Untitled 1

योग क्रियांविषयी तारतम्य बाळगणे आवश्यक

सध्या सर्वत्र योग, प्राणायाम, आयुर्वेद, अध्यात्म वगैरे विषयक माहितीचा महापूर आलेला आहे. जो तो आपापल्या परीने इंटरनेटवर माहिती "ओतण्याचा" प्रयत्न करत आहे. ज्यांना योग-आयुर्वेदाची जुजबी का होईना ओळख आहे त्यांना या माहितीच्या ढिगाऱ्यातून योग्य काय आणि अयोग्य काय ते कळणं शक्य आहे पण ज्यांना या विषयांची फारशी माहिती नाही त्यांना नक्की काय स्वीकारावे आणि काय टाळावे ते कळणे कठीण आहे. अशा वेळी योग-आयुर्वेदातील सल्ला अंमलात आणतांना चूक होऊ शकते. त्या दृष्टीने सर्वांनी सजग रहाणे अगत्याचे आहे.

अशाच काही गोष्टी येथे देत आहे ज्यांकडे डोळसपणे पहावे आणि त्या काळजीपूर्वक आचरणात आणाव्यात. या गोष्टी प्रामुख्याने नवीन योगाभ्यासी साधकांसाठी आहेत पण इतरांनाही कदाचित उपयोगी पडतील.

सूर्यनमस्कार हा सर्वाना सहज जमेल असा आणि अत्यंत उपयुक्त असा व्यायाम प्रकार आहे यात शंका नाही. परंतु सूर्यनमस्कार घालताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायामप्रकार आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सूर्यनमस्कार एके सूर्यनमस्कार घालत बसावे. एकावेळी ५०-६० सूर्यनमस्कार घालण्यापेक्षा मी असं सांगीन की १२-२४ घालावेत आणि त्यांना अन्य योगासनांची जोड द्यावी. सूर्यनमस्कार किंवा योगासने करत असतांना श्वासांच्या आणि चक्रांच्या जाणीवेसहीत करावीत. त्यामुळे फायदा वृद्धींगत होतो.

प्राणायाम करत असतांना सर्वच प्रकारचे प्राणायाम करण्याची गरज नाही. सध्याची स्थिती पहाता कपालभाती, भस्त्रिका, उज्जायी आणि कुंभकासहित नाडीशोधन हे प्राणायाम प्रकार प्रामुख्याने करावेत असं मी सांगीन. कुंभक ओढून-ताणून करण्याची गरज नाही पण कोणत्यातरी प्रकाराने थोडातरी कुंभक होईल असे पहा. सध्या उन्हाळा जरी जाणवत असला तरी आताच्या परीस्थित्तीत शितली किंवा सित्कारी यांसारखे प्राणायाम करू नका असं मी सुचवीन. आपण जेंव्हा नाकाने श्वास घेतो तेंव्हा हवा नाकावाटे गरम आणि शुद्ध होऊन फुफ्फुसात जात असते. शितली किंवा सित्कारी सारख्या तोंड उघडे ठेऊन करण्याच्या प्राणायामांत हवा नाकावाटे आत न जाता थेट तोंडावाटे जाते. त्यामुळे सध्यातरी हे प्रकार टाळलेलेच बरे.

तुम्ही जर हस्त मुद्रांचा अभ्यास करत असाल तर सध्या "प्राणमुद्रेची" महती सांगितली जात आहे. प्राणमुद्रेने रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते हे जरी खरं असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्राणमुद्रा ही कफ कारक मुद्रा आहे. ज्यांची प्रकृती कफ प्रधान आहे किंवा ज्यांना आधीच कफाचा काही त्रास सुरु आहे अशांनी भरपूर प्रमाणात प्राण मुद्रा करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी असं सांगीन की याबाबतीत दुसऱ्या कोणापेक्षा स्वतःच्या शरीराचा सल्ला घ्या. सुरवातीला दोन ते पाच मिनिटे करा मग त्रास होत नाहीये याची खात्री पटली की कालावधी हळूहळू वाढवा. प्राणमुद्रा मी केवळ एक उदाहरण म्हणून सांगितली. प्रत्येक मुद्रेचे असे dos आणि don'ts आहेत. ते नीट काळजीपूर्वक विचारात घ्यावेत.

