Ajapa Dhyana and Kriya : Online guidance and initiation sessions by Bipin Joshi. Read more...

Untitled 1

घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा

या जगात सर्वात शक्तिशाली कोण असेल तर तो म्हणजे काळ.

राजाचा रंक आणि रंकाचा राजा करणे हा त्याच्या हातचा मळ. मी-मी म्हणणाऱ्यांची गठडी वळणं हा त्याच्या आवडता छंद. पैशाच्या मदाने भूललेल्यांना तो कच्चं खाऊन टाकतो. विद्येचा गर्व चढलेल्यांना तो यथेच्छ चघळून टाकतो. सुंदर, बलिष्ठ, सुडौल वगैरे शारीरिक उपाध्या बाळगणाऱ्याना तो कधी मटकावून टाकतो त्याचा पत्ताच लागत नाही. एवढंच काय पण योगी, साधू, संत अशा पदव्या भूषविणारेही त्याच्या कराल मुखापासून वाचू शकत नाहीत.

बालपणीचा अल्लडपणा संपतो, तारुण्याच्या उन्माद ओसरतो, वृद्धापकालीचा चढ सुरु होतो. इकडे तिकडे उंडारण्याच्या नादात कळपापासून तुटलेल्या हरणाच्या पाडसाला संध्याकाळ जशी भीती घालू लागते तसा हा काळ मग माणसाला वाकुल्या दाखवू लागतो. पण वेळ केंव्हाच निघून गेलेली असते. त्याच्या विकराल मुखात उदो उदो म्हणत स्वतःची आहुती देण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो...

रामदास स्वामींचे शब्द सहजच आठवून जातात....

घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा । आयुष्याचा नाश होतो राम कां रे म्हणाना ॥


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 14 Jul 2017