Untitled 1

भर्तृहरी गुंफेतील "काला"

(Pic. source : Internet)

काही दिवसांपूर्वी एका गावाकडच्या देवळात संध्याकाळचा निवांत बसलो होतो. दिवसभर उकाडा होता पण आता उन्हं कलली होती. संध्याकाळचा मंद वारा मनाला प्रसन्न करत होता. खरं तर आपल्या महाराष्ट्रात कितीतरी छोटी छोटी देवळ आणि देवस्थानं आहेत. लोकांचा ओढा मात्र प्रसिद्ध आणि गजबजलेल्या ठिकाणांकडेच जास्त असतो. असो.

तर मी असा देवळात निवांत ईश्वरस्मरण करत बसलो असतानांच कोठूनतरी सुग्रास अन्नाचा सुवास दरवळायला लागला. कुतूहल म्हणून नजर फिरवली तर पुजारी महाप्रसादाची तयारी करत होता. सुग्रास अन्न कोणाला आवडत नाही?! अगदी दैनंदिन घरगुती जेवणसुद्धा चांगले व्हावे म्हणून लोकं किती काळजी घेतात. जेवणातल्या पदार्थात मीठ, साखर वगैरे नीट आहेना, अन्न चविष्ट झालंय ना याकडे लोकं किती बारकाईन लक्ष देतात. अन्नाला आपण पूर्णब्रह्म म्हणतो. ते बरोबरच आहे. भगवत गीतेमध्येसुद्धा यज्ञासंबंधी जो भाग आहे त्यात याकडे निर्देश केलेला आहे. अन्नाची गंमत अशी की ते मिळालं नाही तर जीव जगणार नाही. त्यामुळे अन्नाची वासना ही पूर्णपणे टाकताही येत नाही. परंतु लोकं अन्न ज्याप्रकारे जिभेचे चोजले पुरवण्यासाठी खातात ते निदान योगासाधनेला पोषक नक्कीच नाही. प्रत्येक योगसाधकाने हा मुद्दा विशेष लक्षात ठेवला पाहिजे.

बसल्या बसल्या मन भूतकाळात गेलं. बऱ्याच वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला आणि स्वतःशीच हसलो... अगदी मनसोक्त हसलो...

या गोष्टीला खुप खुप वर्ष झाली. मी भर्तृहरी गुंफा बघण्यासाठी गेलो होतो. ही गुंफा नाथ पंथात फार प्रसिद्ध आहे. अनेक नाथ सिद्ध जसे राजा भर्तृहरी, मच्छिंद्रना, गोरक्षनाथ यांचा पवित्र स्पर्श या भूमीला झालेला आहे. येथे केलेली साधना पटकन फलीभूत होते अशी नाथ पंथीयांची धारणा आहे. त्यामुळे अनेक नाथ पंथी साधू येथे येत-जात असतात. भर्तृहरी गुंफा बघायची आणि जमल्यास काही काळ साधना करायची एवढाच माफक उद्देश माझ्या या भेटीमागे होता.

गुंफा आणि आजूबाजूचा परिसर बघून झाल्यावर मी मंदिराच्या आवारात जरा विश्रांती घेत होतो. ध्यान-धारणा आगोदरच आटोपली होती. तेवढ्यात एक साधूंचा घोळका बसलेला दिसला. ते बहुदा त्यांच्या काही साधनाविधी किंवा पूजेसाठी साठी आले असावेत. त्यांच्या घोळक्यात काही अगदी नवशिके वाटतील असे साधक होते आणि काही वयोवृद्ध जुने-जाणते वाटावे असे साधू होते. मला त्यांच्या त्या घोळक्यात फारसा रस नव्हता कारण माझ्या मनात परतीच्या प्रवासाचे विचार घोळत होते.

माझ्या मनात हे विचार घोळत असतांनाच त्यांच्यातील एक बऱ्यापैकी वयोवृद्ध असा साधू माझ्या बाजूनी गेला. त्याच्या हातात भिक्षापात्र होतं. बहुदा ते धुण्यासाठी वगैरे तो कडेला जात होता. मी अगदी सहज म्हणून त्याला कुठून आले, काय करताय वगैरे विचारले. तो हरिद्वार-कनखल कडून आला होता. म्हणाला "मी काला बनवतोय". कुतूहल वाटलं म्हणून मी अधिक चौकशी केली. त्याच्या कडून समजला तो विधी असा...

जे काही अन्न आपण खाणार आहोत - मग ते भाजी, पोळी, भात, दही, वरण असे काहीही असो - ते सर्व एका मोठ्या केळीच्या पानात घट्ट बांधायचे. जर केळीचं पान नसेल तर पत्रावळी किंवा एखादा सुती पंचा किंवा वस्त्र सुद्धा चालेल. त्यात हे सगळं अन्न एकत्र घालायचं. लक्षात घ्या - अन्न वेगळ्या वाटीत किंवा द्रोणात वगैरे ठेवायचं नाही. सगळे अन्नपदार्थ एकत्र ठेवायचे. मग हे पानात किंवा वस्त्रात बांधलेले अन्न नदीच्या वाहत्या पाण्यात काही वेळ धरायचे. जर नदी नसेल तर नळाखाली धरायचं किंवा पाण्यानी भरलेल्या पात्रात बुडवायच. आता ते गाठोडं बाहेर काढून ठेवायचं. या सर्व प्रकारानी ते अन्न पदार्थ भिजतील आणि एकत्र होऊ लागतील. काही वेळानी ते गाठोडं उघडून त्यातील अन्न भिक्षापात्रात किंवा थाळीत काढायचं आणि ते एकत्र करून त्याचा काला करायचा! मग तो काला भोजन म्हणून सेवन करायचा.

अन्न काला करून खाण हे योग-अध्यात्म मार्गावर नवीन किंवा अपरिचित अजिबात नाही. अनेक साधू-बैराग्यांच्या उदाहरणांतून आणि शिकवणीतून त्याचा संदर्भ आपल्याला मिळतो. या साधूने विस्ताराने त्याची स्वतःची पद्धत मला सांगितली एवढंच.

हा "काला विधी" वाचूनच तुम्हाला कदाचित कसंतरी वाटेल. जे अन्न पदार्थ वेगवेगळे ठेवले असतांना अतिशय चविष्ट लागतात तेच पदार्थ काला केल्यावर बेचव लागतात. अन्न हे शरीर तगवण्यासाठी असतं, जिभेचे चोजले पुरवण्यासाठी नाही हा धडा यातून मिळतो. मी स्वतः माझ्या योगमार्गावरील सुरवातीच्या काळात हा प्रयोग अनेकवेळा केला आहे. मी त्यावेळेस नोकरी करत असे. त्यामुळे दुपारचे जेवण बाहेर होत असे. संध्याकाळचे जेवण मात्र मी काला करून खात असे. अर्थात काला करण्याची माझी पद्धत वेगळी होती. कालांतराने मग अशा कोणत्याही प्रक्रियेची गरज रहात नाही कारण तुमचा स्वतःवर ताबा आलेला असतो.

येथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की या काला विधीचा उद्देश जिभेची संवेदना बोथट करणं अजिबात नाही. कारण जीभ हे केवळ स्थूल इंद्रिय आहे. जिभेचे चोजले पुरवण्याची मनाची जी वाईट खोड असते ती मोडणं हा यामागचा उद्देश आहे. विशेषतः एखादे अनुष्ठान करत असतांना किंवा एकांतवासात असतांना किंवा मौनव्रतात असतांना या काला विधीचा साधलेला बळकटी आणायला फार चांगला उपयोग होतो. अर्थात यातही तारतम्य बाळगणे गरजेचं आहे. जेवढे जमेल आणि शरीराला झेपेल तेवढेच आपापल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली करावे हे उत्तम.

देवळात संध्याकाळची तुरळक वर्दळ सुरु झाली होती. जुन्या आठवणींच्या तंद्रीतून जागा झालो. थोड्यावेळानी आरतीसाठी परत यावं असा विचार करून पाय मोकळे करायला बाहेर पडलो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 26 May 2016


Tags : योग अध्यात्म विचार