सध्या लोकं आयुर्वेदातील अनेक गोष्टी सेवन कराव्यात असं सांगत आहेत. कांदा, लसूण, तुळस पासून ते च्यवनप्राश पर्यंत सर्वांची महती सांगितली जात आहे. या सगळ्या गोष्टी जरी नि:संशय पणे चांगल्या असल्या तरी त्यांचे सेवन करतांना तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. अचानक एक दिवस शरीरात हे सगळे औषधी पदार्थ "टाकून" चमत्कार घडण्याची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. प्रत्येक गोष्टीला स्वतःचा असा वेळ देणे आवश्यक असते. शरीराला सुद्धा खाल्लेलं पचवायला आणि पचवलेल्याचा गुण अंगात भिनवायाला स्वतःचा असा वेळ लागतोच. त्यात super fast track असा प्रकार चालत नाही. आयुर्वेदात प्रकृतीची कफ-वात-पित्त अशी विभागणी केलेली आहे. सर्वच औषधी सर्वांनाच उपयोगी पडतील असं नाही. एकावेळी भारंभार औषधी वनस्पतींचे सेवन करणेही योग्य ठरणार नाही.

दुसरं असं की या औषधी सेवन करण्याची पद्धती सुद्धा आयुर्वेद संमत असायला हवी. एक उदाहरण देतो. समजा तुम्हाला हळद घातलेले दुध प्यायचे आहे. आता हे दुध करण्याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कपामध्ये आवश्यक तेवढी हळद घालायची आणि त्यात गरम केलेले दुध ओतायचे. दुसऱ्या प्रकारात पहिले दुधात हळद नीट मिसळून घ्यायची आणि ते मिश्रण उकळून घ्यायचे. आता या दोन पद्धती पैकी नक्की बरोबर कोणती? दुध पचायला जड जात असेल तर काय करावे? कफाचा त्रास असेल तर हळदीच्या जोडीला अजून काय-काय मिसळावे? गुळ कधी वापरावा आणि मिश्री / खडीसाखर कधी वापरावी? हे केवळ मी एक सोपं उदाहरण म्हणून सांगतोय. तुम्हाला नाउमेद करण्याचा उद्देश बिलकुल नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की पारंपारिक किंवा घरगुती वाटणारी औषधं सुद्धा कशी घ्यावीत याचे काही नियम आहेत. ते नीट माहित करून घेतले तर फायदा वृद्धींगत होईल.

जुन्या साहित्यात बऱ्याच ठिकाणी अशी एक उपमा आढळते. राजहंसाला जर एका वाटीत दुध आणि पाणी मिसळून दिले तर तो फक्त दुध प्राशन करतो. पाणी स्वीकारत नाही. असाच विवेक आज आवश्यक आहे. तेंव्हा मस्तपैकी तुमच्या आवडीनुसार योगासने, प्राणायाम, मुद्रा, ध्यान, आयुर्वेदिक टिप्स असं सगळं करा. आनंदात रहा. सकारात्मक रहा. पण हे सगळं करतांना थोडी अभ्यासू वृत्ती आणि विवेक मात्र अवश्य जागा असू द्या. अजपा ध्यानाची भक्कम बैठक आणि बुद्धीचं निवासस्थान असणाऱ्या विशुद्धी चक्राची मदत त्या कामी नक्कीच उपयोगी पडेल.

असो.

नवरात्रीच्या या दिवसांत जगदंबा कुंडलिनी सर्व योगाभ्यासी वाचकांना आश्वस्त करून योग्य दिशा दाखवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 30 March 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates