Untitled 1

मुक्तिका उपनिषद आणि अजपा ध्यान - भाग ३

मागील दोन भागांत आपण प्रामुख्याने मुक्ती विवरण आणि साधन चतुष्टय या विषयी जाणून घेतले. आता कैवल्य मुक्तीच्या अभिलाषी मुमुक्षुने साधनेची कास कशा प्रकारे करावी त्याचे मार्गदर्शन "मुक्तिका" करत आहे. त्याच अनुषंगाने प्राण, अपान, मन, अमनस्क योग, अजपा, केवल कुंभक वगैरे गोष्टींचा एकमेकाशी कसा अद्भुत मेळ बसतो ते ही आपण जाणून घेणार आहोत.

प्रभू श्रीरामाच्या मुखातून "मुक्तिका" आपल्यापुढे मुक्ती मार्गाची एक स्पष्ट रूपरेषा सादर करते. यांत वर्णन केलेला मार्ग उथळ नसून अत्यंत सखोल आणि शास्त्रशुद्ध असा आहे. अध्यात्म मार्गाकडून "पी हळद आणि हो गोरी" अशी अपेक्षा ठेवणाऱ्या साधकांना अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करायला प्रवृत्त करेल असं मार्गदर्शन "मुक्तिका" करत आहे. त्यांत सांगितलेली साधना मूल्य एक-दोन वर्षांसाठी अंगिकारायची नसून ती आपल्या जीवनशैलीत भिनवयाची आहेत. ज्यांची साधनेची बैठक अजून भक्कम झालेली नाही त्याना "मुक्तीकेचा" मार्ग कठीण किंवा खडतर वाटण्याची शक्यता आहे. परंतु कैवल्यप्राप्तीचा हाच मार्ग आहे. वेद-उपनिषदे-आगम-निगम-योग यांनी एकमुखाने ह्या मार्गाला अनुमोदन दिलेले आहे. आजवर अनेकानेक ऋषी, मुनी, तपस्वी, योगी, संन्यासी हाच मार्ग अंगिकारून आपल्या अंतिम उद्दिष्टाप्रत पोहोचले आहेत. लहानपणी आपल्याला जेंव्हा पोहता येत नसते तेंव्हा खोल पाण्यात पडल्यावर आपल्याला भीती वाटते. एकदा पोहण्यात प्राविण्य मिळवले की ही भीती पार नाहीशी होते. तसच काहीसं योगमार्गाचेही आहे. जोवर साधनेचा भक्कम पाया नसेल तोवर त्यांतील मुलतत्वे कठीण आणि खडतर वाटतात. साधना जशीजशी दृढ होऊ लागते तसतसं त्या मुलतत्वांचे महत्व पटू लागते आणि ती आयुष्यात सहज अंगीकारता येतात.

प्रभू श्रीरामचंद्रांनी साधनेची त्रिसूत्री सांगितली आहे. ती थोडक्यात खालील प्रमाणे आहे -

"सूक्ष्म संस्कारांचा नाश, ज्ञानाची जोपासना आणि मनोलय या तीन गोष्टींचा दीर्घकाळ अभ्यास केल्याने अपेक्षित फलप्राप्ती अर्थात कैवल्य प्राप्ती होते. जर या तीन घटकांचा अभ्यास एकत्रितपणे केला नाही तर शेकडो वर्षांनंतरही सफलता मिळणार नाही.  यांचा दीर्घकालीन अभ्यास केल्याने हृदग्रंथीचा भेद होतो. मनावर झालेले सूक्ष्म संस्कार शेकडो जन्मांचा परिपाक आहे आणि ते प्रदीर्घ अभ्यासाशिवाय नाश पावत नाहीत. त्यामुळे भौतिक सुखांच्या अभिलाषेचा दृढता पूर्वक त्याग करून अर्थात वैराग्याचा अंगीकार करून या तिघांचा अभ्यास केला पाहिजे. ज्ञानी हे जाणतो की मन सूक्ष्म संस्कारांच्या आधीन आहे आणि संस्कारांचा नाश झाल्यावर मनही नाश पावते. त्यामुळे संस्कारांचा नाश करण्याचा अभ्यास करावा. दिव्यातील तेल संपल्यावर दिवा आपोआप विझून जातो. त्याचप्रमाणे संस्कारांची आटणी झाल्यावर मनाचा आपोआप नाश होतो अर्थात मन अ-मन बनते. जर मनाला संस्कारांपासून मुक्त केले नाही तर ध्यान, जप वगैरे गोष्टी कितीही केल्या तरी त्या व्यर्थ जातात."

ज्याला योगमार्गावर ठोस प्रगती करायची आहे त्याने ही त्रिसूत्री नीट समजून घ्यायला हवी. या त्रिसूत्रीतील पहिला भाग आहे मनातील सूक्ष्म संस्कारांचा नाश. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या मनावर एक सूक्ष्म संस्कार किंवा ठसा सोडून जात असते. जन्मोजन्मींचे असे असंख्य संस्कार आपल्या  मनावर झालेले असतात. हे संस्कार नाना प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, वासनांना जन्म देत असतात. एखाद्या गोष्टीची आवड अथवा नावड याच संस्कारांच्या आधाराने बळकट होत असते. मनातील हे संचित संस्कार प्राण शक्तीत जणू एक स्पंद निर्माण करतात. शांत तलावाच्या पृष्ठभागावर एखादे झाडाचे पान पडले की त्यावर जसे तरंग उमटतात तशीच काहीशी अवस्था होते आणि मनाचा जन्म होतो. थोडक्यात सांगायचे तर मनाचे अस्तित्व दोन गोष्टींवर अवलंबून असते - सुप्त वासना आणि प्राणशक्तीचे स्पंदन. गंमत अशी की वासनेत मूळ असलेल्या मनात अनेक नवीन वासना उत्पन्न होतात. एखाद्या बी पासून निर्माण झालेला वृक्ष ज्याप्रमाणे असंख्य बिया निर्माण करतो तसाच प्रकार मनाच्या बाबतीतही घडत असतो. योग साधनेच्या दृष्टीने विचार करता संस्कारक्षय आणि मनोलय अशा दोन्हींचा अभ्यास योगामार्गी साधकाला करावा लागतो. मनातील संस्कार नष्ट करण्यासाठी वैराग्य हा उपाय सांगितलेला आहे. आत्मा हा पंचकोशांनी वेढला गेला आहे. ज्ञानेश्वरीत ज्याला "नऊ भोकांचे फुटकं मडकं" असं म्हटलं आहे ते मानवी स्थूल शरीर हे नाशवंत आहे. भौतिक गोष्टींविषयी अशा प्रकारचा विवेक जोपासल्याने वैराग्याची बैठक भक्कम होते. येथे एक लक्षात ठेवायला हवे ते म्हणजे वैराग्य काही अचानक आपोआप निर्माण होत नाही. त्यासाठी सुद्धा वरील प्रमाणे दीर्घकाळ अभ्यास करावा लागतो. तेंव्हा कुठे मनात भौतिक गोष्टींची नश्वरता पक्की ठसते.

ज्यावेळी योगाभ्यासी मनाचा नाश करतो तेंव्हा ते अ-मन बनते. योगमार्गाच्या भाषेत सांगायचे तर याला अमनस्क योग असं म्हणतात. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांसारख्या सिद्ध योग्यांनीही अमनस्क योग अत्यंत महत्वाचा मानला आहे. पतंजली योगसूत्रांतील समाधीच्या वेगवेगळ्या पायऱ्या शेवटी "चित्तवृत्ती निरोध" याच अवस्थेप्रत घेऊन जातात. तात्पर्य हे की क्रियात्मक योगाचा विचार करता ध्यानाभ्यास अथवा समाधी साधना मनाला निर्विकल्प अथवा अ-मन बनवण्यासाठी अत्यावश्यक मानली गेली आहे.

आता प्रश्न असा उरतो की मनावरील संस्कारांचा नाश करू शकेल अशी ध्यान पद्धती कोणती? मनाला कारण प्राणस्पंदन असल्याने प्राणस्थैर्य प्राप्त करून मनोलय साधेल असा राजमार्ग कोणता? प्रभू श्रीरामांनी "मुक्तिकेच्या" माध्यमातून त्याच राजमार्गाकडे निर्देश केलेला आहे. ही साधना नीट कळावी म्हणून ती नुसते श्लोकांचे शब्दशः अर्थ न देता मुद्दाम सोप्या भाषेत त्यांच्या योगगर्भ अर्थासहित सांगत आहे.

