Untitled 1

साधकासाठी गुणग्राहीपणा आणि विवेक आवश्यक

श्रीमदभागवतामध्ये अवधूत दत्तात्रेय आणि यदु राजा यांचा संवाद फार रोचक आहे. अवधूत दत्तात्रेयांचे तेजस्वी स्वरूप पाहून यदु राजा प्रभावित होतो. दत्तात्रेयांना शरण जाऊन त्यांच्या गुरुंविषयी विनयपूर्वक विचारणा करतो. त्याला उत्तर म्हणून अवधूत शिरोमणी त्याला आपले २४ गुरु कोण ते सांगतात. त्यांच्या संवादातून आपल्याला एक फार महत्वाची गोष्ट शिकता येते. उद्धवाने श्रीकृष्णाकडे जेंव्हा संन्यास आणि वैराग्याचा उपदेश मागितला तेंव्हा श्रीकृष्णाने हाच संवाद उद्धवाला ऐकवला. दत्तात्रेय यदुला आपले २४ गुरु सांगतात तो भाग मी अन्यत्र सांगितला आहे त्यामुळे येथे पुनरावृत्ती करत नाही. ज्यांना आवड आहे आणि शक्य आहे त्यांनी मूळ श्रीमदभागवतामधील हा संवाद जरून वाचावा. भगवान दत्तात्रेयांनी सांगितलेले २४ गुरु असे आहेत :

पृथ्वी, वायु, आकाश, जल, अग्नि, चन्द्रमा, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधाच्या पोळ्यातून मध काढणारा, हरिण, मासा, पिंगला वेश्या, कुरर पक्षी, बालक, कुमारिका, बाण बनवणारा, सर्प, कोळी आणि भ्रमर.

येथे भगवान दत्तात्रेयांचा एक गुण मला खुप महत्वाचा वाटतो. तो म्हणजे गुणग्राहीपणा. माणसामध्ये दुसऱ्याचे चांगले गुण धारण करण्याची जी वृत्ती असते ती साधकाचा खरा गुरु असते. अवधूत शिरोमणी असलेल्या दत्तात्रेयांनी किती सहजपणे आजूबाजूच्या गोष्टींकडून चांगले गुण स्वीकारले. दुसऱ्याच्या अंगातील गुण स्वीकारायला मनाचा मोठेपणा आवश्यक आहे. त्याचाबरोबर आवश्यक आहे तो विवेक.

मोठ्या मोठ्या सत्पुरुषांचे भक्त म्हणून मिरवणारी मंडळी प्रसंगी निषिद्ध वर्तन करतांना आढळतात. उच्च कोटीच्या सद्गुरूंचे चरण धरूनसुद्धा त्यांना वैराग्य प्राप्त होत नाही. आत्मप्रौढी, अहंकार, पंथीय अभिनिवेश असे दुर्गुण त्यांच्यामध्ये वारंवार प्रकट होताना दिसतात. अध्यात्म मार्गावर गुरु असून सुद्धा "अनाथ" अशी त्यांची अवस्था झालेली असते. ब्रह्मज्ञानी गुरु मिळूनसुद्धा ते त्याच्याकडून काही लाभ मिळवू शकत नाहीत कारण त्याच्या शिकवणीचा आणि गुणांचा अंगीकार करणं त्यांना जमत नाही.

तात्पर्य हे की संत-सत्पुरुशांचा उपदेश अंगीकारण्यासाठी आवश्यक असलेला गुणग्राहीपणा आणि विवेक अध्यात्ममार्गावर परम आवश्यक आहे. गुणग्राहीपणा निर्मळ मनावर अवलंबून आहे आणि मनाची निर्मलता अनाहत चक्राशी निगडीत आहे. त्याचप्रमाणे विवेकशील बुद्धीचा संबंध थेट विशुद्धी चक्राशी आहे. सरस्वती नाडीशी आहे. मेधा नाडीशी आहे. याच विवेक बुद्धीच्या आधारे अज्ञानरूपी "हलाहल" पचवण्याची शक्ती अंगी येते. मन आणि बुद्धी अर्थात मनोमय कोष आणि विज्ञानमय कोष निकोप होण्यास मी शिकवलेली तिसरी आणि चौथी क्रिया विशेष उपयोगी आहे.

असो.

नवीन वर्ष सुरु झाले आहे. सर्व वाचकांना आपापल्या सद्गुरूंची शिकवण अंगी बाणवण्यासाठी आवश्यक असलेला गुणग्राहीपणा आणि विवेकशक्ती प्रचुर प्रमाणात लाभो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 07 January 2019