Untitled 1

परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान

अशी कल्पना करा की एक लहान मुलगा आपल्या आजीबरोबर लोणावळ्याला जात आहे. लोणावळ्याला ही त्याची पहिलीच भेट आहे त्यामुळे तो तिकडच्या गंमती-जमती पहायला अगदी उत्सुक आहे. गाडीमध्ये त्याची आजी त्याला लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्की बद्दल सांगते. ती चिक्की कशी असते, कोणकोणत्या प्रकारची असते, चवीला कशी गोड आणि खुसखुशीत लागते वगैरे रसभरीत वर्णन ती आपल्या नातवाला ऐकवते. आता त्या मुलाच्या मनामध्ये "लोणावळ्याची चिक्की" म्हणजे काय याचं ज्ञान साठवलेलं असतं. हे ज्ञान ऐकीव असतं. आजीनी तिच्या कुवतीनुसार जे काही सांगितलं आहे आणि त्याने त्याच्या कुवतीनुसार जे काही ग्रहण केलं आहे त्यावर त्याचं हे ज्ञान आधारित असतं.

काही वेळाने त्यांची गाडी लोणावळ्याला पोहोचते आणि त्याची आजी त्याला आतापर्यंत वर्णन केलेली चिक्की विकत घेऊन देते. तो मोठ्या खुशीत चिक्कीचे पाकीट फोडून त्यातील चिक्कीची एक वडी आपल्या तोंडात टाकतो. त्या क्षणी आतापर्यंत आजी चिक्की विषयक जे काही सांगत होती ते त्याला लखलखीत स्पष्टपणे समजतं. कारण चिक्कीची प्रत्यक्ष चव तो चाखत असतो. लोणावळ्याच्या चिक्कीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर आता त्याला लोणावळ्याची चिक्की म्हणजे काय ते समजावून सांगायला लागत नाही. त्या संबंधीचा प्रत्यक्ष अनुभव आता त्याच्या गाठीशी असतो.

लोणावळ्याची चिक्की चाखून बघण्याआधी त्याचे त्यासंबंधी जे काही प्रत्यक्ष अनुभवहीन ज्ञान होते त्या प्रकाराला अध्यात्मशास्त्रात परोक्ष ज्ञान असे म्हणतात. लोणावळ्याची चिक्की प्रत्यक्ष खाऊन त्याला त्याविषयीचे जे प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान झाले त्याला आध्यात्मिक परिभाषेत अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात.

येथे अपरोक्ष या संस्कृत शब्दाची मराठीतील अपरोक्ष या शब्दाशी गल्लत करू नये कारण दोन्हींचा अर्थ भिन्न आहे. येथे आपण संस्कृतातील परोक्ष आणि अपरोक्ष बद्दल विचार करत आहोत.

असो.

केवळ समजायला सोपं जावं म्हणून आपण वरील उदाहरण घेतले. आता आध्यत्मिक दृष्टीने थोडे अधिक खोलात जाऊ.

ज्ञानाच्या या दोन प्रकारांतील - परोक्ष आणि अपरोक्ष - श्रेष्ठ प्रकार कोणता बरे? परोक्ष ज्ञानापेक्षा अपरोक्ष ज्ञान अर्थातच श्रेष्ठ आहे. परोक्ष ज्ञान हे बाह्य गोष्टींवर आणि पंचेन्द्रीयांवर अवलंबून असते. याउलट अपरोक्ष ज्ञान हे आतूनच स्वयमेव प्रकट झालेले असते.

परोक्ष म्हणजे सोप्या भाषेत अप्रत्यक्ष. एकादा नवीन साधक जेंव्हा अजपा योगमार्गावर येतो तेंव्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न असतात. आत्मा म्हणजे काय? आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? ईश्वर म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्याला हवी असतात. मग त्या साधकाचे गुरु किंवा मार्गदर्शक त्याला आपापल्या क्षमतेनुसार या प्रश्नांची उत्तरे समजावून सांगत असतात. तो स्वतः बाजारात उपलब्ध असलेली भारंभार पुस्तके वाचून या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. या सर्व प्रकारांतून त्याला जे काही ज्ञान प्राप्त होतं ते असतं परोक्ष ज्ञान. त्याने स्वतः आत्मसाक्षात्कार किंवा आध्यात्मिक रहस्य अनुभवले नसल्याने त्याचे आत्म तत्वा विषयीचे ज्ञान हे अप्रत्यक्ष स्वरूपातील असते. गुरुचे मार्गदर्शन किंवा पुस्तकी वाचन या बाह्य माध्यमातून त्याने ते गोळा केलेले असते.

अपरोक्ष म्हणजे परोक्ष च्या बरोब्बर उलट अर्थात प्रत्यक्ष किंवा थेट. जेंव्हा एखादा साधक अजपा योगाचे किंवा गुरुप्रदत्त साधानामार्गाचे प्रामाणिकपणे अनुशीलन करतो तेंव्हा एक दिवस त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. त्याला आध्यत्ममार्गावरील अनेकानेक अनुभूती येऊ लागतात. कुंडलिनी जागृत होऊन चक्रांचे भेदन होऊ लागले की ज्ञान स्वयमेव प्रकट होऊ लागते. तो स्वतः प्रत्यक्ष त्या अनुभूतींचा साक्षीदार असतो. अंतःप्रेरणा साधकाला मार्गदर्शन करू लागते. आता त्याला आत्मज्ञान पुस्तके वाचून उसने गोळा करावे लागत नाही. बाह्य जगताकडून आणि ज्ञानेंद्रियांकडून ज्ञान ग्रहण करण्याची धाव खुंटून तो आंतरिक ज्ञानसागरात विहार करू लागतो. विषयांची आटणी होऊन वैराग्य आपसूक प्रकट होऊ लागते. तो दुसऱ्याला अध्यात्म विद्येचे निरुपण करण्याचा अधिकारी बनतो. परोक्ष ज्ञान जर नीट हाताळले नाही तर अहंकाराला खतपाणी घालते परंतु अपरोक्ष ज्ञान साधकाला लीन, नतमस्तक आणि वैराग्यशील बनवते.

गंमत अशी की आधुनिक काळात परोक्ष ज्ञानच बोकाळले आहे. भारंभार पुस्तके वाचावीत, ग्रंथ अभ्यासावेत आणि त्यांतील आशय बुद्धीच्या स्तरावर समजून घ्यावा यातच बहुतांश साधक धन्यता मानत आहेत. काही तर प्रसंगी वाद-चर्चा करून दुसऱ्यावर आपले मतच कसे बरोबर किंवा श्रेष्ठ आहे ते थोपावे असा खटाटोप करतांना दिसून येत असतात. या सर्व गोष्टींच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष अनुभवाने संत-सत्पुरुषांची शिकवण पडताळून पहावी अशी प्रामाणिक इच्छा फारच थोड्या साधकांच्या हृदयी असते. कोरडे अनुभवहीन पुस्तकी पांडित्य आणि त्याचे प्रदर्शन यांतच धन्यता मानण्याचा काळ आहे. आजकाल समाजात सुद्धा परोक्ष ज्ञानाला अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. अशा कनिष्ठ ज्ञानाला हारतुरेही अगदी सहज मिळत असतात.

नवीन साधकांनी लक्षात ठेवण्याची गोष्ट ही की परोक्ष ज्ञान सुरवातीच्या काळी जरी आवश्यक असले तरी ते काही सर्वस्व नव्हे. पुस्तके अथवा ग्रंथ वाचून आपल्याला अध्यात्मातील सर्वकाही कळले अशा भ्रामक समजुतीपासून स्वतःला अलिप्त ठेवणे अत्यंत महत्वाचे ठरते. अपरोक्ष ज्ञान मिळवण्यासाठी उपासनेच्या आणि साधनेच्या माध्यमातून पाठपुरावा करणे हे प्रत्येक साधकाचे प्रथम कर्तव्य आहे.

सुरु झालेल्या या आठवड्यात परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाचा सुंदर संगम घालण्याची प्रेरणा ईश्वर सर्वाना देवो अशी त्याच्या चरणी प्रार्थना करून विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 19 Feb 2018
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates