Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

Untitled 1

एक आटपाट नगर होतं...

फार काळ लोटला या गोष्टीला.

एक आटपाट नगर होतं.
त्या नगरात एक योगसाधक रहात होता.

एकदा त्या योग्याने महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी
निशीथ काळी भगवान शंकराची ध्यानपूजा मांडली.

भस्माचा त्रिपुंड लावलेल्या, रुद्राक्ष धारण केलेल्या अशा
भगवान सांब सदाशिवाचे त्याने स्मरण केले.

ध्यानस्थ होऊन शांभवी-खेचरी मुद्रा धारण करून
चंद्र आणि सूर्य स्वर लावत त्याने अजपा जप सुरु केला.
मूलबंधाच्या चिमटीत कुंडलिनीला पकडून तिला हलकेच जागे केले.

स्वयंभू लिंगाला साडेतीन वेटोळे घालून बसलेली जगदंबा आनंदली.
अलगद आपले साडेतीन वेटोळे उलगडून हलके हलके फुत्कार टाकू लागली.

पृथ्वीतत्वाचे निवासस्थान असलेल्या मूलाधार चक्रात श्रीगणेशाला वंदन करून
त्याने ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

जलतत्वाचे वसतीस्थान असलेल्या स्वाधिष्ठान चक्रात ब्रह्माला नमन करून
त्याने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

अग्नितत्वाचा वास असणाऱ्या मणिपूर चक्रात श्रीविष्णू पुढे नतमस्तक होत
त्याने रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

वायूतत्वाचे अधिष्ठान लाभलेल्या अनाहत चक्रात श्रीमहेशाला नमस्कार करून
त्याने महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

आकाशतत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विशुद्धी चक्रात जीवात्म्याचे स्मरण करत
त्याने वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

चित्ताचे संचालन करणाऱ्या आज्ञा चक्रात आत्म्याचे भजन करत
त्याने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

अमृताचे तळे ज्यांत साठवलेले आहे अशा सहस्त्रार चक्रात परमात्म्याचे चिंतन करत
त्याने जगदंबा कुंडलिनीला पंचामृत स्नान घातले.

चंद्राच्या सोळा, सूर्याच्या बारा आणि अग्नीच्या दहा कला ज्याच्यामध्ये लीन होतात
त्या परमशिवाशी जगदंबा कुंडलिनीचे मिलन घडवले.
आदिनाथाच्या मिठीत आदिशक्ती अलगद विसावली.

या अनपेक्षित घडलेल्या प्रणयाने शंभू महादेवाची ती मृगनयनी आनंदली,
मोहरली आणि लज्जेने काहीशी बावरली.

बराच वेळ त्यांच्या मिलनाचा अद्भुत आनंद अनुभवून
योगी परतीच्या प्रवासासाठी सज्ज झाला.

चंद्रामृताच्या मानस सरोवरात चिंब न्हालेली ती श्रीशंकराची
प्राणसखी काहीशा अनिच्छेनेच माघारी फिरली.

ज्या सहस्रदल चक्रात एक हजार संख्येने अजपा जप घडतो
त्या ब्रह्मरंध्राला वंदन करून योगी खाली उतरू लागला.

ज्या आज्ञा चक्रात एक हजार संख्येने अजपा जप घडतो
त्या भृकुटी स्थानी त्याने विश्वेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

ज्या विशुद्धी चक्रात एक हजार संख्येने अजपा जप घडतो
त्या कंठ स्थानी त्याने केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

ज्या अनाहत चक्रात सहा हजार संख्येने अजपा जप घडतो
त्या हृदय स्थानी त्याने सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

ज्या मणिपूर चक्रात सहा हजार संख्येने अजपा जप घडतो
त्या नाभी स्थानी त्याने मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

ज्या स्वाधिष्ठान चक्रात सहा हजार संख्येने अजपा जप घडतो
त्या उपस्थ स्थानी त्याने नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

ज्या मुलाधार चक्रात सहाशे संख्येने अजपा जप घडतो
त्या शिवण स्थानी त्याने भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.
जगदंबा कुंडलिनीला स्वयंभू लिंगावर पुनः स्थापन केले.

ज्या आदिशक्तीच्या आश्रयाने सात चक्रांच्या जपमाळेवर
अहोरात्र एकवीस हजार सहाशे संख्येने अजपा जप
घटीत होतो त्या शांकरीशक्ती पुढे योगी नतमस्तक झाला.

बारा ज्योतिर्लिंगांच्या तेजोमय दर्शनाने योगी कृतकृत्य झाला होता.
मेरुदंडात जणू दिव्यांच्या माळेसारखी ज्योतिर्लिंगांची माळ
स्वयमेव गुंफली गेली होती.
"या शरीरातच सारी ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे आहेत" या उपदेश
वाक्याची साक्षात अनुभूती तो घेत होता.

त्याने सहज एकवार सहस्राराकडे नजर टाकली.

सहस्रदलाच्या मध्यभागी भगवान शिव, अवधूत दत्तात्रेय, शंभूजती गोरक्षनाथ
इत्यादी श्रीगुरुमंडलातील महासिद्ध ज्योतिर्मय स्वरूपात विराजमान झाले होते.
सहस्रदल कमलाच्या पाकळी पाकळी वर श्रीगुरुमंडलातील
अन्य सिद्धगण स्थानापन्न झाले होते.

त्याला असे भासले की मेरुदंड म्हणजे जणू कैलास पर्वत आणि
सहस्रदल कमल म्हणजे जणू कैलास शिखर.

किंवा

मेरुदंड म्हणजे जणू गिरनार पर्वत आणि
सहस्रदल कमल म्हणजे जणू गुरु शिखर.

योग्याचे हात नकळत जोडले गेले. अष्टसात्विक भाव दाटून आले.
गात्रांना कंप सुटला. आनंदाश्रू ओघळू लागले. दाटलेल्या कंठाने तो
सहस्रारातील श्रीगुरुमंडला पुढे नतमस्तक झाला.
श्रीगुरुमंडलाची सेवा घडत राहो अशी विनवणी करता झाला.
श्रीगुरुमंडल एकमुखाने आशीर्वचन देत म्हणाले - "तथास्तु!"

त्या योग्याला जसा श्रीगुरुमंडलाचा आशीर्वाद लाभला तसाच तो सर्व वाचकांना लाभो.
ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स साठी अजपा ध्यानाची ओंनलाईन सेशन्स. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 01 March 2022