Ajapa Yoga : Kriya and Meditation Online Course || Build your personal kriya and meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

Untitled 1

श्रावणातील शिव / दत्त / गोरक्ष सहस्रनाम उपासना

मागील लेखात आपण श्रावणातील शिव उपासना आणि तत्संबंधी पूर्वतयारी यांविषयी काही गोष्टी आपण जाणून घेतल्या. जी मंडळी योगमार्गावर नवीन आहेत त्यांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की नेमकी उपासना कोणती करावी. श्रीशिवलीलामृत, श्रीगुरूचरित्र, श्रीनवनाथ पोथी इत्यादी लोकप्रिय ग्रंथांचे पठन किंवा पारायण सगळ्यांना जमते किंवा आवडते असे नाही. विशेषतः कोणतेही पारायण विधिवत करत असतांना जे काही सर्वसामान्य नियम पाळावे लागतात ते योगमार्गावर नवीन असणाऱ्या लोकांना काहीसे किचकट वाटतात. काही जण असेही असतात की त्यांना लीलाग्रंथ वाचण्याची फारशी आवड नसते. या क्लिष्टतेमुळे मग ते अशाप्रकारच्या नैमित्तिक उपासनेत पडतच नाहीत. हे लक्षात घेऊन एक सहज, सोपी कोणतेही कडक नियम नसलेली पण प्रभावी अशा एका उपासनेविषयी काही सांगणार आहे.

भारतीय उपासना मार्गात देवी-देवतांची अनेकानेक छोटेखानी स्तोत्रे जशी प्रसिद्ध आहेत तशीच देवी-देवतांची सहस्रनामें सुद्धा अतिशय लोकप्रिय आहेत. तुमच्यापैकी अनेकांनी श्रीविष्णू सहस्रनाम, श्रीशिव सहस्रनाम, श्रीललिता सहस्रनाम अशा स्तोत्रांविषयी ऐकले-वाचले असेल किंवा कदाचित त्यांचा पाठही केला असेल. उपास्य दैवातेच्या सहस्र अर्थात हजार नावांची स्तोत्ररूपात केलेली गुंफण असे या सहस्रनाम स्तोत्रांचे स्वरूप असते. उपासना मार्गात ही सहस्रनाम स्तोत्रे त्या-त्या देवी-देवतेला प्रसन्न करण्याचा एका महत्वाचा उपाय मानला गेला आहे. श्रावण, अजपा योग आणि भगवान शंकराचा विषय चालू आहे तर त्या दृष्टीने तीन सहस्रनामे अधिक महत्वाची आहेत - श्रीशिव सहस्रनाम, श्रीदत्तात्रेय सहस्रनाम आणि श्रीगोरक्ष सहस्रनाम.

शिव महापुराणात भगवान शंकराचे अनेकानेक अवतार नमूद केलेले आहेत. अजपा आणि कुंडलिनी योगसाधनेच्या दृष्टीने भगवान शंकरा बरोबरच त्रिदेवांचे अंश धारण केलेले अवधूत दत्तात्रेय आणि शंभूजती म्हणून ख्याती पावलेले सिद्ध गोरक्षनाथ महत्वाचे आहेत. या तीन उपास्यांपैकी तुमची ज्याच्यावर अधिक श्रद्धा असेल त्या उपास्य देवतेचे सहस्रनाम तुम्ही या उपासनेसाठी निवडू शकता.

तुमच्या आवडीच्या उपास्य देवतेचे सहस्रनाम निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे देवी-देवतांची एकापेक्षा अनेक सहस्रनाम स्तोत्रे प्राचीन साहित्यात उपलब्ध आहेत. त्यांतील नेमके कोणते सहस्रनाम या उपासनेसाठी वापरायचे ते तुम्हाला ठरवावे लागेल. उदाहरण द्यायचे झाले तर एकट्या भगवान शंकराचीच सुमारे दहा ते पंधरा वेगवेगळी सहस्रनाम स्तोत्रे प्राचीन साहित्यात उपलब्ध आहेत. शिव महापुराण, महाभारत, लिंग पुराण, स्कंद पुराण, आगम ग्रंथ अशा अनेक ठिकाणी ही सहस्रनाम स्तोत्रे आलेली आहेत. प्रत्येक सहस्रनाम स्तोत्राची फलश्रुती आणि उपयोगीता काहीशी भिन्न-भिन्न आहेत. त्यामुळे खरंतर तुमची फलप्राप्तीची अपेक्षा आणि तुमची सध्याची योगसाधना लक्षात घेऊन त्याची निवड व्ह्यायला हवी.

आता सर्वसाधारण उपासकासाठी येथे एक मर्यादा पडते. बाजारात वरील सर्वच सहस्रानामे छापील स्वरूपात उपलब्ध होत नाहीत. पूजा-पाठाच्या दुकानांत फक्त जी अधिक लोकप्रिय आहेत किंवा जी छापली गेली आहेत तेवढीच उपलब्ध होतात. त्यामुळे जी मिळेल ती सहस्रनामाची पोथी आणली जाते आणि त्याचेच वाचन किंवा पठण केले जाते. काहीच न करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे त्याचे पठण करणे श्रेयस्कर आहे हे ओघाने आलेच परंतु शक्य असल्यास तुमची ज्या कोणावर श्रद्धा असेल त्या जाणकार व्यक्तीला विचारून ही निवड करून घ्यावी हे उत्तम.

दुसरे असे की बाजारात ही सहस्रनामें दोन प्रकारात उपलब्ध होतात - स्तोत्र आणि नामावली. स्तोत्र स्वरूपातील सहस्रनाम हे अन्य स्तोत्रांप्रमाणेच श्लोकबद्ध असते तर नामावली स्वरूपातील सहस्रनामे ही प्रत्येक नामाच्या आदी ओंकार आणि अंती नमः जोडून तयार केलेली नामांची यादी असते. उपासनेच्या दृष्टीने खरंतर स्तोत्र स्वरूपातील सहस्रनामे अधिक योग्य ठरतात परंतु उपासना मार्गावर नवीन असलेल्यांसाठी नामावली स्वरूपातील सहस्रनामे पठणाच्या दृष्टीने सोपी असतात. तुमच्या आवडीनुसार आणि सवयीनुसार तुम्ही या बाबत निर्णय घेऊ शकता.

आता तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. निवडलेल्या सहस्रनाम स्तोत्राचे पठण नेमके कसे करायचे? सरधोपट मार्ग अनुसरायचा झाला तर सहस्रनाम स्तोत्राची पोथी घेऊन घराच्या देवघरात किंवा शांत जागी बसून एक किंवा अधिक पाठ करता येतात. किंबहुना बहुतेकवेळा अशाप्रकारेच पठण केले जाते. एका पेक्षा अधिक पाठ करायचे असल्यास साधारणतः विषम संख्येने पाठ केले जातात - ३, ५, ७, ९ वगैरे. हे पाठ रोज एकाच जागी, एकाच वेळी, एकाच संख्येने करणे अपेक्षित असते.

जर सहस्रनाम स्तोत्राच्या उपासनेपासून अत्याधिक लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर मात्र नीट योगविधीने त्याचा पाठ करायला हवा. माझ्या मित्र परिवारातील लोकांना मी जो क्रम सांगतो तो येथे थोडक्यात देत आहे :

१. सुषुम्ना मार्गावरील चक्रे, त्याच्या अधिष्ठात्र्या देवता आणि कुंडलिनी यांची मानस पूजा

२. अजपा गायत्रीचा माळेवर जप - १ माळ

३. छोट्या मंत्राचा मानसिक किंवा उपांशु जप - १ माळ

४. संकल्प - आपापल्या अपेक्षित फळाप्रमाणे

५. निवडलेल्या सहस्रनाम स्तोत्राचा पाठ - एक पाठ किंवा त्यापेक्षा अधिक पाठ.

६. पाठ समर्पण

७. मोठ्या मंत्राचा मानसिक किंवा उपांशु जप - १ माळ

८. मुद्रेसहित ध्यान - यथाशक्ती

९. साधना समाप्ती

वरील क्रम हा श्रावणातील प्रत्येक दिवशी ठराविक वेळी खंड पडू न देता पार पाडायचा आहे.

खरंतर वरील सर्व पायऱ्यांचे विस्ताराने विवेचन करायचा मानस होता कारण त्यांत अनेक सूक्ष्म गोष्टी दडलेल्या आहेत परंतु वेळेच्या अल्प उपलब्धतेमुळे यावेळी ते शक्य होईल असे वाटत नाही.

असो.

ज्यांची कीर्ती वर्णन करायला सहस्रनामे सुद्धा थिटी पडतात ते भगवान सदाशिव, दत्तात्रेय आणि गोरक्षनाथ सर्व योगप्रेमी वाचकांना श्रावण उपासनेची प्रेरणा देवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 25 July 2022