Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

श्रीशंकराचे पवित्र प्रतीक - शिवलिंग

साधारणतः साधक आपल्या उपास्य दैवताच्या पुजाअर्चनेसाठी मुर्ती अथवा तसबीर वापरतात. श्रीशंकराची उपासना मात्र सगुण आणि निर्ग़ुण अशा दोन्ही रुपात केली जाते. शिवशंकराची मुर्ती वा तसबीर शिवोपासनेत सगुण प्रतीक म्हणून वापरली जात असली तरी खर्‍या अर्थाने शिवलिंग हेच शंकराचे प्रतीक मानले जाते. बहुतेक सर्व शिव मंदिरांमधे शिवलिंगाच्या निर्ग़ुण प्रतीकाच्या माध्यमातूनच शंकराची पूजा केली जाते. शंकराची बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्धच आहेत. शिवलिंगाचा अर्थ काय, त्याचा उगम कसा झाला, त्याचे पूजन कसे करावे या विषयी शिवपुराणामधे सविस्तर वर्णन आढळते. त्या आधारानेच आपणही या गोष्टी जाणून घेणार आहोत...

सृष्टीच्या आरंभापूर्वी सर्वकाही निर्ग़ुण निरामय ब्रह्मच होते. हे ब्रह्म सत्य, ज्ञानस्वरूप, आधाररहित, निर्विकार, निराकार, निर्ग़ुण, योहिगम्य, सर्वव्यापी, निर्विकल्प, निरारम्भ, मायाशून्य, उपद्रवरहित, अद्वितीय, अनादी, अनंत, संकोच-विकास रहित आणि चिन्मय असे एकटेच पहुडले होते. हे ब्रह्म शैव दर्शनात परमशिव म्हणूनही ओळखले जाते. अशा या निर्ग़ुण ब्रह्मतत्वाच्या मनात आपण अनेक व्हावे अशी इच्छा निर्माण झाली. त्याबरोबर ते निर्ग़ुण तत्व सगुण झाले आणि सदाशिवाच्या रूपात प्रगट झाले. सदाशिवाने आपल्याच इच्छेने शक्तितत्वाची निर्मीती केली. शिव आणि त्याची शक्ती क्षणभरसुद्धा एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. जेथे शिव तेथे शक्ती आणि जेथे शक्ती तेथे शिव असा प्रकार आहे. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. या शक्तीलाच जगदंबा, अंबिका, प्रकृती, सर्वेश्वरी, त्रिदेवजननी, नित्या, मूलकारण अशा अनेक नावांनी ओळखले जाते. शिव आणि शक्ती आपल्याच लीलेने क्रिडा करू लागले.

क्रिडा करत असताना त्यांच्या मनात आले की आता अजूनही सृष्टी निर्माण करावी. पण सृष्टीनिर्मीतीच्या कार्यामुळे आपल्या क्रिडेत भंग यायला नको म्हणून अन्य कोणाची तरी नियुक्ती या कामी करावी असे उभयतांनी ठरवले. त्यानुसार सदाशिवाने आपल्या डाव्या अंगातून एका तेजस्वी पुरुषाची निर्मीती केली. त्या तेजस्वी पुरुषाला शिवाने विष्णु असे नाव दिले. जगाची रचना करण्याचे ज्ञान विष्णुला मिळावे म्हणून शिवाने स्वासावाटे वेद विष्णुला प्रदान केले. त्यानंतर विष्णु कठोर तप करू लागला. तपस्येच्या श्रमाने त्याच्या शरीरातून घाम अर्थात जलधारा वाहू लागल्या. सर्वत्र ते जल भरून राहिले. थकलेल्या विष्णुने त्यातच दिर्घकाळ निद्रा घेतली. जल शब्दाला एक प्रतिशब्द आहे 'नार' आणि त्यात शयन करणारा तो 'नारायण'.

नारायण निद्रेत असताना सदाशिवाच्या इच्छेने त्याच्या नाभीतून एका कमळाचा उद्भव झाला. ते कमळ अतिशय सुंदर होते. तेजस्वी आणि प्रकाशमान होते. त्या कमळावर शिवइच्छेनुसार ब्रह्मदेवाचा जन्म झाला. विष्णुची उत्पत्ती शिवाच्या डाव्या अंगातून झाली तर ब्रह्मदेवाची उजव्या अंगातून. जन्म झाल्याबरोबर ब्रह्मदेवाला आपण कोठून आलो? आपले कार्य काय? असा प्रश्न पडला. आपला जन्म या कमळातून झाला आहे तेव्हा या कमळाचे मुळ शोधले पाहिजे असे समजून ब्रह्मदेव कमळाच्या मुळाशी पोहोचला. त्याला असे दिसले की ते कमळ विष्णुच्या नाभीतून प्रसवलेले आहे. विष्णुने ब्रह्मदेवाला पाहिले आणि ब्रह्मदेवाने विष्णुला. दोघांनीही एकमेकांना प्रणाम केला. विष्णुने ब्रह्मदेवाला 'मुला' असे संबोधताच ब्रह्मदेवाला राग आला. दोघांमधे मी श्रेष्ठ की तु श्रेष्ठ असे भांडण सुरू झाले. बराच काळ भांडण सुरू होते पण वादाचा निकाल काही लागेना. त्याचवेळेस त्या दोघांमधे एक अत्यंत तेजस्वी अग्निस्तम्भ प्रगट खाला. दोघांनाही हे कळेना की आपल्या भांडणात हा तिसरा कोण आला. तो अग्निस्तम्भ अतिशय विशाल होता. त्याची सुरवात आणि शेवट कोठे आहे हेच त्या दोघांना कळत नव्हते. तेव्हा त्यानी असे ठरवले की ब्रह्मदेवाने स्तंभाच्या वरच्या भागाचा उगम शोधावा आणि विष्णुने खालच्या भागाचा. त्यानुसार दोघेही त्या अग्निस्तंभाचा आदी आणि अंत शोधण्यासाठा वेगाने निघाले. बराच काळ व्यतीत झाला पण त्या स्तंभाचा आदी आणि अंत शोधण्यात त्यांना अपयश आले. अत्यंत थकून दोघेही आपापल्या मुळ जागी परत आले. त्यांना कळले की ना विष्णु श्रेष्ठ आहे ना ब्रह्मदेव. त्यांनी त्या अग्निस्तंभाला भक्तीभावाने नमस्कार केला आणि प्रार्थना केली 'हे महाप्रभो! आपण कोण आहात ते आमच्या आकलनापलिकडचे आहे. कृपया आपली यथार्थ ओळख द्या'. या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शिव तेथे अवतीर्ण झाले.  सदाशिव म्हणाले, "मी सृष्टीकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहे. निर्ग़ुण आहे आणि सगुणही. सत-चित-आनन्द हे माझे खरे रूप आहे. विष्णु माझ्या डाव्या अंगापासून निर्माण झाला आहे तर ब्रह्मा उजव्या अंगापासून. माझ्या आज्ञेने ब्रह्माने सृष्टीच्या निर्मीतीचे कार्य करावे तर विष्णुने पालनाचे. सृष्टीचा संहार करण्याचे काम माझाच प्रत्यक्ष अंश रुद्र रूपाने करेन. रुद्र ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटी मधून प्रगटेल." असे सांगून शिव अंतर्धान पावला. शिवाज्ञा शिरसावन्द्य मानून ब्रह्मा आणि विष्णु आपापल्या नेमून दिलेल्या कार्यात मग्न झाले. विष्णु आणि ब्रह्मदेवाच्या वादाच्यावेळी जो अग्निस्तंभ प्रगट झाला तो म्हणजेच शंकराचे पवित्र शिवलिंग आणि शिवलिंग ज्या दिवशी प्रगट झाले तो दिवस म्हणजेच शिवरात्रीचा पावन दिवस!

नाथयोग शिरोमणी श्रीगोरक्षनाथांनी आपल्या सिद्ध-सिद्धांत पद्धती नामक ग्रंथात (जो नाथ पंथाचे तत्वज्ञान विशद करणारा अतिशय महत्वाचा प्रमाण ग्रंथ आहे) एकटे शिवतत्वच या जगदनिर्मीतीला कसे कारणीभूत आहे ते सांगताना शिव ते ब्रह्मदेव ही स्थुल उत्क्रांती शिव - भैरव - श्रीकंठ - सदाशिव - इश्वर - रुद्र - विष्णु - ब्रह्मदेव अशा प्रकारे दिली आहे. येथे रुद्र शिवतत्वाचा प्रत्यक्ष अंश असल्याने विष्णुच्या आधी आला आहे हे लक्षात घ्यावे.

कुंडलिनी योग साधकांनी येथे काही गूढ संकेत लक्षात घ्यावेत. शंकराने विष्णुला वेद स्वासातून देणे आणि अजपा साधनेचे शैव दर्शनातील महत्व हा दुवा महत्वाचा आहे. तसेच शिव-शक्ती अभिन्नत्व आणि योगग्रंथातील 'मुलाधारात शिवच शक्तीरूपात राहतो' अशा सारखे श्लोक एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे सांगत आहेत हे लगेच समजण्यासारखे आहे. षटचक्रांमधे स्वयंभू, बाण इत्यादी शिवलिंगांची केलेली कल्पनाही महत्वाची आहे. योगशास्त्रानुसार स्वाधिष्ठान चक्रात ब्रह्मदेवाची, मणिपूरात विष्णुची आणि अनाहत चक्रात रुद्राची केलेली कल्पनाही महत्वाची आहे. ब्रह्मदेवाचे निर्मीतीचे कार्य आणि प्रजनन इंद्रियांचा जवळचे स्वाधिष्ठान चक्र, विष्णुचे पालनाचे कार्य आणि मणिपुर चक्राचे उदरसंस्थेवरचे नियंत्रण, रुद्राचा संहार आणि हृदयातील षडरिपूंचा आणि भौतिक भावभावनांचा नाश, रुद्राचे भ्रुकुटीमधून प्रगटणे आणि आज्ञा चक्राचे महत्व या सर्वच गोष्टी एकमेकाशी अगदी चपलख जोडता येतात. असो.

ही झाली शिवलिंगामागची पौराणिक कथा. आता शिवलिंगाच्या तात्वीक आणि आध्यात्मिक अर्थाकडे वळू. तुम्ही कोणत्या न्या कोणत्या देवळात शिवलिंग पाहिलेच असेल. शिवलिंगाचे दोन भाग असतात. एक जो उभट स्तंभासारखा दिसतो तो आणि दुसरा जो पसरट दिसतो तो. पहिला भाग म्हणजे लिंग आणि दुसरा भाग म्हणजे योनी. या दुसर्‍या भागाला पीठ, वेदिका, जलधारा, जलहरी असेही म्हणतात. येथे लिंग आणि योनी म्हणजे शरीरावयव नव्हेत तर त्यांना शैव दर्शनामधे एक गूढ सांकेतीक अर्थ आहे. शिवपुराणातच हा अर्थ विषद करण्यात आला आहे.

लिंगमर्थं हि पुरुषं शिवं गमयतीत्यदः।
शिवशक्त्योश्च चिन्ह्यस्य मेलनं लिंगमुच्यते॥

याचा अर्थ असा की शिवलिंगामधील लिंग म्हणजे शिव आणि योनी म्हणजे शक्ती. अर्थात शिवलिंग शिवशक्ती यांचे मिलन आणि एकता दर्शवते. लिंग म्हणजे वैश्वीक पुरुषतत्व आणि योनि म्हणजे वैश्वीक स्त्रीतत्व अर्थात प्रकृती. शैव मतानुसार ही सारी सृष्टी शिव आणि शक्ती यांचा खेळ आहे. शिव आणि शक्ती एकमेकाहून भिन्न राहुच चकत नाहीत. किंबहुना शिव आणि शक्ती हे खरेतर भिन्न नाहितच तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यालाच अद्वयवाद असे म्हटले जाते. अर्धनारीनटेश्वर या अद्वयवादाचेच प्रतीक आहे. आपल्याकडे पत्नीला अर्धांगीनी म्हटले जाते ते याच अर्थाने. संसाराचा गाडा दोघांनी एकत्र ओढल्याशिवाय चालूच शकत नाही हे त्यातून अभिप्रेत असते. अद्वयवाद अद्वैतवादापेक्षा भिन्न कसा याविषयी विस्ताराने लिहिण्याची ही जागा नाही पण थोडक्यात सांगायचे तर अद्वैतवादात शक्ती वा माया हीचे अतित्वच नसते. ती दोरीवरील सर्पाच्या आरोपाप्रमाणे मित्थ्या मानली जाते. अद्वयवादात मात्र परमेश्वर आणि त्याची शक्ती हे दोनही सत्य असून त्यांचे नाते चन्द्र आणि चांदणे, दिप आणि प्रकाश यांच्यासारखे अभिन्नत्वाचे असते. भगवत गीतेतही हेच तत्व थोड्या निराळ्याप्रकारे सांगितले आले. गीता 'पुरुष आणि प्रकृति ही अनादी तत्वे आहेत' असे ठामपणे सांगते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात :

मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन गर्भं दधाम्यहम।
संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत॥

म्हणजेच "प्रकृती माझी योनि आहे. तीच्यामधे मी गर्भधारणा करतो. त्यापासूनच सर्व भूतांची उत्पत्ती होते." असे हे शिवलिंग. शिवशक्ती ऐक्याचे पवित्र चिन्ह. शिवलिंगाचे श्रेष्ठ्त्व आणि पावित्र्य असे आहे की पांडुरंगानेही ते आपल्या शिरावर धारण केले आहे. श्रीधरकवीच्याच ओवीबद्ध भाषेत सांगायचे तर -

श्रीधरवरद पांडुरंग। तेणें शिरी धरिले शिवलिंग।
पूर्णब्रह्मानन्द अभंग। नव्हे विरंग कालत्रयी ॥

पुढच्या भागात आपण शिवलिंगाचे आजच्या काळाला साजेसे आणि सर्वांना करता येईल असे पूजन कसे करावे ते पाहणार आहोत.

या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'शिवोपासना' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या.


Posted On : 19 July 2010


Tags : शिव साधना लेखमाला भक्ती नाथ