मानवी श्वसनाची प्रक्रिया श्वास आणि प्रश्वास अशा दोन भागांनी बनलेली असते. श्वास आत घेण्याची प्रक्रिया ही "प्राण" नामक वायूच्या प्रकाराने घडत असते. त्याचप्रमाणे प्रश्वास हे "अपान" नामक वायूमुळे घडत असतात.  मानवी श्वसन प्रक्रियेकडे नीट लक्ष दिले तर आपल्याला असं आढळेल की अपाना नंतर (अर्थात प्रश्वासा नंतर) परंतु प्राणाच्या आधी (अर्थात श्वासाच्या आधी) एक अत्यंत सूक्ष्म कालावधी असा असतो ज्यावेळी वायू पूर्णतः स्थिर असतो. त्या संधीत आपण श्वास घेतही नसतो आणि सोडतही नसतो. या अवस्थेला योगशास्त्रात "कुंभक" असं म्हणतात. श्वसनाच्या एका साखळीत असे दोन नैसर्गिक "कुंभक" योगी अनुभवतात. या प्रक्रियेत ब्रह्मध्यान केल्याने योग्यांना अतिप्रिय अशी "असम्प्रज्ञात समाधी" साधू लागते. यालाच "निर्विकल्प" समाधी" किंवा "निर्बीज" समाधी असं सुद्धा म्हटलं जातं. ही उपनिषदांनी वर्णन केलेली सर्वोच्च अवस्था आहे.

जर "मुक्तिकेतील" ध्यानाभ्यास तुम्ही नीट अभ्यासलात तर तुम्हाला अगदी सहज कळून येईल की अजपा साधनाच आहे. अजपा साधनेतील प्राण, अपान, सहज कुंभक, सोहं अर्थात ब्रह्मध्यान अशा सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण अशी ही ध्यान पद्धती आहे. भगवत गीतेत श्रीकृष्णाने अजपा ध्यानाकडे "प्राणाचा अपानात आणि अपानाचा प्राणात केलेला यज्ञ" अशा योगगर्भ सांकेतिक भाषेत निर्देश केलेला आहे. तसाच सूक्ष्म निर्देश श्रीरामांनी येथे "प्राण, अपान आणि त्यांच्या संधीतील कुंभक" यांद्वारे केलेला आहे. अजपा ध्यानाने केवल कुंभक कसा साधतो ते आपण या आगोदर अनेकवेळा विस्ताराने जाणून घेतले आहे. त्यामुळे येथे पुनरावृत्ती करत नाही. काही वेळा साधकांच्या मनात शंका असते की आपली साधना आपल्याला योगाच्या अंतिम उद्दिष्टाप्रत घेऊन जाण्यास सक्षम आहे की नाही. वरील विवेचनावरून अजपा ध्यान असम्प्रज्ञात समाधी आणि तदनंतरचे कैवल्य मिळवून देण्यास पूर्ण सक्षम आहे हे स्पष्ट आहे.

"मुक्तिका" पुढे आपल्याला सांगते की साधकाने प्रथम काम-क्रोधादी वाईट विचारांचा त्याग करावा. त्यांच्या ऐवजी प्रेम, करुणा आदी सद्विचारांचा आश्रय घ्यावा. त्यानंतर सद्विचारांचा सुद्धा त्याग करून निखळ चैतन्याचा आश्रय घ्यावा. त्यानंतर श्रीरामाला नाम-रूप रहित मानून, त्याला सर्वव्यापी ओंकार स्वरूप मानून ध्यानाभ्यास करावा. असा साधक योग्यवेळी जीवनमुक्ती आणि तद्नंतर विदेहमुक्ती प्राप्त करतो.

थोडे विषयांतर वाटले तरी सांगतो की ज्ञानेश्वरीतील सहावा अध्याय उपनिषदांच्या दृष्टीने जरूर अभ्यासावा. वरकरणी त्यांतील तत्वज्ञान भिन्न वाटले तरी ते एकाच गोष्टीविषयी सांगत आहेत. मग तुम्हाला ज्ञानेश्वरांनी कुंडलिनी शक्तीला पंचमहाभूतांची आणि संस्कारांची आटणी करणारी मूस असं का म्हटलं आहे ते नीट कळेल. "पिंडे पिंडाचा ग्रासू" आणि "अमनस्क योग" यांतील दुवा मग तुम्हाला नीट कळू लागेल. उपनिषदे काय किंवा ज्ञानेश्वरी काय हे एकदा वाचून कपाटात ठेऊन देण्याचे ग्रंथ नाहीत. त्यांतील शिकवणीचा दैनंदिन जीवनात जोवर प्रामाणिक अभ्यास घडत नाही तोवर ते नीट उमगणार नाहीत आणि काहीसे क्लिष्ट वाटतील.

असो.

योगाभ्यासी वाचक विवेक, वैराग्य आणि अजपा यांद्वारे अमनस्क योगाचा श्रीगणेशा करण्यास सक्षम होवोत या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 24 August 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates