Untitled 1

अजपा साधकाला समाधीचा "नाद" हवाच

प्राचीन योगशास्त्रात योग हा आठ अंगांचा अर्थात अष्टांग मानला गेला आहे. भगवान शंकराने वर्णिलेल्या योगशास्त्राच्या चारही शाखा अर्थात मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग ह्या ही आठ अंगे समाविष्ट करतात. जगदंबा कुंडलिनी ही या चारही योगामार्गांची आधारभूत शक्ती आहे. श्वेताश्वतर उपनिषदाच्या भाषेत सांगायचे झाले तर ती देवात्म शक्ती आहे. मंत्रयोगातील हजारो मंत्र, हठयोगातील आसने-प्राणायाम-बंध-मुद्रा इत्यादी क्रिया या शेवटी कशासाठी आहेत तर ध्यानमार्गावरील प्रगतीसाठी. ध्यानमार्ग हा प्रामुख्याने लययोग आणि राजयोगाचा विषय आहे. योगी स्वात्माराम स्पष्टपणे सांगतो की -

राज-योगम् अजानन्तः केवलं हठ-कर्मिणः।
एतान् अभ्यासिनो मन्ये प्रयास-फल-वर्जितान् ॥

याचा थोडक्यात अर्थ असा की जो साधक राजयोग अर्थात समाधी हे उद्दिष्ठ न ठेवता केवळ हठयोगातील निरनिराळ्या क्रिया करतो त्याचा तो हठाभ्यास व्यर्थ गेल्या सारखा असतो कारण त्याला योगमार्गाचे अंतिम फळ जे समाधी ते मिळत नाही.

मग प्रश्न असा की हठयोगातील क्रिया न करता थेट ध्यानाभ्यास का करू नये. तसं करायला अर्थातच हरकत नाही परंतु त्या प्रकारात अपयश पदरात पडण्याची शक्यता अधिक. कोणतीही शिस्त आणि प्रशिक्षण नसलेल्या मनाला थेट मनानेच वेसण घालणे हे वाटते तेवढे सोपे नाही. मंत्रयोगात मनाला मंत्राचे आलंबन देऊन त्याला इष्ट दैवातेच्या चरणांशी लीन करतात. हठयोगात प्राणायाम आणि मुद्रांच्या सहाय्याने मनाला वेसण घालण्याचे प्रशिक्षण शिस्तबद्धपणे मिळत असते. त्यामुळे मंत्रयोग आणि हठयोग हे निरर्थक किंवा टाकाऊ आहेत असं अजिबात नाही. त्यांचं उद्दिष्ठ आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. शरीर-मनाला ध्यानासाठी अर्थात लययोग आणि राजयोगासाठी तयार करणे हे त्यांचं काम आहे. त्या दृष्टीने ते अत्यंत उपयुक्त आहेत यात शंका नाही. परंतु साधकांनी केवळ शारीरिक क्रीयांमाध्येच अडकून न रहाता आपली मनोभूमी समाधी साधनेसाठी तयार केली पाहिजे.

आता ध्यान करायचे म्हणजे सुद्धा कोणतीतरी ध्यानाची पद्धती साधकाला स्वीकारावी लागतेच. असं म्हणतात की भगवान शंकराने मनोलय साधण्याचे सव्वा कोटी प्रकार सांगितले आहेत.

श्रीआदिनाथेन सपादकोटि लय प्रकाराः कथिता जयन्ति।

नाथ संप्रदायात या सव्वा कोटी प्रकारातील एक प्रकार अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आदी दिग्गजांनी अजपा गायत्रीची महती गाण्याबरोबरच लयाचा हा प्रकार आग्रहाने आपल्या ग्रंथांमध्ये प्रतिपादित केला आहे. तो प्रकार म्हणजे नादानुसंधान. हठयोग प्रदिपिकेचा रचयिता योगी स्वात्माराम म्हणतो -

नादानुसन्धानकम् एकम् एव मन्यामहे मुख्यतमं लयानाम् ।

अर्थात सर्व मनोलयाच्या प्रकारांत नादानुसंधान हाच प्रमुख आहे.

नादानुसंधान किंवा नादश्रवण ही एक अतिशय अद्भुत साधना आहे. अजपा गायत्रीला जर नादानुसंधानाची जोड दिली तर जणू दुग्ध शर्करा योगच घडून येतो. नादानुसंधानाची खासियत ही की अल्प-ज्ञानी साधक सुद्धा त्याच्या आधारे तरून जावू शकतो. गोरक्षनाथ म्हणतात -

अशक्य तत्त्व बोधानां मूढानाम् अपि संमतम्।
प्रोक्तं गोरक्ष-नाथेन नादोपासनम् उच्यते॥

गोरक्षनाथानी नादोपासासनेचे श्रेष्ठत्व सांगतांना काय सांगितले आहे तर ज्या साधकांना योगशास्त्रातील गूढगम्य ज्ञान आकलन करता येत नाही अशा मूढ साधकांना सुद्धा नादश्रवण साधना उपयुक्त ठरते. ज्ञानी साधकांसाठी तर ती अति-प्रभावी ठरेल हे ओघाने आलेच.

