Untitled 1

जीवो जीवस्य जीवनम्

गेल्या शनिवारची गोष्ट. एका जुन्या घराच्या खिडकीत मी उभा होतो. घराच्या मागे थोडी झाडी आहे म्हणून जरा न्याहाळत निवांत उभा होतो. एका मोठ्या झाडाची लांबलचक फांदी माझ्या बरोब्बर समोर होतो. त्या फांदीवर सकाळचे मस्त कोवळे उन पडले होते.

काही मिनिटांनी त्या फांदीवर एक इवलीशी खार खाद्य शोधत शोधत आली. ती ओरडतांना तिची गोंडेदार शेपटी लयबद्ध पद्धतीने वर खाली होत होती. आपल्याच शोधात गर्क असलेली खारुताई त्या मोठ्या फांदीवर बागडत होती. कोवळ्या स्वच्छ उन्हात तिच्या पाठीवरील रामाची शाबासकी मोठी सुंदर आणि तजेलदार दिसत होती.

सुमारे पाच-सात मिनिटे झाली असतील. ध्यानीमनी नसतांना अचानक एक शिक्रा (वर दिलेला फोटो मला जेमतेम टिपता आला) त्या खारीवर झेपावला. पक्षी आकाराने बेताचाच असला तरी मोठा ऐटदार होता.  ती खार बिचारी जीवाच्या आकांताने पळाली आणि बाजूच्या गच्च पाने असलेल्या फांदीवर लपली. मी स्तब्धपणे खिडकीत उभा. समोर ती खार जीव वाचवण्यासाठी स्तब्ध. तो शिक्रा मान वेडीवाकडी करून तिचा शोध घेत होता. कावळे आणि बुलबुल ओरडत ओरडत त्या लढाईचे साक्षीदार बनू पहात होते.

ती खार काही पानांतून बाहेर येईना आणि तो शिक्रा काही तेथून हलेना. पंधरा मिनिटे त्यांची ही लढाई सुरु होती. अखेर त्या शिक्राने सफाईदारपणे त्या खारीला टिपलेच. एकच कलकालाट झाला. आपले सावज पंजांत आणि चोचीत उचलून शिक्रा बाजूच्या खुरट्या झुडपांत गुडूप झाला.

त्या खारीची दया वाटावी की त्या शिक्राचा राग यावा ?? खरंतर दोन्ही चूकच ठरेल. जीवो जीवस्य जीवनम् हा निसर्गाचा नियम आहे. कठोर वाटला तरी त्यावरच चौरांशी लक्ष जीवयोनींच अस्तित्व अवलंबून आहे. श्रीगुरुचरित्रात एके ठिकाणी छान सांगितलंय -

...
जें जें होणार जया काळीं निर्माण करी चंद्रमौळी
तया आधीन विश्व जाण
विश्वव्यापक नारायण उत्पत्तिस्थितिलया कारण
पिपीलिकादि स्थूळ-जीवन समस्तां आहार पुरवीतसे
'आयुरन्नं प्रयच्छती' ऐसें बोले वेदश्रुति
पंचानन आहार हस्ती केवीं करी प्रत्यहीं
चौरांशी लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांसी
निर्माण केले आहारासी मग उत्पत्ति तदनंतरे
रंकरायासी एक दृष्टीं करूनी पोषितो हे सृष्टि
...

त्यामुळे राग-लोभ, खेद-हर्ष यांपलीकडे जाऊन ईश्वरी सृष्टीरचनेला, निसर्ग देवतेला आणि सर्वांमध्ये वास करत असलेल्या प्राणतत्वाला नतमस्तक होऊन वंदन करावे हे उत्तम.

असो.

निसर्गदेवतेचा आदर करण्याची बुद्धी मानवजातीला लाभो आणि निसर्गदेवतेचा वरदहस्त मानवजातीवर सदैव राहो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 26 Nov 2018
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates