीता हे उपनिषदांचे सार आहे असे म्हणायला हरकत नाही. काळाच्या ओघात गीतातत्वही लोकांच्या ध्यानी येईना. त्यात परत मूळ गीता संस्कृतात आणि जनसामान्यांची भाषा संस्कृतेतर. त्यामुळे सर्वसामान्य लोकं गीतेपासून दुरावले. आपण मराठी भाषिक भाग्यवान असे की आपल्याला ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका नामक उपाय शोधून दिला. भावार्थ दीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हा भगवत गीतेचे सार विशद करून सांगणारा ग्रंथ आहे. ज्याला कुंडलिनी योग मार्ग चोखाळायचा आहे त्याने भारंभार पुस्तकांच्या फंदात न पडता केवळ ज्ञानेश्वरीची आणि प्रत्यक्ष साधनेची कास धरावी हे उत्तम. सर्व अध्यात्मशास्त्राचे आणि कुंडलिनी योगशास्त्राचे सार एवढ्या रसाळपणे एकत्र आणणारा असा दूसरा ग्रंथ तुमच्या दृष्टीस पडणार नाही.

संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला शाब्दिक क्लिष्टता किंवा संस्कृत शब्दांच्या अर्थछ्टांचा कीस पाडलेला तुम्हाला अजिबात आढळणार नाही. ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या अनुभवाच्या आधारे गीतेतले तत्वज्ञान अत्यंत प्रभावीपणे विशद केले आहे.

कुंडलिनी योगाची सुरेख गुंफण

भगवत गीतेवरील बहुतेक भाष्ये ही भक्तीप्रधान आहेत. त्यामुळे भगवत गीता म्हणजे केवळ भक्तियोग असा समाज आणि प्रचार झालेला आढळतो. परंतु परिस्थिति मात्र तशी नाही. मूळ गीता अभ्यासल्यास  त्यामध्ये त्या काळी ज्ञात अध्यात्मामार्गांचा समावेश अतिशय चपलखपणे केलेला आहे हे सहज घ्यानात येते. ज्ञानेश्वर गुरूपरंपरेने नाथपंथी होते. नाथपंथ त्याच्या स्थापनेपासूनच गूढतेच्या वलयात वेढला गेलेला आहे. आज तर तो शुद्ध स्वरुपात आढळणेही काठी आहे. मूळ भगवत गीतेमध्ये कुंडलिनी अथवा कुंडलिनी योग असा शब्दप्रयोग नाही पण माया, शक्ति, प्राणाचा अपानात होम अर्थात प्राणायाम, ध्यान असे त्याकाळी प्रचलित असलेले साधना प्रकार आहेत. याचा अर्थ भगवत गीतेच्या काही कुंडलिनी योग अस्तीत्वात नव्हता असे मात्र नाही. त्याचे ज्ञात स्वरूप आणि पारिभाषिक शब्द भिन्न होते इतकच. तोच धागा पकडून ज्ञाननाथांनी नाथसंप्रदायातील गूढ सिद्धांत भगवत गीतेशी अगदी सुरेख जोडला आहे. महत्वाचे म्हणजे कुंडलिनी योगाची ही जोडणी कोठेही ठिगळ लावल्यासारखी दिसत नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जागोजागी त्याचे सुमधुर एकजीव मिश्रण झालेले आढळते. ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय हा जारी कुंडलिनी योग विशद करणारा मुख्य अध्याय असला तरी बाकीच्या अध्यायात कुंडलिनी योग आणि नाथ संप्रदायोक्त सांकेतिक शब्द (जसे सुषुम्ना, दशमद्वार वगैरे) जागोजागी विखुरलेले आढळतात. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा केवळ भगवत गीतेवरील टिकाग्रंथ असे त्याचे स्वरूप न राहाता तो एक स्वतंत्र योगाग्रंथ बनतो. हा प्रकार आणि कोणत्याही गीता भाष्या विषयी झालेला आढळत नाही. 

शैव सिद्धांताची वैष्णव विचारधारेशी जोडणी

शैव सिद्धान्त हा प्राचीन काळी भारतभर (त्यातूनही विशेषतः दक्षिणेकडे)   पसरलेला होता असे बहुतेक सर्व तज्ञांचे मत आहे. शैव सिद्धान्त हा प्रामुख्याने योग, आगम आणि निगम यांच्या अधिपत्याखाली राहिलेला आहे. त्यामुळेच तो गूढ आणि पर्यायाने सर्वसामान्यांना दुरापास्त झालेला आहे. नाथपंथाची पाळेमुळे थेट या प्राचीन शैव दर्शनात आढळतात. आधी सांगितल्या प्रमाणे ज्ञानेश्वर गुरूपरंपरेप्रमाणे नाथपंथी पण त्यांनी प्रसार केला हरीभक्तीचा. असे जरी असले तरी ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी शैव सिद्धान्त आणि वैष्णव विचारधारा समर्थपणे जोडल्या आहेत. विशेषतः शैव दर्शनातील "उन्मेषवाद" भगवत गीतेतील भक्तिमार्गाशी मिळवताना ज्ञानेश्वरांना कोणत्याही शाब्दिक उड्या माराव्या लागलेल्या नाहीत की कसरती कराव्या लागल्या नाहीत. ज्ञानेश्वर हे करू शकले कारण ते स्वतः सिद्ध योगी होते. "हरी आणि हर एकच आहेत" किंवा "सर्व जगात ईश्वर भरलेला आहे" असे पुस्तकी बोल बोलणे आणि प्रत्यक्ष अनुभूति घेणे यात जमीन-आस्मानाचे अंतर आहे. सिद्ध योगी असलेल्या ज्ञाननाथांना ही प्रत्यक्ष अनुभूति होती आणि त्यामुळेच त्यांनी केलेली ही जोडणी ठिगळ न वाटता एकसंध वस्त्रातील धाग्यांप्रमाणे वाटते. भगवत गीता श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर आल्याने ज्ञानेश्वरीत त्यांनी हरीला महत्व दिले तर अमृतानुभवात हराला महत्व दिले. 

मार्ग अनेक उद्दीष्ट एक

मूळ भगवत गीतेत कर्मयोग आणि ज्ञानयोग असे दोन मुख्य मार्ग सांगितले आहेत. पैकी कर्मयोग हा निष्काम कर्म केल्याने आणि ज्ञानयोग हा पराकोटीच्या वैराग्याने साधतो. आजचा काल बघता पराकोटीचे वैराग्य फारच थोड्याना साधते. कर्मयोगही कठीण असला तरी सर्वसामान्यांना तो दैनंदिन जीवन सांभाळून चोखाळण्यासारखा आहे. थोडे विषयांतर वाटले तरी येथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. आजकाल कर्मयोग म्हणजे नोकरी धंदा सोडून समाजसेवा करणे किंवा एकाद्या आध्यतामिक संस्थेशी स्वतःला जोडून घेणे असा सपशेल चुकीचा समज पाहायला मिळतो. भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी असलं "हातचं सोडून पळत्याच्या मागे" शिकवत नाही. आपल्या आयुष्यात आपण जीवनाचा जो मार्ग आचरत आहोत तो आचरणात आणत असताना त्याला निष्काम कर्माची जोड देणे म्हणजे कर्मयोग. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध सोडून समाजसेवा करायला किंवा एखाद्या आश्रमात पाणी भरायला पाठवले नाही. अर्जुनाचे त्यावेळचे कर्म जे युद्ध ते निष्कामपणे जय-पराजयाची आशा सोडून करायला सांगितले. ज्ञानेश्वरीमध्ये नित्य-नैमित्तिक निष्काम भावनेने करावी आणि काम्य कर्म टाळावी असा सल्ला जागोजागी दिलेला आढळतो. 

कर्मयोग असो अथवा संन्यास साधकाला परमेश्वर प्राप्ती करता काही साधना ही करावी लागतेच. भगवत गीतेत उल्लेखलेल्या साधंनामध्ये जप, यज्ञ, प्राणायाम, तप, ध्यान, भक्ति अशा साधना आढळतात. बर्‍याच गीता भाष्यांमध्ये एक मार्ग श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ असा दुराग्रह आढळतो. ज्ञानेश्वरांनी मात्र असला प्रकार केलेला नाही. त्यांनी स्थापलेला वारकरी पंथ हा जरी भक्तीप्रधान असला तरी कुंडलिनीयोग किंवा ध्यानयोग हा कनिष्ठ आहे असे प्रतीपादन त्यांनी कधी केले नाहो. ज्ञानेश्वरीत श्रीकृष्ण अर्जुनाला "हे जमत नसेल तर ते कर, ते ही जमत नसेल तर हे दुसरे करून बघ" असा सल्ला देताना दिसतात. गुरूचे कामही नेमके हेच आहे - शिष्याच्या पात्रतेनुसार त्याला साधनामार्ग सांगणे आणि त्यात गरजेनुसार मार्गदर्शन करणे. कोणताही एक अध्यात्मार्ग श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसतो. साधकाची एखाद्या मार्गावरून चालण्याची पात्रता कमी किंवा अधिक असते. त्यामुळे ज्ञानेश्वरीची विभागणी ही भक्तिमार्गचा ग्रंथ किंवा योगमार्गाचा ग्रंथ अशी करता येत नाही. तो एकूणच योग-अध्यात्ममार्गाचा ग्रंथराज ठरतो.

दैनंदिन आयुष्य जगता जगता योग-अध्यात्म साधना

मी वर कर्मयोगाविषयी ज्ञानेश्वरीचा दृष्टीकोण सांगितलाच आहे. त्याचेच पुष्टीकरण करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे आणि दृष्टान्त दिली आहेत. पती-पत्नीमधील संबंध, लहान बाळ आणि त्याचे आई-बाप यातील जिव्हाळा, त्या काळच्या सामाजिक घटकांचे वर्णन किंवा उल्लेख ज्ञानेश्वरांनी जागोजागी समर्थपणे हाताळले आहेत. या उदाहरणावरून दैनंदिन जबाबदार्‍या पार पाडून अध्यात्माचा गड सर करा हा संदेशच जणू ज्ञानेश्वरांना द्यायचा आहे. हा सल्ला आजच्या काळाला अनुरूपच आहे. 

ज्ञानेश्वरीविषयी सांगावे असे बरेच आहे. पण विस्तारभयास्तव अधिक लिहीत नाही. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व तुम्हा सर्वांना प्रकाश दाखवो हीच जगद्नियंत्या सदाशिवाच्या चरणी प्रार्थना.

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 12 July 2014


Tags : योग अध्यात्म उपनिषदे वेदांत कुंडलिनी योगग्रंथ