Untitled 1

"जो ना करे राम वो करे किनाराम"

मागे एका खंड योग विषयक लेखात मी किनाराम अघोरीचा उल्लेख केला होता. आज या छोट्याशा पोस्टद्वारे त्याच्याविषयी काही सांगतो.

इ. स. १६०० च्या सुमारास किनाराम नामक एक अघोरी साधू होऊन गेला. बाबा किनारामनी रामगढ़, क्रीं कुण्ड, वाराणसी, देवल, गाजीपुर अशा अनेक ठिकाणी अघोरपीठांची स्थापना केली. परमेश्वराची किमया बघा! व्यक्ती तितक्या प्रकृती या तत्वानुसार परमेश्वराने भिन्न-भिन्न अध्यात्ममार्ग प्रचालीत केले आहेत. त्यापैकी योग हा कर्मकांडरहित आणि प्रामुख्याने शरीर-मनाच्या सहाय्याने आचरण्याचा मार्ग आहे. योगसाधनेने शंकराच्या शुद्ध निरंजन स्वरूपाला जाणून घेतले जाते. या उलट अघोर मार्ग हा शंकराच्या अघोर स्वरूपाला जाणण्याचा मार्ग आहे. या मार्गाच्या अनुयायांचं असं म्हणणं असतं की शुद्ध आणि अशुद्ध हा मानव निर्मित भेद असल्याने त्यांचा मार्गही शेवटी शिवत्वाकडेच जातो. असो. त्या मार्गाच्या तात्विक बैठकीकडे जाण्याचे आपल्याला काही प्रयोजन नाही. 

नाथ संप्रदायातील सिद्ध हे जरी प्रामुख्याने योगमार्गी असले तरी त्यांचा अन्य मार्गांच्या साधकांशी जवळचा संबंध येत असे. विशेषतः मच्छिंदनाथ आणि गोरक्षनाथ अनेक कौल सिद्धांच्या संपर्कात असत. त्यात परत गोरक्षनाथांचा दबदबा एवढा होता की अन्य मार्गांचे साधकही नाथ सिद्धांना फार मानत असत. बाबा किनाराम आणि नाथ संप्रदाय यांचा थेट संबंध जरी नसला तरी त्यांच्या उपास्य दैवातांमध्ये बरेच साधर्म्य आहे.

अघोर पंथीयांचे उपास्य दैवत अघोरेश्वर अर्थात भगवान शंकराचे अघोर स्वरूप हे आहे. नाथ संप्रदाय हा मूलतः शैव मताचा पंथ आहे. शिव आणि त्याची विविध रूपे नाथ पंथियांनाही प्रिय आहेत. किनाराम हा केवळ अघोरेश्वराचा उपासकच नव्हता तर त्याच्या अनुयायांच्या मते शिवाचा अवतार होता.  

बाबा किनारामच्या बाबतीत असं म्हणतात की त्यांनी हिंगलाज देवीची उपासना केली होती. देवीने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले आणि वाराणशी स्थित क्रीं कुंड निर्माण करण्याची प्रेरणा दिली. नाथ संप्रदायाच्या काही उपशाखांमध्ये हिंगलाज देवी फार महत्वाची मानली जाते. तिची सविस्तर उपासना पद्धती त्या उपशाखांमध्ये प्रचलित आहे. किनारामने निर्माण केलेले हे कुंड आजही लोकप्रिय आहे.

नाथ संप्रदायात दातात्रेय अवधुतांना अढळ स्थान आहे. असं म्हणतात की बाबा किनाराम गिरनार पर्वतावर गेले असता त्यांना दत्तात्रेय प्रसन्न झाले. दत्तात्रेयांनी किनारामची कठोर परिक्षा घेतली आणि नंतर त्यांना उपदेश दिला.

भारतातल्या सिद्ध पुरुषांविषयी आणि त्यांच्या चमत्कारांविषयी जशा विलक्षण कथा-दंतकथा जनमानसात प्रचलित असतात तशाच त्या बाबा किनाराम विषयी सुद्धा आहेत. त्यांतील खऱ्या कोणत्या आणि निव्वळ कल्पनाविलास कोणता हे आज तपासून पाहणे कठीण आहे. पण या कथा-दंतकथा किनारामाच्या उच्च कोटीची चुणूक दाखवतात. त्यांतील काही खालील प्रमाणे :

  • किनारामचा जन्म इ.स. १६०१ मध्ये झाला आणि इ.स. १७७२ मध्ये त्यांनी जड देह ठेवला. याचाच अर्थ ते सुमारे १७० वर्ष जगले.
  • ते लहान असतांना त्यांच्या गुरुनी परिक्षा घेण्यासाठी त्यांना गंगेतून मासा पकडून आणायला सांगितला. किनाराम गंगेच्या पात्रात गेला आणि आपला हात पुढे केला. नदीच्या पात्रातून एक मासा आपोआप त्यांच्या हातावर पडला. तो मासा घेऊन ते गुरूजवळ आले. गुरुनी त्यांना आता मला भूक नाही त्याला परत सोड असं सांगितलं. पाण्यातून बाहेर काढल्याने मासा मेला होता. किनारामने त्याला गंगेच्या पाण्यात सोडताच तो परत जिवंत झाला.
  • एकदा गंगेच्या पात्रातून एक शव वाहात येत होतं.  किनारामने त्या प्रेताकडे बोट करून त्याला बोलावले. आश्चर्य म्हणजे ते प्रेत सजीव होऊन चालत किनाराम जवळ आले.
  • क्रीं कुंड परिसरात त्यांनी आपले बस्तान बसवले आणि अनेक दिनदुबळ्या लोकांना अनेक प्रकारे मदत केली. या कुंडाच्या पाण्यात रोग निर्मुलन करण्याची शक्ती आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.
  • एकदा एक स्त्री संत तुलसीदासांकडे गेली. आपली काही सांसारिक व्यथा त्यांना सांगून मदतीची याचना केली. ती स्त्री जे मागत होती ते तिच्या नशिबी नव्हतेच. जर आडातच नसेल तर पोहोऱ्यात कुठून येणार हे अंतर्ज्ञानाने जाणून तुलसीदासांनी मदत करण्यात असमर्थता दर्शविली. त्या स्त्रीनी आशा सोडली नाही. एक दिवस ती किनाराम बाबांकडे गेली. त्यांनी तिला आशीर्वाद दिले आणि आश्चर्य म्हणजे काहीच काळात तिच्या मनाप्रमाणे घडून आले. जेंव्हा संत तुलसीदासांना ही गोष्ट समजली तेंव्हा त्यांना खुप नवल वाटले. ते किनाराम बाबांना भेटायला गेले आणि त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले. बाबा किनाराम हसून म्हणाले - "जो ना करे राम वो करे किनाराम".

असो. "अलख" आणि "निरंजन" शिवस्वरुपाची अभिलाषा असणाऱ्या योगसाधकांनी अन्य मार्गांच्या साधनापद्धती स्वीकारण्याची काहीच गरज नाही. परंतु त्या-त्या मार्गावरील सिद्ध पुरुषांचे आचरण, चिकाटी, श्रद्धा आणि भक्ती अशा गुणांपासून प्रेरणा घ्यायला काहीच हरकत नाही.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 22 February 2016


Tags : योग अध्यात्म शिव नाथ

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates