Untitled 1

भगवान शंकराची श्रावणातील योगमय उपासना

योगशास्त्राचा वटवृक्ष मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग अशा चहूबाजूंनी बहरलेल्या फांद्यांनी शोभायमान बनलेला आहे. त्याच्या असंख्य साधानारूपी पर्णसंभारामधून आपल्याला आवडेल, जमेल आणि अचूक उपयोगी पडेल अशी साधना-उपासना निवडणे हे महाकठीण पण तितकेच महत्वाचे कार्य. त्यात परत मानवी आयुष्याचा पसारा हा एवढासा टीचभर. तेंव्हा ही निवड अचूक असायलाच हवी. नाहीतर काय होतं की वर्षे अशीच फुकट जातात. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होते.

आध्यात्मिक प्रगती नामक रेसीपीचे प्रारब्ध, स्वप्रयत्न आणि ईश्वरी कृपा असे तीन महत्वाचे घटक मानले तर खरं म्हणजे त्यातला एकच साधकाच्या हातातला असतो - स्वप्रयत्न. आता स्वप्रयत्न म्हणजे नुसती गाढवासारखे ओझे वाहणे नव्हे हे ही ओघाने आलेच. याच कारणाने योगमार्गावर आपण कोणत्या साधना निवडत आहोत हे साधकाने नीट तपासून पहायला हवे. प्रत्येक साधक वेगळा असतो, त्याची साधनाही वेगळी असते. एकदा का स्वतःच्या पिंडाला अनुसरून अशी स्वतःची साधना बसवली की मग तिला घट्ट चिकटून रहाणे आवश्यक ठरते. गुळाच्या ढेपेला मुंगळे जसे चिकटून बसतात अगदी तस्सं.

हे सर्व सांगायचे कारण म्हणजे श्रावण महिना लवकरच सुरु होत आहे. श्रावण म्हणजे भगवान शंकराचा महिना. योगाभ्यासी साधकाच्या साधनेत नक्की कोणत्या क्रियांचा समावेश आहे हे जसे महत्वाचे तसेच त्या क्रियांसाठी सुयोग्य कालावधी कोणता ते ही महत्वाचे ठरते. उदाहरणार्थ, भस्त्रिका प्राणायाम भरपूर प्रमाणात करायचा असेल तर उन्हाळा योग्य नव्हे. त्याचप्रमाणे पावसाळा सर्वच योगक्रीयांसाठी उपयुक्त असतो असे नाही. मंत्रयोगासाठी तर कालावधीची निवड अधिकच महत्वाची आहे. ग्रहणकाल, दिवाळीची रात्र, होळीची रात्र, नवरात्र, महाशिवरात्र अशा काही मुहुर्तांवर मंत्रसिद्धी लवकर होते.  श्रावण महिना सुद्धा शिवमंत्र, शिवस्तोत्रे, शिवउपासना इत्यादींसाठी अति फलदायी आहे. भगवान शंकराचे अनेक मंत्र आहेत, अनेकानेक स्तोत्रे आहेत. त्यातील सगळीच काही शीघ्र फलदायी नाहीत. त्यातील सगळीच काही सर्व साधकांना फळतील असेही नाही.

येथेच साधकाची खरी कसोटी लागते. आपल्याला नक्की काय लाभ मिळवून देईल हे साधकाला हुडकून काढता आले पाहिजे. साधकाचे आपल्या इष्ट दैवतेशी घट्ट connection जोडले गेले असेल तर त्याचे कार्य सुलभ होते.  साधकाचे सद्गुरू सुद्धा त्याला या कामी बहुमोल मदत करू शकतात. म्हणूनच कदाचित सिद्ध-सिद्धांत-पद्धती सांगते की -

गुरुरत्र सम्यक् सन्मार्गदर्शनशीलो भवति।
सन्मार्गो योगमार्गस्तदितरः पाषंडमार्गः।

अर्थ - सद्गुरूच आपल्याला सर्वांगीण असा सन्मार्ग दाखवतात. योगमार्ग हा सन्मार्गच आहे. अन्य मार्गांच्या तुलनेने श्रेष्ठ आहे.

गोरक्षनाथ स्वतः योगमार्गाचे प्रवर्तक असल्याने त्यांनी त्यांचे मत सुस्पष्टपणे आणि परखडपणे मांडले आहे. येथे हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की योगमार्ग प्रत्यक्ष आचरणाचा क्रियात्मक मार्ग असल्याने तो प्रत्यक्ष अनुभव देणारा आहे. याउलट जे अन्य मार्ग केवळ वैचारिक विश्लेषणावर समाधान मानतात ते ईश्वरी तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यास असमर्थ आहेत असं त्यांना सांगायचे आहे.

भगवान शंकराची उपासना कशी करावी याविषयी बाळबोध माहिती तर सर्वत्र उपलब्ध आहे. परंतु श्रावणात मंत्र-हठ-लय-राज अशा चतुःसूत्री योगमय पद्धतीने भगवान शंकराची उपासना कशी करायची हा एक प्रगल्भ अभ्यासाचा विषय आहे. अजपा ध्यान ही ऋतू-काळ-मुहूर्त यांच्या मर्यादा नसलेली सिद्ध साधना आहे पण ती शिव-शक्तीमय कशी करावी हा सुद्धा एक सूक्ष्म आणि गहन विषय आहे. नवीन साधकांनी हे सर्व नीट माहित करून घेण्यासाठी आपापल्या सद्गुरूंना साकडे घालावे आणि तदनुसार श्रावणाचा सदुपयोग करावा हे उत्तम.

असो.

आगामी श्रावण महिन्यात योगाभ्यासी वाचक योगयुक्तीने भगवान शंकराची कृपा प्राप्त करोत ह्या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 22 July 2019