Untitled 1

श्रावणातील सर्वोत्तम उपासना

आपल्याकडे श्रावण १२ ऑगस्ट रोजी सुरु होत आहे. काल-परवा एका अजपा योग स्टुडंटने विचारले - "सर, यावर्षी श्रावणात काय विशेष उपासना करू?". असं कोणाला काही उपासना वगैरे सांगतांना सरधोपट एकच सल्ला देऊन चालत नाही. साधक साधकात फरक असतो. ज्याला त्याला त्याच्या त्याच्या पातळीनुसार आणि गरजेनुसार साधना सांगणे आवश्यक असते. तरच लाभ घडून येतो. अन्यथा उपासना केवळ औपचारिकता म्हणून केली जाते.

त्याला काय उपासना / साधना सांगावी याचा विचार मनात सुरु होता. सहज म्हणून ज्ञानेश्वरी काढली. डोळे बंद करून एक पान उघडले आणि त्यांतील एका ओवीवर बोट ठेवले. ज्ञानेश्वरी हा सिद्ध ग्रंथ. प्रत्येक ओवीत खोल गुढगर्भ अर्थ ओतप्रोत भरलेला. बोटाखाली कोणती ओवी आली ते पाहिले आणि मनाला खुप प्रसन्न वाटले. भावार्थ दिपिकेने काय छान ओवी आपसूक सुचवली पहा !

अध्याय ९ वा, अर्थात राजविद्याराजगुह्ययोग, ओवी क्रमांक ५१८.

माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख । मद्याजी चोख । याचि नांव ॥

या ओवीचा थोडक्यात अर्थ असा की - जो मनुष्य सदोदित भगवंताचेच अनुसंधान ठेवतो, ज्याने मनातील संकल्प अर्थात इच्छा सर्वथा जाळून टाकलेल्या असतात, असा भक्त ईश्वराचे खऱ्या अर्थाने पूजन करणारा असे नामाभिधान प्राप्त करतो.

काय अचूक आणि छान सल्ला आहे सर्वच साधकांसाठी. देवाची पूजा-अर्चा बरेचजण करत असतात. पण त्यांतील किती जण प्रतिक्षण अनुसंधान ठेवतात? त्यांतील कितीजणांना मनातील इच्छा-वासना कणभर का होईना जाळणे जमते?

बहुतेकांची पूजा-अर्चा ही उथळ आणि वरवरचीच रहाते. त्यात भक्तीची खोली आणि तीव्रता अजिबात असत नाही. त्यातही बहुतेकांची भक्ती ही गौणी भक्ती या सदरातच मोडत असते. त्यापुढे जाऊन परा भक्ती साधणारे साधक विरळच.

श्रावण सुरु असल्याने अनेक ठिकाणी श्रावणातील उपासना, उपाय, तोडगे, टोटके वगैरे वगैरे गोष्टी वाचायला मिळत आहेत. आपला उपाय अथवा उपासना ही जालीम असून महाचमत्कारी फळ प्रदान करणारी आहे असा दावाही अनेक महाभाग करतांना दिसत आहे. ज्याने त्याने आपापल्या श्रद्धेनुसार अशा गोष्टी जरूर कराव्यात पण खरा "तोडगा" जर काही असेल तर तो माउलीच्या या ओवीत सांगितलेला आहे.

सदासर्वकाळ भगवंताचे अनुसंधान, स्मरण, नामस्मरण, चिंतन यासारखी दुसरी उपासना नाही. अजपा साधनेतील "सोहं" आणि "नाम" हे एकच कसे आहे याची अनुभूती मग हळूहळू येऊ लागेल. प्राणायाम-ध्यान-धारणा इत्यादी साधने शेवटी कशासाठी तर मनातील इच्छा आणि असंख्य संकल्प-विकल्प यांचा निचरा व्हावा म्हणून.

या ओवीत सांगितलेली ही उपासना केवळ श्रावणात करायची नसून ती आयुष्यभराची उपासना आहे. अजपा योगाविषयी भगवान शंकर पार्वतीला सांगतात की शिवरूपी जीवात्म्याची पूजा कशी करावी तर "सोहं भावेन पूजयेत". नाथ संप्रदायात अभिप्रेत असलेले जीवात्मा-आत्मा-परमात्मा यांतील ऐक्य ते हेच. पूजा पंचामृताने करा अथवा साग्रसंगीत अभिषेक घाला जोवर हे "सोहं भावेन पूजयेत" साधत नाही तोवर योग-अध्यात्म मार्गावरचे श्रेष्ठतम फळ कधीच प्राप्त होणारे नाही.

असो.

सुरु झालेला श्रावण तुम्हा सर्वाना भरभरून अध्यात्मसुख आणि समाधान प्रदान करो हीच त्या शंभू महादेवापाशी विनम्र प्रार्थना.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 13 August 2018