Untitled 1

प्राचीन कालगणना

अजून एका वर्ष काळाच्या पडद्याआड होत आहे. आज आपल्याकडे काळ मोजण्याची घडाळ्यासारखी अचूक साधने उपलब्ध आहेत. प्राचीन काळी अशी कुठलीच साधने नव्हती. तरीही प्राचीन ऋषीमुनींनी कालमान मोजण्याची परिभाषा विकसित केली होती. आज आपल्याला त्यांची परिमाणे अगदीच जुनीपुराणी वाटतील पण आजच्यासारखी कोणतीही वैज्ञानिक साधने उपलब्ध नसताना त्यांनी कालमापन करण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच महत्वाचा आहे. या प्राचीन कालगणनेवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण कुतूहल किंवा गम्मत म्हणून तरी प्राचीन कालगणनेच्या नजरेतून जाणार्‍या वर्षाकडे पाहायला काहीच हरकत नाही. शिवपुराण आणि अन्य काही शास्त्रग्रंथांच्या आधारे ही कालगणना अशी आहे :

 • डोळ्याची पापणी लावण्यास जेवढा वेळ लागतो त्याला निमेष असे म्हणतात.
 • पंधरा निमेषांची एका काष्टा होते.
 • तीस काष्टा मिळून एक कला होते.
 • तीस कलांचा एक मुहूर्त होतो.
 • तीस मुहूर्त मिळून एक दिवस-रात्र होते.
 • पंधरा दिवस-रात्रींचा एक पक्ष बनतो.
 • दोन पक्ष मिळून एक महिना बनतो.
 • माणसांचा एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस-रात्र बनतो. शुक्ल पक्ष म्हणजे पितरांचा दिवस आणि कृष्ण पक्ष म्हणजे पितरांची रात्र.
 • सहा महीने मिळून एक आयन बनते.
 • दोन आयन मिळून एक वर्ष बनते.
 • माणसांच्या एका वर्षात देवतांचा एक दिवस-रात्र असतो. उत्तरायण म्हणजे देवतांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवतांची रात्र.
 • माणसांची तीस वर्षे म्हणजे देवतांचा एक महिना आणि माणसांची 360 वर्षे म्हणजे देवतांचे एक वर्ष. या देवतांच्या वर्षाला दिव्य वर्ष असे म्हणतात.
 • देवता वर्ष हे प्रमाण मानून युगांची कालगणना केली जाते.
 • सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशी चार युगे मानली गेली आहेत.
 • प्रत्येक युगाला संध्या आणि संध्यान्त असतो. संध्या म्हणजे युगाच्या पूर्वीचा काळ आणि संध्यांश म्हणजे युगाच्या शेवटचा काळ. म्हणजेच संध्या - मुख्य युग काल - संध्यांश असा क्रम असतो.
 • सत्ययुगात 400 दिव्य वर्षांची संध्या, 4000 दिव्य वर्षांचे युग आणि 400 दिव्य वर्षांचा संध्यांश असतो.
 • त्रेतायुगात 300 दिव्य वर्षांची संध्या, 3000 दिव्य वर्षांचे युग आणि 300 दिव्य वर्षांचा संध्यांश असतो.
 • द्वापारयुगात 200 दिव्य वर्षांची संध्या, 2000 दिव्य वर्षांचे युग आणि 200 दिव्य वर्षांचा संध्यांश असतो.
 • कलियुगात 100 दिव्य वर्षांची संध्या, 1000 दिव्य वर्षांचे युग आणि 100 दिव्य वर्षांचा संध्यांश असतो.
 • चारी संध्या, युगकाळ आणि संध्यांश अशी मिळून 12,000 दिव्य वर्षे होतात.
 • या चार युगांना चतुर्युग म्हणतात आणि अशी 1000 चतुर्युगे मिळून एक कल्प बनतो.
 • वरील दिव्य वर्षे जर मानवीय वर्षांमध्ये मोजली तर खालील प्रमाणे हिशोब होईल :
युग संध्या युगकाल संध्यांश एकूण
सत्य 144000 1440000 144000 1728000
त्रेता 108000 1080000 108000 1296000
द्वापार 72000 720000 72000 864000
कलि 36000 360000 36000 432000
चतुर्युगातील एकूण मानवीय वर्षे 4320000
 • एका कल्पात चौदा मन्वंतरे असतात.
 • एक मन्वंतर म्हणजे 71 चतुर्युगे.
 • एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस-रात्र होतो.
 • ब्रह्मदेवाच्या दिवसात सृष्टी उत्पन्न होते आणि रात्रीत ती लय पावते. 
 • या दिवसानुसार ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे असते.
 • असे 1000 ब्रह्मदेव झाले की विष्णूची एक घटका होते.
 • असे 1000 विष्णु झाले की रुद्राचा एक पळ होतो.
 • असे 1000 रुद्र झाले की आदिमायेचा अर्थात महाशक्तीचा अर्धा पळ होतो.
 • जन्मलेल्या प्रत्येकाला मरण हे आहेच. काहींना लवकर तर काहींना विलंबाने एवढच. पण मृत्युंजय, महाकाल अर्थात परम शिव मात्र या सर्वांपलीकडे शाश्वत आणि अनंत असतो. त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही.
 • आता थोडा गोंधळात टाकणारा भाग. वर सांगितलेले उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चक्र अनादी काळापासून सुरू आहे आणि अनंतापर्यंत सुरूच रहाणार आहे. म्हणजेच हे चक्र सुरू होण्याची विशिष्ट अशी वेळ नाही आणि विशिष्ट वेळी हे थांबेल असेही नाही. कल्पामागून कल्प असे हे चक्र अव्ह्याहतपणे सुरूच असणार आहे. सर्वसाधारण मानवी मनाला ही 'अनंताची' संकल्पना चटकन कळणारी नसली तरी ज्यांनी बराच काळ साधना केली आहे त्यांना काळ हा मनावर कसा अवलंबून असतो ते थोड्या अंशी तरी माहिती असेलच.

ह्या कालमानाचा नुसता विचार केला तरी धडकी भरते. यात मनुष्याचे किती जन्म झाले, किती होणार याचा विचारही करवत नाही. माणूस परमेश्वरी शक्तिपूढे केवढा नगण्य आहे ते जाणवते. असे असतानाही माणसं आपल्या विद्वत्तेचा, संपत्तीचा आणि अन्य अनेक गोष्टींचा व्यर्थ अहंकार का बरे जोपासतात? असो.

जाता जाता अजून एक. चालू कल्पातील 28 वे कलियुग सुरू आहे आणि 31 डिसेंबर 2010 ला चालू कलियुगाची सुमारे 5112 मानवीय वर्षे संपलेली असतील! 

सर्व वाचकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आगामी वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाचे, समृद्धीचे आणि समाधानाचे जावो हीच जगद्नियंत्या महाकालाच्या चरणी प्रार्थना.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 27 December 2010


Tags : अध्यात्म शिव योगग्रंथ शक्ती विचार