आता नादानुसंधान कसे करायचे बरे? त्यासाठी तुम्हाला षण्मुखी मुद्रा आणि शांभवी मुद्रा येणे आवश्यक आहे. या दोन प्रक्रियांच्या सहाय्याने काय करायचे तर -

मुक्तासने स्थितो योगी मुद्रां सन्धाय शाम्भवीम्।
शृणुयाद् दक्षिणे कर्णे नादम् अन्तास्थम् एकधीः॥
श्रवणपुट नयनयुगल घ्राण मुखानां निरोधनं कार्यम्।
शुद्ध सुषुम्णासरणौ स्फुटम् अमलः श्रूयते नादः॥

मुक्तासन किंवा पद्मासना सारखे एखादे शरीर स्थिर आणि ताठ ठेऊ शकेल अशा आसनात बसावे. त्यानंतर शांभवी मुद्रा धारण करावी. शांभवी मुद्रा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते त्यामुळे इथे विस्तृत विवेचन करत नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर शांभवी मुद्रेत भ्रूमध्य चक्राचे विशिष्ठ प्रकारे ध्यान केले जाते. शांभवी मुद्रा धारण करून मग षण्मुखी मुद्रा धारण करावी. षण्मुखी मुद्रेत कान, नाक, डोळे आणि मुख अशी "छिद्रे" हाताच्या बोटांनी विशिष्ठ प्रकारे बंद केली जातात. त्या जोडीला काही बंधही लावले जातात. या दोन मुदा लावल्या की उजव्या कानात उमटणारे आवाज किंवा नाद लक्षपूर्वक श्रवण केले जातात.

येथे योगग्रंथ जरी "उजव्या कानातले नाद" ऐका असं सांगत असले तरी मी असं सांगीन की सुरवातीला उजव्या-डाव्या च्या फार फंदात पडू नका. जेथे कुठे जे येतील ते आवाज पहिले "पकडण्याचा" प्रयत्न करा. एकदा का नाद "पकडता" आले की मग पुढचं fine tuning करू शकता.

सुरवातीला हे आवाज अगदीच अर्थहीन स्वरूपाचे असतात. सराव जसा जसा वाढत जातो तसं तसं सुषुम्ना नाडीत अनाहत नादाची रूपे "दश नाद" प्रकारे उत्पन्न होतात. मग मागे सांगितल्या प्रमाणे नाद आणि प्रकाशाची लक्षणे प्रकट होऊ लागतात. अर्थात ही अत्यंत प्रगत अवस्था आहे. अनेक वर्षांचा काळ त्यासाठी लागू शकतो. अनाहत नाद हे कुंडलिनी शक्तीची एक अभिव्यक्ती आहे. नादश्रवण म्हणजे एक प्रकारे कुंडलिनी ध्यानच आहे.

काही साधकांना षण्मुखी मुद्रा अत्यंत कठीण वाटते. खरं तर ती सरावाने जमण्यासारखी आहे पण तरीही अनेकांना ती कठीण वाटते. त्यांनी काय करावे? एक युक्ती सांगतो. नीट लक्ष द्या.

प्रथम कोणत्याही आसनात ताठ बसून "अजपा गायत्री" साधना सुरु करावी. तीन ते पाच मिनिटे साधना झाली की लगेच भ्रामरी प्राणायामाची आवर्तने करावीत. ती आवर्तने करत असतांना जो "भुंग्यांच्या" गुंजारवा सारखा आवाज येतो तो आपण जणू उजव्या कानाने ऐकत आहोत अशी कल्पना करून लक्षपूर्वक ऐकावा. पाच आवर्तने झाल्यावर परत अजपा गायत्रीत स्थित व्हावे. असे आलटून पालटून करावे. हळूहळू त्या नादाची गोडी लागते. हे करत असतांना षण्मुखी मुद्रेचा वेगळा सराव करतच रहावा. एक दिवस भ्रामरी वरून षण्मुखीवर शिफ्ट व्हावे.

भामरी प्राणायाम सुद्धा येत नसेल तर? अजून एक युक्ती सांगतो. पहिल्या प्रमाणे अजपा गायत्रीत स्थानापन्न व्हावे. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी आपल्या कानांची छिद्रे बंद करावीत. कानात जो काही "आवाज" ऐकु येईल तो थोडावेळ श्रवण करावा. हात काढावे आणि परत अजपा गायत्री सुरु करावी. असे वारंवार करावे. हळूहळू गोडी लागेल.

एक लक्षात ठेवा की वर मी सांगितलेल्या दोन्ही युक्त्या ह्या मूळ षण्मुखी मुद्रेची जागा घेऊ शकणार नाहीत. परंतु त्यांनी तुम्हाला "नाद" म्हणजे काय ते जाणवू लागेल आणि तुमच्यात एक दिवस षण्मुखीत बसण्याची इच्छा निर्माण होईल. 

अजून एक गुपित सांगतो. अनेकांचा असा समज असतो की अनाहत नाद हे फक्त "कान झाकले" कीच ऐकायला येतात. नाही. तसं बिलकुल नाही. सुरवातीच्या काळी जरी "कान झाकणे" आवश्यक असलं तरी अजपा जप करता करता, षण्मुखी करता करता, शांभवी करता करता एक वेळ अशी येते की मग कान झाकण्याची सुद्धा गरज उरत नाही. ध्यानावस्था प्रगाढ झाली की अनाहत ध्वनी आपोआप सुषुम्नेत प्रकट होतात.

असो.

अनाहत नाद हे जगदंबा कुंडलिनीचीच एक अभिव्यक्ती. अनाहताची सांगता होते ओंकारात. ईश्वरी कृपेने तुम्हाला सुषुम्नेच्या बासरीत होणारा अनाहताचा गुंजारव ऐकायला मिळो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 03 February 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates