Untitled 1

शिव-शक्तीचा चिद्विलास

शक्तीच ती होय । शिवाचे सौंदर्य । शिव ची तो होय । शक्ति शोभा ।
शिव-शक्ति दोन । एकत्र होवोन । करीती भोजन स्वानंदाचे ।
शिव आणि शक्ति । वेगळी जो पाहे । तया भासताहे । विश्वाभास ।
शिव-शक्ति-ऐक्य । येता प्रत्ययास । दिसे चिद्विलास । आघवाचि ।
~ अभंग अमृतानुभव

सुलभ विवरण : संत ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका प्रसिद्धच आहे. भावार्थ दीपिका हा भगवत गीतेचा भावार्थ प्रकट करणारा ग्रंथ. पण ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव म्हणजे त्यांचा स्वतःचा अनुभव प्रकट करणारा ग्रंथ. ज्ञानेश्वरीच्या तुलनेने सर्वसामान्यांना समजायला काहीसा अवघड पण शैव दर्शनाची झलक दाखवणारा. त्याचं अमृतानुभवाचे स्वामी स्वरुपानंदांनी केलेले अभंग रूप म्हणजे अभंग अमृतानुभव. वरील ओव्या शैव दर्शनातील एक महत्वाचा सिद्धांत आपल्याला सांगून जातात.

सर्वसाधारणपणे ब्रह्म आणि माया, पुरुष आणि प्रकृती ही तत्वे एकमेकांपासून भिन्न मानली जातात. शैव दर्शनात मात्र शिव आणि शक्ती ही दोन तत्वे अजिबात भिन्न नाहीत. ती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. निराकार असतांना त्या तत्वाला शिव आणि साकार असतांना शक्ती म्हणतात एवढंच. चंद्र आणि चांदणे हे दोन शब्द एकच गोष्ट दर्शवतात. ज्योत आणि प्रकाश ही एकाच गोष्टीची दोन संबोधने आहेत. सूर्य आणि सूर्य प्रकाश एकच. तद्वतच शिव आणि शक्ती ही केवळ विषय नीट आकलन होण्यासाठी केलेली विभागानु आहे. शक्ती जणू शिवाचे सौंदर्य आणि शिव हा जणू शक्तीची शोभा. देह आणि त्याचे सौंदर्य हे जसे एकच आहेत. त्यांना वेगळे काढता येणार नाहीत तसाच प्रकार येथे आहे. हे शिव आणि शक्ती एकत्र येऊन स्वतःच्याच आनंदात डुंबत असतात. सर्वसामान्य माणूस शिव आणि शक्ती यांना भिन्न मानतो परिणामी त्याला विश्व हे विश्वंभरापासून भिन्न वाटते. जेंव्हा योग्याला शिव आणि शक्ती यांचे ऐक्य प्रत्ययास येते तेंव्हा चिद्विलास अनुभवास येतो. एकाच तत्वाचे प्रसारण विश्वात झाले आहे असे प्रत्ययास येते. समस्त विश्व एकाच चैतन्याचे स्फुरण आहे अशी अनुभूती येते.
 लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 04 April 2017