Untitled 1

कैवल्यप्राप्तीचे चार अध्याय

महर्षी पतंजालींची योगसूत्रे त्यांच्या सुसूत्र मांडणी आणि अल्प शब्दांत योगगम्य अर्थ प्रस्तुत करण्याबद्दल परीद्ध आहेत. पतंजली मुनींनी आपली सुमारे १९५ सूत्रे चार अध्यायांमध्ये विभागलेली आहेत. त्या चार अध्यायांना समाधिपाद, साधनपाद, विभूतिपाद, कैवल्यपाद अशी नावे देण्यात आली आहेत.

दैनंदिन आयुष्यात आपण असं नेहमी म्हणतो किंवा ऐकतो की माणसाच्या आयुष्याला काहीतरी ध्येय हवे वगैरे. एखादा साधक जेंव्हा योगमार्गावर येतो तेंव्हा त्याला प्रथम हे माहित असायला हवे की आपण नक्की कशासाठी प्रयत्न करत आहोत. आपले उद्दिष्ट नक्की काय आहे. आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे. ही माहिती जर नसेल तर साधकाचे प्रयत्न vague ठरण्याचा धोका असतो. तो मधेच भरकटण्याचा धोका असतो. याच कारणास्तव पतंजली मुनींनी समाधिपाद नामक पहिल्या अध्यायात योगमार्गाचे अंतिम लाख्य जे समाधी त्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे.

एकदा का साधकाला अध्यात्मामार्गावरचे आपले उद्दिष्ट कळले की मग त्या उद्दिष्टाप्रत कसे जायचे ते त्याला ठाऊक असायला हवे. पतंजली योगसूत्त्रांचा साधनपाद नामक दुसरा अध्याय नेमके हेच विषद करतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असा अष्टांग योग यांत वर्णन केलेला आहे.

योगमार्गावर वाटचाल करत असतांना शरीर-मनाचा पोत सुधारतो. प्रगती साधत असतांना साधकाला अनेक चित्र-विचित्र अनुभव येऊ लागतात. प्रसंगी काही क्षुद्र सिद्धी तर उच्च पातळीवरील साधकांना अष्टमहासिद्धी प्राप्त होऊ लागतात. या सर्व विशेष प्राप्य गोष्टींचे वर्णन पतंजलींनी विभूतिपाद नामक तिसऱ्या अध्यायात केले आहे. महत्वाचे हे आहे की त्यांनी आवर्जून अशा प्रकारच्या चित्र-विचित्र अनुभवांत आणि सिद्धींत अडकून राहू नये अन्यथा त्या अधोगतीला कारण ठरतात असा धोक्याचा इशारा दिला आहे. असे अनुबव आले तर ते प्रगतीचे एक चिन्ह मानून, त्यांना विसरून अग्रेसर व्हावे हेच उत्तम आहे.

शेवटी कैवल्यपाद नामक चौथ्या अध्यायात कैवल्य अथवा मोक्ष अवस्थेचे वर्णन केलेले आहे. मुक्तीचे जे काही प्रकार सांगितले जातात जसे सायुज्य मुक्ती, सारुप्य मुक्ती, सामीप्य मुख्ती, सालोक्य मुक्ती वगैरे ते सर्व मानवी देह ठेवल्यावर प्राप्त होणारे आहेत. कैवल्य मुक्ती मात्र योगासाधनेद्वारे जिवंतपणी उपभोगायची आहे.

पतंजलींच्या आधी अष्टांग योग अस्तित्वात नव्हता असे अजिबात नाही. तो त्याआधीही होताच परंतु पतंजली मुनींनी काळाची गरज ओळखून त्याला अधिक सुसूत्र स्वरूप दिले आणि ते शब्दबद्ध केले. पतंजली मुनींनी सांगितलेला योगमार्ग शिस्तबद्ध आहे.  त्यांनी वर्णन केलेलं योगशास्त्राचे "फ्रेमवर्क" व्यक्तिगत आयुष्यात "इंप्लीमेंट" करायला सुरवातीला काहीसे कठीण वाटले तरी प्रयत्नशील साधकाला हळूहळू सर्व काही जमू लागते. केवळ जमू लागते एवढेच नाही तर त्याचा फायदा आणि आनंदही मिळू लागतो.

असो.

सर्व सुजाण वाचक समाधी-साधन-विभूती-कैवल्य या प्रवासात वेगाने आगेकूच करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 25 March 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates