Untitled 1

तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु

सर्व योगाभ्यासी वाचक आपापल्या आवडीच्या श्रावणातील उपासनेमध्ये नक्कीच व्यग्र असणार. उपासना म्हटली की ती तीन प्रकारची असू शकते - नित्य, नैमित्तिक आणि काम्य. आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली ती नित्य उपासना. तुमच्यापैकी अनेकजण रोज नेमाने जप, स्तोत्रपाठ, ध्यान-धारणा वगैरे करत असतील ती सगळी उपासना नित्य उपासना झाली. काही उपासना ह्या विशिष्ठ प्रसंगी केल्या जातात. उदाहरणार्थ, श्रावण महिन्यांत अनेक जण विशेष पूजा, उपास, अनुष्ठान, व्रत वगैरे करतात. ही उपासना श्रावणाचे निमित्त साधून त्या विशिष्ठ काळातच केली जाते. ही झाली नैमित्तिक उपासना. काही वेळा आयुष्यातील भौतिक कामनांची पूर्ती करण्याकरता काही विशिष्ठ उद्देश मनात बाळगून उपासना केली जाते. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती सुख-समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करतो. त्याच्या श्रद्धेनुसार काही उपासना वगैरे करतो. अशी उपासना केवळ एक विशिष्ठ कामना धरून केलेली असते. त्यात आध्यात्मिक प्रगती वगैरे असा उद्देश नसतो. ही झाली काम्य उपासना.

उपासना कोणत्याही प्रकारची असली तरी ती करण्यामागे काही ना काही हेतू असतोच. आध्यात्मिक आणि यौगिक दृष्टीने बघायचं झालं तर हा हेतू परमेश्वरापुढे प्रकट करणं आणि त्याला आपल्या उपासनेचं उद्दिष्ट सांगणं म्हणजे त्या उपासनेचा "संकल्प" करणं. उपासना करणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा पोत कसा आहे त्यानुसार हा संकल्प तामसिक, राजसिक किंवा सात्विक असू शकतो. दुसऱ्या विषयी वाईट भावना किंवा परपीडा हा हेतू मनात असेल तर ती तामसिक उपासना ठरते. स्वतःच्या सुख-समृद्धीची कामना मनात ठेऊन केलेला संकल्प हा राजसिक ठरतो. आध्यात्मिक प्रगती, लोककल्याण, समाजहित, देशहित, मनःशांती वगैरे हेतू मनात ठेऊन केलेली उपासना ही सात्विक ठरते. ह्या तीनपेक्षा श्रेष्ठ ती म्हणजे निष्काम उपासना. कोणताही हेतू मनात न ठेवता केवळ परमेश्वराच्या प्रेमापोटी, भक्तीपोटी केलेली ही उपासना असते. अर्थात ही उपासनेची उच्च पायरी आहे. सगळ्यांनाच काही ती एकदम साधत नाही.

तुम्हा सर्व योगाभ्यासी वाचक मंडळींची श्रावण उपासना जोमाने सुरु असणार यात शंका नाही. त्यामुळे आज कुठल्या नवीन साधनेविषयी किंवा उपासानेविषयी सांगण्यापेक्षा यजुर्वेदातील एका फार छान आणि छोटेखानी स्तोत्राविषयी सांगतो. या स्तोत्राला "शिवसंकल्प स्तोत्र" किंवा "शिवसंकल्प सुक्त" म्हणतात. मनात सात्विक संकल्प कसा असावा ते यात फार चांगलं सांगितलं आहे. संस्कृत श्लोकांचा शब्दनशब्द अर्थ किंवा पांडित्यपूर्ण विवेचन देणे हा माझा उद्देश नाही. माझ्या स्वतःच्या शब्दांत त्याचा सोपा भावार्थ देणे एवढाच मर्यादित उद्देश आहे.

यज्जाग्रतो दूरमुदैति दैवं तदु सुप्तस्य तथैवैति । दूरंगमं ज्योतिषां ज्योतिरेकं तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु ॥1॥

जागृत आणि स्वप्न अवस्थेमध्ये मनाची धाव मोठी असते. सुषुप्ती अवस्थेत ते आत्म्यात विसावते. असे हे मन प्रकाशाप्रमाणे क्षणात सर्वदूर फिरून येऊ शकते. ते जणू प्रकाशांचा प्रकाश आहे. असे माझे मन शिवसंकल्पाने अर्थात शुभ विचारांनी युक्त असो.

येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति विदथेषु धीराः। यदपूर्वं यक्षमन्तः प्रजानां तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु  ॥2॥

ज्या मनाच्या सहाय्याने धैर्यवान, कर्मवान आणि चिंतनशील सत्पुरुष सर्वांच्या कल्याणासाठी यज्ञ-जप-तप आदी कर्मे करतात त्याप्रमाणे माझे मन सुद्धा शिवसंकल्पाने अर्थात शुभ विचारांनी युक्त होवो.

यत् प्रज्ञानमुत चेतो धृतिश्च यज्ज्योतिरन्तरमृतं प्रजासु । यस्मान्न ऋ ते किन कर्म क्रियते तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु  ॥3॥

जे मन उत्तम ज्ञान, चेतना आणि निश्चय प्रदान करते, जे मन सर्व जीवांमध्ये वास करणाऱ्या आत्म्याचे ज्ञान प्रकाशित करते, ज्या मनाच्या साहाय्याशिवाय कोणतेही कर्म घडणे शक्य नाही ते माझे मन शिवसंकल्पाने अर्थात शुभ विचारांनी युक्त होवो.   

येनेदं भूतं भुवनं भविष्यत्परिगृहीतममृतेन सर्वम् । येन यज्ञस्तायते सप्तहोता तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु॥4॥

जे मन भूत-वर्तमान-भविष्य इत्यादी कालांच्या भागांचे ज्ञान प्राप्त करण्यास समर्थ आहे, ज्या मनाच्या शक्तीने परिपूर्ण होऊन पंचेंद्रिये, बुद्धी आणि आत्मा यांद्वारे "सप्तहोत्री यज्ञ" केला जातो ते माझे मन शिवसंकल्पाने अर्थात शुभ विचारांनी युक्त होवो.

यस्मिन्नृचः साम यजूंषि यस्मिन् प्रतिष्ठिता रथनाभाविवाराः । यस्मिंश्चित्तं सर्वमोतं प्रजानां तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु  ॥5॥

रथचक्राच्या आऱ्यांप्रमाने साम-यजु-ऋग-अथर्व वेदातील मंत्र आणि ज्ञान ज्या मनात प्रतिष्ठित आहे, ज्या मनात सर्व जीवांची ज्ञानशक्ती वस्त्रातील तंतुंप्रमाणे ओतप्रोत भरलेली आहे ते माझे मन शिवसंकल्पाने अर्थात शुभ विचारांनी युक्त होवो.

सुषारथिरश्वानिव यन्मनुष्यान् नेनीयतेऽभीशुभिर्वाजिन इव । हृत्प्रतिष्ठं यदजिरं जविष्ठं तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु  ॥6॥

ज्या प्रमाणे रथाचा सारथी घोड्यांना लगाम घालून त्याना इच्छित स्थानी घेऊन जातो त्या प्रमाणे हृदयात वास करणारे माझे मन द्रुतगती आहे. जे मन ज्ञानेंद्रिय आणि कार्मेंद्रीयाना ताब्यात ठेवते ते माझे मन शिवसंकल्पाने अर्थात शुभ विचारांनी युक्त होवो.

असो.

पंचमहाभूते, पंचप्राण, मन-बुद्धी-अहंकार यांची स्वामिनी जगदंबा कुंडलिनी सर्व योगाभ्यासी वाचकांचे मन शिवसंकल्पयुक्त करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 03 August 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates