Untitled 1

कुंडलिनी योग क्रियांमधील पशुभाव, वीरभाव आणि दिव्यभाव 

कुंडलिनी योग हा एक अथांग सागर आहे. एक-दोन डुबक्या मारून त्यातील बहुमुल्य मोती प्राप्त होतील अशी अपेक्षा करणे बरोबर ठरणार नाही. त्यासाठी श्रद्धा, सबुरी, शिस्त आणि समर्पण या चतुःसूत्रीवर आधारित आयुष्यभराची उपासना करण्याची जिद्द आणि चिकाटी हवी. आज या सागरातील अशाच एका काहीशा सूक्ष्म गोष्टीविषयी सांगणार आहे.

मागील अनेक लेखांत मी सांगितले आहे की फार प्राचीन काळी कुंडलिनी योग हा आगम-निगम शास्त्राच्या गोपनीयतेच्या भक्कम कवचाखाली झाकलेला होता. त्याला आज जसे आहे तसे स्वतंत्र अस्तित्व नव्हते. कुंडलिनी योग आणि शक्ती उपासना हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे एकजीव होते. भगवान शंकराच्या इच्छेने आणि भगवान दत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने मच्छिंदनाथ, गोरक्षनाथ इत्यादी सिद्ध योग्यांनी कुंडलिनी योग जणू अलगद वेगळा काढला आणि योगप्रधान संप्रदायाची उभारणी केली. विरजलेले दही घुसळून लोणी आणि ताक वेगवेगळ काढतात तसं. परंतु आजही आगम-निगम शास्त्राशी कुंडलिनी योगाचा असलेला अतूट संबंध अस्तित्वात आहेच. मच्छिंद्रनाथ हे कौलमार्गाचे प्रवर्तक होते असे अनेक जाणकार मानतात. त्यामुळे त्यांनी निर्मिलेल्या नाथ संप्रदायात आगम-निगम शास्त्रातील प्रवाह आणि साधना मिसळल्या गेल्या नाहीत तरच नवल.

प्राचीन मंत्रशास्त्रानुसार विविध देवी-देवतांची उपासना करतांना त्या-त्या देवतेचे मंत्र, यंत्र, स्तोत्र, कवच, हृदय, सहस्रनाम इत्यादी गोष्टींचा उपयोग केला जातो. देवतेची अशा प्रकारे उपासना करत असतांना शास्त्रात तीन प्रकारचे "भाव" सांगितले आहेत. ते त्रिविध भाव म्हणजे - पशुभाव, वीरभाव आणि दिव्यभाव. फार खोलात जात नाही परंतु संक्षेपाने या त्रिविध भावांची सुगम ओळख तेवढी सांगतो.

अध्यात्मशास्त्रात "पशु" या शब्दाचा अर्थ सामान्य अर्थापेक्षा फार वेगळा आहे. पशु म्हणजे असा जीव जो मायापाशात गुरफटलेला आहे. पशुचा मायेवर ताबा चालत नाही. उलटपक्षी मायाच त्याला पदोपदी सुख-दुःख भोगायला भाग पाडत असते. साधक जेंव्हा पशुभावाने उपासना करत असतो तेंव्हा त्याचे उद्दिष्ठ केवळ भौतिक सुखांची प्राप्ती एवढेच असते. काही ना काही काम्य इच्छा मनात धरून तो साधनारत होत असतो. माया ही फार फसवी असते. अगदी वर्षोनवर्षे साधनारत असलेल्या कुंडलिनी जागृत झालेल्या साधकांना सुद्धा ती हातोहात फसवते. परिणामी साधक पशुभावातच मग्न रहातो.

देवतेची उपासना करतांना साधक जर दृढ निश्चयी असेल, शरीर-मनावर ताबा मिळवलेला असेल तर तो वीरभावाने साधना करू शकतो. वीरभाव म्हणजे जणू एखाद्या योद्ध्याचा भाव. प्रचंड आत्मविश्वास आणि दृढ निष्ठा अशा साधकाच्या रोमारोमात भिनलेली असते. अनेक वर्षांच्या तपःश्चर्येद्वारे तावून-सुलाखून साधक जेंव्हा तयार होतो तेंव्हा त्याच्या मनात वीरभाव संचारतो. अशा साधकाचा काही अंशी प्रकृतीवर ताबा चालत असतो. अर्थात अध्यात्ममार्गातील ही एक उच्च अवस्था आहे.

साधकाच्या आयुष्यात एक दिवस असा उगवतो की तो आपल्या इष्ट दैवतेशी तादात्म्य पावतो. जणू एकरूप होते. "सोहं" ची अनुभूती त्याला मिळू लागते. प्रकृतीवर त्याचा अत्याधिक ताबा चालू लागतो. आपल्या उपास्य दैवतेशी तादात्म्य होण्याची ही अवस्था म्हणजे दिव्यभाव. प्रकृतीवर पूर्णपणे जय मिळवणे ही काही सोपी गोष्ट नाही. ही फार उच्च कोटीची अवस्था आहे.

येथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की पशुभाव, वीरभाव आणि दिव्यभाव ह्यांच्या काही स्पष्ट सीमारेषा नाहीत. ज्याप्रमाणे सूर्योदयाच्या वेळेस अंधार ते प्रकाश हे परिवर्तन एकदम होत नाही तर क्रमशः होते त्याचप्रमाणे साधक एका भावातून दुसऱ्या भावात एकदम प्रवेश करत नाही. प्रत्येक भावात अनेक वर्षे साधनारत राहिल्यावर त्याला पुढे सरकण्याची शक्ती प्राप्त होत असते.

आता खरा महत्वाचा भाग. कोणत्या साधना कोणत्या भावाने करायच्या याचेही अध्यात्मशास्त्रात काही नियम आहेत. हे नियम पाळून साधना केली तर उत्तम फळ मिळते. अन्यथा फळ मिळत नाही किंवा अत्यल्प मिळते. मंत्र-स्तोत्र इत्यादी उपासनांच्या बाबतीत निदान थोडेतरी कळू शकते की कोणता भाव आवश्यक आहे. योगक्रियांच्या बाबतीत हे कळणे एवढे सोपे नाही नाही. एक उदाहरण देतो म्हणजे समजेल मला काय सांगायचय ते.

हठयोगात अनेक मुद्रा महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. मूलबंध, उद्डीयान बंध, जालंधर बंध, महामुद्रा, महावेध, महाबंध, खेचरी, शक्तीचालिनी, शांभवी, उन्मनी, योनिमुद्रा वगैरे मुद्रांचा त्यात समावेश होतो. येथे साधकाची कसोटी लागते. यांतील कोणती मुद्रा पशुभावानी करायची, कोणती वीरभावाने आणि कोणती दिव्यभावाने हे त्याला माहित असले पाहिजे. त्या-त्या भावानुसंधानासहित केलेल्या मुद्रेची फलप्राप्ती काय हे त्याला माहित असले पाहिजे. कोणत्या मुद्रेचा आणि भावाचा संबंध कोणत्या चक्राशी आहे हे ही त्याला माहित असावे लागते. कोणत्या भावाचा अवलंब कधी करायचा आणि कधी नाही हे ही माहिती असावे लागते. कुंडलिनी जागृत झाल्यावर अनुक्रमे पशु-वीर-दिव्य भावांच्या भूमिकांवर कसे अग्रेसर व्हायचे हे त्याला माहित असले पाहिजे. नाहीतर वर्षोनवर्षे तो योगाभ्यास करत रहातो पण म्हणावे तसे फळ काही त्याला मिळत नाही.

प्राचीन योगग्रंथांत याविषयी कोठेही स्पष्ट उल्लेख नाही. या विषयातील गुंतागुंत, बारकावे, खाचाखोचा आणि दुरुपयोग होण्याची शक्यता लक्षात घेता प्राचीन काळच्या योग्यांनी बहुदा हा विषय गोपनीय राखणे पसंत केले असावे. या गोपनीयतेचा आदर राखत येथे अधिक विस्ताराने काही विषद करत नाही. ह्या सगळ्याचा थोडक्यात निर्देश अशासाठी केला की त्यामुळे कुंडलिनी योग किती गहन आहे ते साधकांना लक्षात यावे. जर कधी असं वाटलं की अरे आपण बरीच वर्षे योगसाधना करतोय पण अपेक्षित फायदा झाला नाही, तर अन्य गोष्टींबरोबर हे ही तपासून पहा की आपली साधनाभूमी कोणत्या भावावर आधारित आहे. आपल्या साधना / उपासना आणि त्या करतांना आवश्यक असणारा भाव याचा मेळ बसतोय की नाही. असे आत्मपरीक्षण केल्यावर तुमचं तुम्हाला आपसूक कळेल की कोणत्या गोष्टींत सुधारणा करणे आवश्यक आहे.

असो.

सर्व योगाभ्यासी वाचक एक दिवस पशुभावातून वीरभावात आणि वीरभावातून दिव्यभावात प्रवेश करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 12 August 2019