Learn the royal path of Ajapa Yoga. Course conducted by Bipin Joshi in Thane. Read more...

Untitled 1

सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी संत-सत्पुरुषांची शिकवण उपयुक्त

दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जीवनात येणारा प्रत्येक सजीव आणि निर्जीव आपल्यावर काहीतरी परिणाम करत असतोच. कधी तो परिणाम आपल्याला स्पष्ट जाणवतो तर कधी तो सूक्ष्म असल्याने जाणवत नाही इतकंच. त्याचबरोबर हा परिणाम चांगला अथवा वाईट असू शकतो. आधुनिक काळातल्या अवतीभवती असलेल्या नकारात्मक गोष्टींची प्रधानता लक्षात घेता शक्य होईत तेंव्हा सकारात्मक गोष्टींची संगती धरावी हे ओघाने आलेच. अजपा योग आचरणाऱ्या उपासकांनी सुद्धा विशेषरूपाने ही काळजी घेतली पाहिजे. नाहीतर एकीकडे अजपाद्वारे शुद्धी साधायची आणि दुसरीकडे अयोग्य संगतीमुळे परत अशुद्धी साठायची असा प्रकार व्हायचा धोका असतो.

आता सकारात्मक आणि शुभ संगतीचा विचार करता संत, योगी, तपस्वी, संन्यासी, सत्पुरुष इत्यादींचा सहवास इतर गोष्टींपेक्षा श्रेष्ठ म्हणावा लागेल. या समस्त संत-सत्पुरुषांचं स्वभाव वैशिष्ठ्य ज्ञानेश्वरांनी अतिशय समर्पक शब्दात सांगितलंय. ज्ञाननाथ म्हणतात - 

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

मानवाला नेहमीच निसर्गात आणि बाह्य सृष्टीत सौंदर्याची प्रतीके शोधण्याची सवय आहे. येथे ज्ञानेश्वरांनी वापरलेली प्रतीके म्हणजे चंद्र आणि सूर्य. चंद्र हा त्याच्या शीतल आल्हाददायक प्रकाशासाठी प्रसिद्ध आणि सूर्य हा त्याच्या तेजस्वी आणि ओजस्वी लखलखत्या प्रकाशासाठी प्रसिद्ध.

आकाशातला चंद्र शीतल आणि सुंदर तर खराच पण त्याच्या सौंदर्यात एक उणीव आहे. ती उणीव कोणती म्हणाल तर त्याच्या पृष्ठाभागावर असलेले डाग. आधुनिक विज्ञानानं असं सिद्ध केलेलं आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर उल्का आणि धुमकेतू आदळून खड्डे तयार झाले आणि मग त्या खड्ड्यांमध्ये लाव्हा भरला गेला. तो लाव्हा पुढे घनीभूत झाला आणि चंद्रावरचे "डाग" तयार झाले. या डागांना Maria असं म्हटलं जातं. या डागांनीच चंद्राच्या सौंदर्याला जणू "लांच्छन" लावले आहे.

आकाशातला सूर्य हा तेजस्वी ओजस्वी आणि लखलखीत तर खराच पण त्यातही एक दोष आहे. आधुनिक विज्ञान असं सांगतं की पृथ्वीपासून सूर्याचं अंतर हे १४,९६,००,००० किलोमीटर आहे. एवढ्या लांब असलेल्या सूर्यापासून त्याचा तो प्रखर प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला ८.३ मिनिटे लागतात. प्रकाश म्हटला की उष्णताही ओघानी आलीच. कल्पना करा की ज्या सूर्याची ऊब आपल्याला हिवाळ्यात हवीहवीशी वाटते त्याचं सूर्याची उष्णता आपल्याला उन्हाळ्यात अगदी नकोशी होते. मग आपण त्या सूर्याच्या अगदी जवळ गेलो तर काय होईल?  अर्थातच त्या प्रखर उष्णतेने आपण जळून खाक होऊ. हा सूर्याचा "ताप" हाच त्याचा अवगुण ठरतो.

संत-सत्पुरुष हे कसे आहेत तर चंद्र आणि सुर्यांप्रमाणे. परंतु त्यांच्यात चंद्र आणि सूर्याचे दोष मात्र नाहीत.

संत-सत्पुरुष समदृष्टीने जीवांना आपले चंद्राप्रमाणे शीतल असे प्रेम आणि वात्सल्य प्रदान करत असतात. पण त्या निस्वार्थी प्रेमात चंद्रावरील डागांप्रमाणे कोणताही दोष मात्र नसतो. संत-सत्पुरुषांच्या सान्निध्यात गेलं तर शीतलता मिळणारच. लहान-थोर, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न बाळगता ते जीवांना शीतलता प्रदान करत असतात. त्यामुळेच ज्ञानेश्वर म्हणतात - सत्पुरुष असे की जे चंद्र तर आहेत पण त्यांना चंद्रासारखे लांच्छन मात्र नाही.

संत-सत्पुरुष म्हणजे सर्वोच्च अशा अध्यात्मज्ञानाचे जणू स्त्रोतच. प्रखर वैराग्य हा त्यांच्या प्रखर ज्ञानाचा पाया. पण गंमत अशी की सूर्याप्रमाणे सत्पुरुषांचे ज्ञान दाहक नाही. त्यामुळे सत्पुरुषांच्या जवळ गेलं तरी "चटका" बसत नाही की कोणताही ताप जाणवत नाही. त्यामुळेच ज्ञानेश्वर म्हणतात - सत्पुरुष असे की जे सूर्याप्रमाणे तेजस्वी तर आहेत पण त्यांच्या सान्निध्याने कोणताही ताप सहन करावा लागत नाही.

ज्ञानदेव पसायदानात मागतात की असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत.

आधुनिक काळात अशा संत-सत्पुरुषांचा सहवास मिळणे दुरापास्त झाले आहे. तरीही एक मार्ग आहे तो म्हणजे त्यांच्या ग्रंथसंपदेशी सोयरिक करणे. ही सोयरिक आयुष्यात बरंच काही देऊन जाते. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सारख्या क्षेत्रात तर या शिकवणीचा आत्यंतिक फायदा होतो. Life Management असो किंवा People Management असो किंवा Work-Life Balance असो किंवा अगदी Project Pressures असोत. या प्रत्येकात संत-सत्पुरुषांचे स्वानुभावावर आधारित विचार अत्यंत मोलाचे ठरतात. अर्थात त्यांचे विचार decode करता मात्र आले पाहिजेत. कधी वेळ काढून त्यांची ग्रंथ-संपदा उघडून पहा तर खरं मग कळेल मी काय म्हणतो ते. नुसते ग्रंथ वाचून थांबू नका. त्यांनीच आपल्याला प्रदान केलेला अजपा योग किंवा अन्य कोणताही आवडीचा उपासना मार्ग विधिवत शिकून आचरणात आणा. म्हणजे मग साधुसंतांचे विचार प्रत्यक्ष अनुभूतीच्या आधारे तुम्ही पडताळून पाहू शकाल. मी आजवर अनेकांना माझ्या अजपा कोर्स द्वारे त्याची प्रचीती घेण्यास सांगितले आहे आणि बहुतेकांना त्याचा उत्तम फायदाही झालेला आहे.

असो.

सुरु झालेल्या या आठवड्यात अजपा योगासह अशाच संत-सत्पुरुषांच्या शिकवणीचे स्मरण आणि अनुशीलन तुम्हा सर्वांकडून घडो या सदिच्छेसह की-बोर्ड रुपी लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 29 Jan 2018