Untitled 1

हठयोगातील बालविधवा आणि कुलवधू

प्राचीन योगग्रंथांची एक खासियत ही आहे की त्यांत योग विज्ञान तर ओतप्रोत भरलेलं आहे परंतु ते अशा भाषेत प्रस्तुत केलेलं आहे की सर्वसामान्य माणसाच्या पकडीत ते सापडू नये. याला गोपनीयता म्हणा किंवा काव्यात्मकता म्हणा किंवा क्लिष्टता म्हणा पण ती योगग्रंथांचा अविभाज्य घटक बनलेली आहे. कुंडलिनी योगमार्गावरून वाटचाल करू इच्छिणाऱ्या साधकाला कधी ना कधी या गुढरम्य भाषेचा सामना करावा लागतो. त्यावेळेस ही भाषा एकतर त्याला स्वतःला एखादं कोडं सोडवल्याप्रमाणे decode करावी लागते किंवा एखाद्या जाणकार माणसाकडून ती समजून घ्यावी लागते. आजच्या या लेखात अशी दोन उदाहरणे पाहुया.

अनेक हठयोग ग्रंथांत कुंडलिनीचे वर्णन खालील प्रमाणे आलेले आहे:

गंगायमुनयोर्मध्ये बालरंडां तपस्विनीम्
बलाद गृह्णीयात्द्विष्णोः परमं पदम्

नीट पहा येथे काय म्हटलंय ते. हा श्लोक सांगतो की गंगा आणि यमुना यांच्या संगमावर एक तपस्विनी बालरंडा बसलेली आहे. तिला जबरदस्तीने वरच्या बाजूला न्यावे म्हणजे परमपद प्राप्त होते. आता हा श्लोक जर एखाद्या नवख्या साधकाने वाचला तर त्याला काही कळणार नाही. उलटपक्षी जर या श्लोकाचा शब्दशः अर्थ घेतला तर काहीतरी विचित्रच वाटेल. याचा योगगर्भ अर्थ असा आहे...

भारतात प्राचीन काळापासून तीन नद्या अत्यंत महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत - गंगा, यमुना, आणि सरस्वती. येथे गंगा म्हणजे इडा नाडी अर्थात डाव्या नाकपुडीतून वाहणारी योगगम्य नाडी. यमुना म्हणजे काय तर उजव्या नाकपुडीतून वाहणारी पिंगला नाडी. सरस्वती नदी म्हणजे सुषुम्ना नाडी. गंगा आणि यमुना यांच्या मध्ये म्हणजे मुलाधार चक्राच्या ठिकाणी अर्थात स्थूल शरीराच्या दृष्टीने शिवण स्थानी. या गंगा आणि यमुनेच्या मध्ये कोण बसलेलं आहे तर एक बालरंडा.

संस्कृतमध्ये बालरंडा म्हणजे बालविधवा. ही बालविधवा कशी आहे तर ती परम तपस्विनी आहे. येथे बालविधवा म्हणजे कोण तर जगदंबा कुंडलिनी. कुंडलिनीला बालविधवा का बर म्हटलंय? कारण मुलाधारातील कुंडलिनी ही तिच्या पतीपासून म्हणजे शिवापासून दुरावलेली आहे. सामान्यतः कुंडलिनी मुलाधारात आणि शिव सहस्रारात निवास करतात. त्यांची जणू ताटातूट झाली आहे. त्यामुळे कुंडलिनी बालविधवा आहे. येथे कुंडलिनीला नुसतं विधवा नाही म्हटलेलं बालविधवा म्हटलंय कारण ती अजून सुप्तावस्थेत आहे. ती अजून पूर्णपणे जागी झालेली नाही अर्थात विकसित झालेली नाही. कोणतीही अविकसित गोष्ट ही सुरवातीला बालदशेतच असते म्हणून बालविधवा.

जगदंबा कुंडलिनी कोणी अशी तशी बालविधवा नाही तर ती परम तपस्विनी आहे. पार्वतीने भगवान शंकर पती म्हणून मिळावा म्हणून अत्युग्र तपश्चर्या केली होती तो प्रसंग सुप्रसिद्ध आहे. कुंडलिनी ही त्या आदिशक्तीचेच स्वरूप असल्याने ती तपस्विनी आहे. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात सुद्धा कुंडलिनीला विद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी मानलेले आहे. हे तेज तपश्चर्येचेच फळ आहे. 

या बालरंडा स्वरूप तपस्वीनीचं काय करायचं तर तिला बलपूर्वक वरच्या बाजूला न्यायाची. येथे बलपूर्वक म्हणजे हठयोगातील कुंभकयुक्त प्राणायाम, मुद्रा वगैरेंच्या सहाय्याने कुंडलिनी जागृत करायची आणि तिला मुलाधार ते सहस्रार असा प्रवास करायला भाग पाडायचे. कुंडलिनी एकदा वरच्या बाजूला अर्थात सहस्रारात पोहोचली की तिचे शिवाशी मिलन घडून येईल आणि परमपद प्राप्त होईल असा योगसिद्धांत येथे अभिप्रेत आहे.

आता दुसरं उदाहरण देतो. वरील श्लोकात "बालविधवा" म्हणजे काय ते सांगितलं. आता खालील श्लोक पहा.

वेदशास्त्रपुराणानि सामान्य गणिका इव
एकैव शांभवी मुद्रा कुलवधूरिव

येथे हठग्रंथ सांगतायत की वेद, शास्त्र, पुराण वगैरे जे ग्रंथ आहेत ते एखाद्या सामान्य गणिके सारखे आहेत. एकमात्र परम गोपनीय अशी शांभवी मुद्रा ही कुलवधू सारखी आहे. जर हा श्लोक वरवर पाहिला तर ह्ठग्रंथ त्याकाळी उपलब्ध असलेल्या अन्य प्रमाण ग्रंथांवर टीका करत आहेत असं वाटेल. येथे अर्थ नीट समजून घ्यायला हवा.

येथे वेद, शास्त्र, पुराण म्हणजे पुस्तकी ज्ञान असा अर्थ आहे. वेदांतील ज्ञानकांड अर्थात उपनिषदांतील ज्ञानमार्ग योग्यांनाही वंदनीयच आहे. किंबहुना त्या ज्ञानप्राप्तीसाठीच योगमार्गाची उठाठेव आहे. परंतु योगमार्ग हा साधना प्रधान मार्ग आहे. पुस्तकी ज्ञानाला अथवा कर्मकांडाला येथे कमी प्रतीचे मानले जाते. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा वेदांतील कर्मकांड साधकाला परमेश्वरापासून दूर कसं नेते त्याचे वर्णन आलेलं आहे. हे कमी प्रतीचे ज्ञान दर्शवण्यासाठी येथे शब्द वापरलाय - सामान्य गणिका. सोप्या बोली भाषेत सांगायचं तर हे पोकळ पुस्तकी ज्ञान कोणासारख आहे तर सामान्य वेश्येसारखं. येथे पुस्तकी ज्ञानाला वेश्येची उपमा का बर दिलेली आहे. कारण पुस्तकं बाजारात जाऊन पैसे फेकले की कोणालाही सहज प्राप्त होतात. प्राचीन हठयोग्यांना असं ज्ञान मान्य नाही. अशा गणिका स्वरूप पुस्तकी ज्ञानापेक्षा हठयोगोक्त साधनात्मक, क्रियात्मक ज्ञान ते श्रेष्ठ मानतात. हे श्रेष्ठत्व त्यांनी विरोधाभासातून व्यक्त केलेलं आहे.

हठयोगातील एक सर्वोच्च मुद्रा म्हणजे शांभवी मुद्रा. शांभवी मुद्रेची थोरवी शब्दांत वर्णन करता येणे शक्य नाही. अजपातील शांभवी तर जणू मुकुटमणी. शांभवी मुद्रा प्रत्यक्ष शिवशंकर धारण करून असतो. यापेक्षा अजून महती काय सांगावी. पुस्तकी ज्ञान सामान्य गणिका आहे तर भगवान शंकराने प्रदान केलेली शांभवी मुद्रा किंवा शांभवी विद्या ही कुलवधू सारखी आहे. येथे विरोधाभासातून शांभवी मुद्रेचे श्रेष्ठत्व ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

जुन्या काळी राजेमहाराजे किंवा श्रीमंत घराण्यांतील किंवा चांगल्या घराण्यातील कुलवधूला अत्यंत मानाचे आणि आदराचे स्थान असे. कोणीही आलं आणि त्या कुलवधूबरोबर उठबस किंवा वार्तालाप केला असा प्रकार नसे. मोजक्या लोकांनाच कुलवधूशी थेट भेटता येत असे. खरी शांभवी मुद्रा ही सुद्धा सर्वांना दिली जात नसे. परम गोपनीय असलेली शांभवी गुरु-शिष्य परंपरेने केवळ अधिकारी शिष्यांना गुरुमुखांतून मिळत असे. म्हणून तिची तुलना कुलवधूशी केलेली आहे.

जाता जाता सहज गंमत बघा. वरील दोन श्लोक एकमेकांशी थेट संबंधित नाहीत. मी या लेखासाठी त्यांचा एकत्र विचार केला असला तरी मूळ हठग्रंठांत ते भिन्न भिन्न ठिकाणी आलेले आहेत. पण तरी त्यांची संगती कशी लागते बघा. "गंगा-यमुनेच्या संगमावर" बसलेल्या "बालविधवेला" जागृत करून तिला शिवस्थानी मुरवायची असेल तर "गणिकेच्या" फंदात न पडता "कुलवधूला" शरण जावे आणि आपले हित साधावे.

असो.

विद्युल्लतेप्रमाणे परम तेजस्वी असलेल्या तपस्विनी स्वरूपा कुंडलिनीच्या आशीर्वादाने योगाभ्यासी वाचक सहस्रारातील शिवपदाकडे आगेकूच करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 09 September 2019