Untitled 1

गोरख कहै सुन रे अवधू जग में ऐसा रहना

दिनांक १२ मे २०१९ रोजी श्रीशंकर महाराजांचा समाधी दिवस होता. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. योगमार्गावर वाटचाल करत असतांना आपण अनेक संत-सत्पुरुषांची चरित्रे आणि लीला वाचतो, ऐकतो. त्यांतील काही सत्पुरुष आपल्याला इतरांपेक्षा जास्त भावून जातात. श्रीशंकर महाराजांच्या बाबतीत असंच काहीसं झालं. त्यांचं भगवान शंकराच्या अंशरुपात झालेलं अयोनिसंभव अवतरण, नाथ पंथाशी असलेली जवळीक आणि अवलिया-अवधूत वृत्ती एक वेगळंच गारुड करून गेली. त्यानंतर मग आदर-भक्तीच नातं दृढ होत गेलं. त्यांच्याविषयीच्या मला आलेल्या काही विलक्षण अनुभूती नंतर कधीतरी सांगीन. आज विषयांतर करत नाही.

पारंपारिक मान्यतेनुसार मागील आठवड्यात १८ मे २०१९ रोजी नाथ सिद्ध श्रीगोरक्षनाथ अक्षय-जयंती साजरी झाली. त्याचे औचित्य साधून आज श्रीगोरक्षनाथांच्या गोरखबानी मधील दोन-तीन उपदेश सूत्र पाहु या. गोरक्षनाथांनी हा उपदेश नाथ संप्रदायातील दीक्षित साधकांसाठी जरी केलेला असला तरी आपल्यापैकी प्रत्येकाला तो मोलाचा ठरावा.

साधकाने दैनंदिन आयुष्यात कसे रहावे तर -

हबकी ना बोलीबा, ठबकी ना चलीबा, धीरे धारिवा पांव
गरब न कारीबा, सहजै रहिबा, भणत गोरष राव

घाईघाईने विचार न करता (भावनेच्या भरात) काही बोलू नये.  घाईघाईने रस्ता (योगमार्ग) नीट न बघता चालू नये. योगमार्गावर हळूहळू सावध चित्ताने पावले टाकावीत. जे काही थोडेफार ज्ञान प्राप्त झाले आहे त्याचा गर्व करू नये. साधेपणाने जीवन व्यतीत करावे.

आपल्या अवती भवती असंख्य चांगल्या-वाईट लोकांची आणि घटनांची वर्दळ असते. त्या कोलाहलात स्वतःला अलिप्त ठेवणे साधकासाठी आवश्यक ठरते. त्याविषयी गोरक्षनाथ म्हणतात -

गोरख कहै सुन रे अवधू जग में ऐसा रहना
आखें देखिबा कानै सुनिबा मुख थै कछू न कहणां

अर्थात जगात कसे राहावे तर आजुबाजुला घडणाऱ्या घटना साक्षी भावाने बघाव्यात. कानावर ज्या गोष्टी पडतील त्या साक्षी भावाने ऐकाव्यात. परंतु त्या पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींनी विचलित किंवा उद्विग्न होऊन मुखातून अवाक्षरही बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे स्वतःला अनावश्यक बडबड, चर्चा, वाद, तात्विक काथ्याकुट इत्यादी गोष्टींपासून दूर ठेवावे. होता होईतो मौन पाळावे किंवा मितभाषी असावे.

यापुढे ते अधिक स्पष्ट करतात की -

कोई वादी कोई विवादी, जोगी कौ वाद न करना
अठसठि तीरथ समंदि समावैं, यूं जोगी को गुरूमखि जरनां

या जगात कोणाकोणाला वाद-प्रतिवाद-चर्चा इत्यादी गोष्टींत रस असतो पण ज्याला योगी बनायचे आहे त्याने कधी वाद-विवाद करत बसू नये. त्याने काय करावे ते पुढे सांगतात. ज्याप्रमाणे सर्व तीर्थे शेवटी समुद्राला जाऊन मिळतात (समुद्र हे त्यांचे एकमेव लक्ष्य असते) त्याप्रमाणे योग्याने आपले सगळे लक्ष गुरुप्रदत्त साधनेद्वारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याकडे लावावे.

सर्व वाचक बोलणे कमी, साधना जास्त या सूत्राचा अवलंब करून सत्पुरुषांना अपेक्षित असलेली सद्भावना आणि शांती प्रेरित करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 20 May 2019