Untitled 1

भगवान शंकराच्या अष्ट संहारमूर्ती

निरनिराळ्या देवी-देवतांनी असुरांचा आणि दुष्टांचा संहार करणे ही पौराणिक काळातल्या साहित्यात हमखास आढळणारी गोष्ट. ज्याचे प्रधान कर्मच मुळी संहार आहे तो भगवान शंकरही त्याला अपवाद नाही. शिवपुराणात आणि भगवान शंकराशी संबंधित साहित्यात अशा प्रकारच्या विपुल कथा आपल्याला आढळतात. या सर्व कथांमधील आठ संहाराचे प्रसंग विशेष महत्वाचे मानले जातात. दक्षिणेत विशेषतः तामिळनाडू प्रदेशात तर या प्रसंगाना समर्पित असलेली भगवान सदाशिवाची "संहारमूर्ती" स्वरूपातील मंदिरे आहेत.

कदाचीत असा प्रश्न तुमच्या मनात येईल की मुळात अध्यात्मासारख्या अहिंसा प्रधान मार्गावर हिंसात्मक संहाराचे महत्व ते काय. नीट सखोल विचार केल्यास आपल्याला असं आढळेल की हिंसा आणि अहिंसा ही नेहमी एकत्र चालणारी जोडगोळी आहे. ध्यानधारणेचा बऱ्याच वर्षांचा सराव असलेल्या लोकांवर सुद्धा काम-क्रोध-मोह वगैरे विकारांचे आक्रमण होते तेथे सामान्य माणसाची गोष्टच करायला नको. मनात निखळ शांति आणि दुसऱ्या प्रति अहिंसा तेंव्हाच स्थापित होते जेंव्हा मनातील अशांती, क्रोध, मोह, लोभ इत्यादी दुर्गुणांचा नाश होईल. तेंव्हा स्वतःमधील अशा दुर्गुणांचा योगसाधनेने "संहार" करणे क्रमप्राप्त ठरते. भगवान शंकराच्या या संहारमूर्तींकडे आणि संहारकथांकडे आपण त्या दृष्टीने पाहिले पाहिजे. जर या कथांकडे तुम्ही काहीतरी काल्पनिक आणि कल्पनाविलासाकडे झुकलेले प्रसंग म्हणून पाहाल तर त्यांतून काही फारसे हाती लागणार नाही. जर या कथांकडे डोळसपणे पाहाल तर या शिवलीलांमध्ये शिकण्यासारखे बरेच काही आहे असं तुम्हाला आढळेल.

भगवान शंकराच्या या आठ "संहारकथा" कोणत्या ते अगदी थोडक्यात सांगतो. मी येथे मुद्दामच त्यांची मला उमगलेली शिकवण किंवा मतितार्थ वगैरे वगैरे देत नाहीये. श्रावणाचे पावन दिवस आहेत. तुम्ही या कथा शिवपुराणात आणि अन्य शैव साहित्यात विस्ताराने नीट वाचा आणि स्वतःशीच विचार करा की त्या कथांमध्ये तुम्हाला काय गवसले ते. तसा अभ्यास तुमच्या योगसाधनेच्या दृष्टीने खरा महत्वाचा ठरेल.

१. अंधकासुराचा वध

एकदा भगवान शंकर आणि पार्वती मंदराचल पर्वतावर विहार करत असतांना पार्वतीने अचानक शंकराचे डोळे झाकले. शंकराच्या डोळ्यांपुढे अंधार झाला. त्याचवेळी त्याच्या घामाच्या थेंबातून एक बालक जन्मास आले. ते बालक जन्मतःच अंध होते पण त्याला शिव-पार्वती दोघांचाही आशीर्वाद प्राप्त झाला. ते बालक पुढे अंधकासुर म्हणून प्रसिद्धीस आहे. पुढे त्याच्या दुष्कृत्यांमुळे भगवान शंकरालाच त्याचा वध करावा लागला.

२. जालंधर वध

एकदा देवांचा राजा इंद्र कैलास पर्वतावर भगवान शंकराला भेटायला गेला. तेथे त्याला त्याच्या मनाप्रमाणे मान-सन्मान न मिळाल्याने तो रागावला आणि त्याने थेट शंकराचाच अपमान केला. अपमानाने क्रोधाविष्ठ झालेल्या भगवान शंकराच्या तृतीय नेत्रातून एक बालक जन्मास आले. समुद्राच्या लाटांवर त्या बालकाचे संगोपन झाले आणि त्याचे नाव जालंधर पडले. पुढे तो अतिशय क्रूर राक्षस बनला. जालंधराच्या पाठीशी त्याच्या पत्नीचे सत्व होते म्हणून विष्णूला सुद्धा त्याला परास्त करणे कठीण गेले. भगवान शंकराने मग त्या क्रूर दैत्याचा वध केला.

३. कामदेवाचे दहन

भगवान शंकराने केलेले कामदहन प्रसिद्धच आहे. भगवान शंकर समाधीत असल्याने शिव-पार्वती मिलन काही घडत नव्हते. त्यामुळे सर्व देवांनी कामदेवाला सांगून शंकराची समाधी भंग करण्यास सांगितले. रागावलेल्या शंकराने तृतीय नेत्र उघडून कामदेवाला भस्मसात केले.

४. दक्ष यज्ञाचा विध्वंस

ही कथा सुद्धा सुप्रसिद्ध आहे. दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञान भगवान शंकराचा अपमान केला गेला. आपल्या पतीचा अपमान सहन न होऊन सतीने योगाग्नीने आत्मदहन केले. सतीने आत्मदहन केल्याचे समजतात भगवान शंकर अतिशय क्रोधीत झाला. वीरभद्र आणि रुद्रगणांच्या सेनेने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. दक्षाचा वध करण्यात आला. दक्षाला साथ देणाऱ्या अन्य उपस्थितांनाही दंडित करण्यात आले.

५. गजासुराचा वध

गजासुर हा महिषासुराचा पुत्र. जेंव्हा त्याला कळले की देवीने आपल्या पित्याचा वध केला आहे तेंव्हा त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले. वर मिळाल्यावर त्याला गर्व चढला आणि तो सर्वाना त्रास देऊ लागला. शेवटी त्याने काशीला जाऊन भगवान शंकराला सुद्धा त्रास देण्यास सुरवात केली. भगवान शंकराने त्रिशुळाने त्याचा वध केला. त्याच्या विनंतीनुसार शंकर "गजचर्म" धारी बनला.

६. यमदेवाला शिक्षा

मार्कंडेय ऋषी अल्पायुषी होते. त्याच्या मृत्यूची वेळ येताच यम त्याला नेण्यासाठी आला. मार्कंडेय शंकराचा भक्त होता. त्याने शिवलिंग घट्ट धरून शिवमंत्रांचा जप सुरु केला. भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्याला अभय प्रदान केले. यमाला शिक्षा म्हणून शंकराने त्याच्यावर लत्ताप्रहार करून त्रिशुळाने त्याचा वध केला. पुढे सर्व देवांनी आणि मार्कंडेयाने विनंती केल्यावर यमाला जीवनदान मिळाले. शंकराचे ते स्वरूप "मृत्युंजय" म्हणून प्रसिद्धीस आले.

७. त्रिपुरासुरांचा वध

कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यावर त्याचे तीन पुत्र कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युन्माली यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले. त्यांची तीन नगरे आकाशात भ्रमण करत असत. त्यांचे अत्याचार वाढल्यावर भगवान शंकराने त्यांचा वध केला.

८. ब्रह्मदेवाच्या पाचव्या शिराचा उच्छेद

ब्रह्मदेवाला पाच शिर होती. काही कारणवश त्यांतील उर्ध्वमुखी तोंडाने भगवान शंकराची निंदा केली. त्याची शिक्षा म्हणून भगवान शंकराने ब्रह्मदेवाचे पाचव्या शिराचा उच्छेद केला. याविषयी अशीही कथा आढळते की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करत असतांना मनानेच एका सुंदर स्त्रीची निर्मीती केली. ती स्त्री एवढी सुंदर होती की ब्रह्मदेवाला स्वतःलाच तिचा मोह पडला. हा घोर अपराध होता कारण ती स्त्री त्याची मानसपुत्री होती. ब्रह्मदेवाचे कुविचार लक्षात येताच ती स्त्री दूर पळून जाऊ लागली. ब्रह्मदेवाने चारी दिशा आणि ऊर्ध्व दिशेला तिचा शोध घेतला. मूळ एक मुख असलेला ब्रह्मदेव आता पंचमुख झाला. ब्रह्मदेवाच्या या निषिद्ध वागण्याने भगवान शंकर अत्यंत क्रोधीत झाले. त्यांनी शिक्षा म्हणून ब्रह्मदेवाचे पाचवे मुख उखडून टाकले. उर्वरित चार मुखांनी वेदगान करत ब्रह्मदेवाने शंकराची स्तुती केली आणि झाल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली.

तर अशा या अष्ट संहारमूर्तींच्या कथा.

असो.

श्रावण सुरु झालेला आहे. भोलेनाथ शंकर आणि आदिमाया जगदंबिका सर्व योगाभ्यासी वाचकांचे चित्त शुद्ध आणि पवित्र करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 27 July 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates