Get initiated into Ajapa Dhyana and Kriya. Online guidance and initiation sessions for selected individuals and small groups by Bipin Joshi. More details here.

शिवनामाचा महिमा

हठयोग्यांना नाना प्राणायाम, बन्ध, मुद्रा करूनही सदाशिवाचे नखसुद्धा दृष्टीस पडत नाही. नेति नेति करणार्‍या कोरड्या वेदांत्यांनाही त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे ज्याला शोधून शोधून थकली. असा हा भोळा सांब सदाशिव सापडतो भक्ताच्या हृदयात. खर्‍या भक्ताला सोडून तो जाता जात नाही. त्याची रहायची जागा भक्तीच्या मुलाम्याने लिंपलेली असावी लागते. हार तुर्‍यांकडे तो ढुंकुन देखील पहात नाही. भक्ताचा भाव हीच काय ती पहायची गोष्ट त्याला ठावूक आहे. श्रीमंती त्याला विकत घेऊ शकत नाही. त्या श्रीकर नामक गोपबाळाने त्याची पुजा केली. कशाने तर दगड माती यांनी आणि हा थेट त्याच्यापुढे आशिर्वाद द्यायला प्रगट झाला. भक्त दिसला की मग त्याच्याने राहवतच नाही. मग तो भक्त कसाही असो. त्याला प्राप्त करायचे असेल तर योगसाधनेला भक्तीरसात ओथंबून काढले पाहिजे आणि त्यासाठी नामस्मरण हा सोपा मार्ग आहे. 'शब्दां'चा मारा केला की देव 'काकुळती'ला आलाच पाहिजे हा महाराष्ट्रातील संतपरंपरेने सर्वांना सांगितलेला सिद्धांत आहे. नामाचा जप हाच पुढे सोहंरूपी अजप कसा बनतो ही अनुभवाची गोष्ट आहे. संतांच्या या शिकवणीचे अनुसरण करत सामान्य जीवही तरून जातो मग योगसाधक तरला जाणार नाही हे शक्य तरी आहे का?

शिवशंकराच्या सर्व मंत्रांत श्रेष्ठ आणि सर्वात अधिक प्रचलित असलेला मंत्र म्हणजे पंचाक्षर मंत्र. पंचाक्षर मंत्र एवढा प्रसिद्ध आहे की तो सांगण्याची गरजच नाही. या मंत्राचे महात्म्य आणि श्रेष्ठत्व प्रसिद्ध शिवभक्त उपमन्युने श्रीकृष्णाला शिवपुराणात विस्ताराने सांगितले आहे. शिव-पार्वती संवादरूपाने ते शिवपूराणाच्या वायवीय संहितेमध्ये आलेले आहे. आपणही ते जाणून घेण्याचा प्रयत्न येथे करणार आहोत...

पार्वती शंकराला म्हणाली, "महेश्वर! कलुषित अशा कलियुगात जेव्हा सारा संसार धर्मापासून विन्मुख होईल, पापरूपी अंधाराने ग्रासला जाईल, वर्ण आणि आश्रम व्यवस्था नष्ट होईल, धर्मसंकटे उपस्थित होतील, गुरू-शिष्य परंपरा नामशेष होण्याचा मार्गावर लागेल अशा वेळी साधक कोणत्या उपायाने मुक्ती प्राप्त करू शकेल?"

शंकर उत्तरला, "देवि! कलियुगात मनुष्य माझ्या पंचाक्षरी विद्येचा आश्रय घेऊन माझी भक्तीपूर्वक सेवा करून संसार बंधनातून मुक्त होईल. मानसिक, वाचिक आणि शारीरिक दोषांनी युक्त, कृतघ्न, निर्दय, कपटी, लोभी माणसांनीसुद्धा जर माझी भक्ती करत पंचाक्षरी मंत्राचा जप केला तर त्यांच्यासाठीसुद्धा ही विद्या तारक ठरेल. मी वारंवार प्रतिज्ञापूर्वक हे सांगितले आहे की भुतलावरील माझा अत्यंत पतित भक्तसुद्धा पंचाक्षरी विद्येद्वारा मुक्त होऊ शकतो."

यावर देवि विचारती झाली, "शास्त्र असे सांगते की जर मनुष्य पापी असेल तर त्याचे कर्म त्याला नरकप्राप्तीच करून देते. अशा स्थितीत पंचाक्षरी विद्येद्वारा तो मुक्त कसा होईल?"

शंकर म्हणाला, "देवि! ही तु फार चांगली गोष्ट विचारलीस. नीट ऐक. पूर्वी मी हा विषय अत्यंत गूढ असल्याने प्रगट केला नव्हता. जर पापी मनुष्य मोहवश अन्य कुठल्या मंत्राचा जप करेल तर तो आपल्या कर्मांनुसार निःसंदेहपणे नरकातच जाईल. पण पंचाक्षर मंत्राला हे बंधन नाही. जे केवळ जलपान करून वा वायू भक्षण करून तप करतात, नाना व्रतांद्वारे आपले शरीर सुकवतात त्यांना शिवलोकाची प्राप्ती दुर्लभ आहे (व्रतं यम-नियमांचा एक अविभाज्य घटक असली तरी केवळ व्रतंवैकल्ये करून शिवप्राप्ती होत नाही असा अर्थ). पण जे भक्तीपूर्वक पंचाक्षर मंत्रासहित माझे पुजन करतात ते या मंत्राच्या सामर्थ्याने माझ्या लोकात पोहोचतात. म्हणून तप, व्रत, यज्ञ इत्यादी गोष्टी पंचाक्षर मंत्रासहित केलेल्या माझ्या पूजनापूढे तुच्छ ठरतात. जो साधक, मग तो पुण्यवान असो वा पापी, माझे पंचाक्षर मंत्रासहित पूज केल्याने मुक्तच होतो. साधकाने कामक्रोध आवरून या मंत्राचा जप करावा. मंत्र दीक्षा घेतलेला साधक मंत्र दीक्षा न घेतल्या साधकापेक्षा कोटी-कोटी पट श्रेष्ठ आहे. म्हणून गुरूकडून दीक्षा घेऊन मगच हा मंत्र जपावा. जो असे करतो तो माझ्या समान होतो. या विषयी अधिक बोलून काय लाभ? माझ्या पंचाक्षर मंत्रात सर्व प्रकारच्या भक्तांचा अधिकार आहे. पंचाक्षर मंत्राच्या प्रभावानेच वेद, महर्षि, सनातनधर्म, देवता आणि हे चराचर जगत टिकून आहे.

देवि! प्रलयकाळी जेव्हा सारे जग लय पावते आणि हा सारा प्रपंच प्रकृतिमध्ये लीन होतो तेव्हा मी एकटाच शिल्लक राहतो. त्यावेळी समस्त देवता आणि शास्त्रे पंचाक्षर मंत्रात सुप्तावस्थेत राहतात. मग पुन्हा माझ्यापासून प्रकृति आणि पुरुष यांच्यासह ही सृष्टी निर्माण होते.

देवि! ज्याची जशी कुवत असेल, ज्याला जेवढा वेळ मिळेल, ज्याची जशी बुद्धी, शक्ती, संपत्ति, उत्साह आणि पात्रता असेल त्याने त्याप्रमाणे माझी पुजा आणि जप केला तर त्याला मोक्ष अवश्य प्राप्त होतो. सुंदरी! माझ्यामधे मन लावून साधक जे काही करेल (चांगले अथवा वाईट) ते मला प्रिय आहे. परंतू त्याने लोकाचरणार्थ बनविलेल्या नियमांचे पालन अवश्य केले पाहिजे.

साधकाने प्रथम तत्ववेत्ता आचार्य, जपशील, सद्गुणसम्पन्न आणि ध्यानयोगपरायण अशा गुरूला शरण जावे. त्यानंतर गुरूला मंत्र देण्याविषयी विनंती करावी. गुरूप्रदत्त मंत्र आणि ज्ञान ग्रहण करावे. मंत्र सुसिद्ध, सिद्ध आणि साध्य अशा तीन प्रकारचा असतो. सिद्ध गुरूकडून प्राप्त झालेला मंत्राला सुसिद्ध म्हणतात, जो गुरू अजून सिद्ध नाही त्याच्याकडून घेतलेल्या मंत्राला सिद्ध मंत्र म्हणतात. जो मंत्र गुरूकडून न घेता केवळ पारंपारीक माहितीच्या आधारे (पुस्तके वगैरे) जपला जातो त्याला साध्य मंत्र म्हणतात. (साध्य मंत्र सिद्ध आणि सुसिद्ध मंत्रापेक्षा कनिष्ठ मानला जातो. म्हणूनच त्याला 'साधकाला स्वप्रयत्नाने साध्य करावा लागणारा' अर्थात 'साध्य' असे म्हणतात. सिद्ध आणि सुसिद्ध हे गुरूद्वारे चैतन्य जागृत करून देण्यात आलेले असल्याने श्रेष्ठ असतात.) 

गुरूमुखातून मंत्र प्राप्त झाल्यानंतर रोज न चुकता ठरावीक संख्येने जप करावा. कमीतकमी 1008 एवढा जप तरी करावाच. जो असे करतो तो परम गति प्राप्त करतो. मंत्रात जेवढी अक्षरे असतील त्यांच्या चौपट संख्येने जप केल्यास एक पुनश्चरण होते. जो पुनश्चरण करून मग नित्य जप करतो त्यासारखा पुण्यवान जगात दुसरा कोणीही नाही.

साधकाने पवित्र ठिकाणी स्नान करून माझे, तुझे (पार्वतीचे) आणि गुरूंचे ध्यान करावे. उत्तर अथवा पूर्व दिशेला तोंड करोन आसनस्थ व्हावे. एकाग्र चित्ताने न्याससहित जप करावा. मानस जप उत्तम प्रतीचा आहे, उपांशु जप मध्यम तर वाचिक जप कनिष्ठ प्रतीचा मानला जातो. मोठ्याने जप करणे म्हणजे वाचिक जप होय. यामधे केवळॅ ओठ आणि जीभ हलते आणि अगदी अस्पष्ट असा ध्वनी येतो तो उपांशू जप होय. ज्यावेळी मंत्र मनातल्या मनातच उच्चारला जातो त्या वेळी तो मानस जप म्हटला जातो. वाचिक एक पटच फळ देतो. उपांशु जप शम्भरपट तर मानसिक जप हजारपट अधिक फलदायी असतो. सगर्भ जपाचे फळ मानस जपापेक्षा हजारोपट अधिक असते. सगर्भ जप म्हणजे प्राणायामपूर्वक केला गेलेला जप. सगर्भ जपापेक्षा ध्यानासहित केला जाणारा जप सहस्रपटींनी अधिक फळ देतो.

आसनाशिवाय, झोपून, चालताना, बोलताना, उभे राहून जप करू नये (हा नियम मुख्यतः पुनश्चरणाला लागू आहे. नामस्मरणाला नाही). रस्त्यावर वा उघड्या जागेत, अपवित्र ठिकाणी, अंधारात जप करू नये. चिंतामग्न असताना जप करू नये. वरील नियमांचे शक्य तेवढे पालन करावे. शक्य नसल्यास जेवढे शक्य आहे तेवढे करावे.

देवि! ज्याची माझ्यावर, माझ्या मंत्रावर आणि आपल्या गुरूंवर श्रद्धा असते त्याने केलेला जप कधीही निष्फळ जात नाही. म्हणून अन्य विघ्नयुक्त मंत्रांचा त्याग करून विद्वान पुरुषांनी साधात परमविद्या असलेल्या पंचाक्षरी मंत्राचा आश्रय घ्यावा. दुसर्‍या मंतांच्या सिद्ध होण्याने पंचाक्षरी सिद्ध होत नाही. परंतु पंचाक्षरी सिद्ध झाल्याने इतर सर्व मंत्र सिद्ध होतात. ज्याप्रमाणे अन्य देवांची भक्ती केल्याने ते ते देव प्राप्त होतात पण मी प्राप्त होत नाही पण माझी प्राप्ती केल्यावर मात्र सर्व देव प्राप्त होतात त्याचप्रमाणे पंचाक्षरी मंत्राचेही आहे. अन्य मंत्रांत जे दोष संभवतात ते यात नाहीत. परंतु छोट्या छोट्या तुच्छ फलांसाठी हा मंत्र वापरू नये कारण हा मंत्र महान फळ देणारा आहे."

तर असा हा शिव पंचाक्षर मंत्र. शिव या नावाचा अर्थच मुळात शुभ, मंगलकारी, कल्याणकारी असा आहे. सर्व पापांचा नाश करणारी अशी ही दोन अक्षरे जेव्हा नमन भावाने जपली जातात तेव्हा साधकाला मोक्ष प्रदान करतात. उगाच नाही पद्मपुराण सांगत -

अशुचिर्वा शुचिर्वापि सर्वकालेषु सर्वदा।
नामसंस्मरणादेव संसारान्मुच्यते क्षणात॥

जो मनुष्य पवित्र वा अपवित्र असा विचार न करता सदा-सर्वदा नामस्मरणात दंग रहातो तो लवकरच संसार सागरातून तरून जातो अर्थात मुक्त होतो.

नामस्मरणाबद्दल अनेकदा अशी तक्रार एकायला मिळते की आम्ही अनेक वर्षे नामजप केला पण काही फायदा झाला नाही. असे होण्यास खालील कारणे असू शकतात:

  • नामजप कसा करावा याचेही एक शास्त्र आहे. केवळ माळा ओढणे म्हणजे जप नव्हे. हे शास्त्र आपापल्या गुरूकडून किंवा ज्यावर विश्वास आहे अशा तज्ञाकडून नीट समजावून घ्यावे.
  • केवळ पुस्तकांत वाचून वा CD / DVD द्वारे ऐकून मंत्र जप केल्यास तो मंत्र 'साध्य' मंत्र असतो हे लक्षात घ्यावे. त्यामुळे फायदा होण्यास बराच वेळ लागू शकतो.
  • आपली पूर्वकर्मे आणि या आयुष्यातील कर्मे या कामी अडथळा आणू शकतात. एकीकडे मंत्र शुद्धी करत असतो तर दुसरीकडे साधक वाईट संस्कारांची पुटे च्या पुटे मनावर चढवत असतो.

वरील पैकी पहिल्या मुद्द्याविषयी विस्ताराने लिहिण्याची ही जागा नाही. उरलेल्या दोन मुद्द्यांचे महत्व नीट कळावे म्हणून दोन छोट्या गोष्टी सांगतो.

एकदा एक साधक तपश्चर्येला बसला. अनेक महिने त्याची कठीण तपस्या चालू होती. त्याचे तप पाहून जवळच्याच एका आश्रमात राहणारे ऋषीश्वर प्रसन्न झाले. त्याच्या जवळ जाऊन म्हणाले, "बाळा! तु का बरे तप करत आहेस? तुझी तपस्या पाहून मी प्रसन्न झालो आहे. काही इच्छा असेल तर माग." त्यावर तो साधक म्हणाला, "मुनीवर! मला अशी शक्ती द्या की मी स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वीवर कोठेही क्षणात अवकाश गमन करू शकेन." यावर ऋषींनी त्याच्या उपरण्याला एक बेलाचे पान बांधले ज्यावर त्यांनी काही मंत्र लिहिला होता. ते पान आणि मंत्र जोवर आहे तोवर त्याला अवकाश भ्रमण करता येईल असा आशिर्वाद दिला. साधक आनन्दी झाला. असे अनेक महिने लोटले. एकदा त्या साधकाने कुतुहल म्हणून आपल्या उपरण्याची गाठ सोडली आणि ते बेलाचे पान पाहिले. त्या पानावर गन्धाने 'ॐ श्रीराम' असे लिहेलेले होते. तो साधक स्वतःशीच हसला. म्हणाला, "मी पण काय मूर्ख आहे! हा मंत्र तर मला माहित होता. उगाचच मी तप केले अन त्या ऋषींकडून वर घेतला." अनेक दिवस झाल्यामुळे ते बेलाचे पान जीर्ण झाले होते. साधकाने ते नदीत फेकून दिले. एका नव्या बेलाच्या पानावर स्वतःच गन्धाने 'ॐ श्रीराम' असे लिहिले आणि ते पान उपरण्यात बांधले. पण कसचे काय! त्याला पूर्वीसारखे अवकाश भ्रमण काही करता येईना. तो परत त्या ऋषींकडे गेला. हात जोडून त्याने घडला प्रसंग सांगितला. त्यावर ते ऋषी म्हणाले, "मुर्खा! मी तुला मंत्र चैतन्याने भारून ते बेलाचे पान दिले होते. तु अजाणतेपणी माझ्या मंत्राचा अपमान केलास. आता मी पुन्हा काही ते पान देऊ शकणार नाही." तो साधक पश्चात्ताप करत, स्वतःला दोष देत परत तपश्चर्येला बसला. साधकाला नेहमी गुरूमुखातून नाम घ्यावे असे सांगण्यात येते ते या कारणासाठी.

आता दुसरी गोष्ट सांगतो. एकदा एक गायत्री उपासक गायत्री पुनश्चरण करावयास बसला. तो संसारी होता तेव्हा काही सांसारीक इच्छा मनात धरून त्याने पुनश्चरण आरंभले. पुनश्चरण पूर्ण करूनही त्याला कोणताही फायदा झाला नाही. उलट पक्षी आयुष्यात काही वाईट घटनाच अनुभवास आल्या. आपल्या कडून काही चुकले असेल अशी कल्पना करून त्याने परत पुनश्चरण करण्याचे ठरवले. दुसरे पुनश्चरण केल्यानंतरही त्याला कोणताच फायदा झाला नाही. संकट येतच होती. न कंटाळता त्याने एका पाठी एक अशी तेवीस पुनश्चरणे केली. परंतू गायत्रीचे दर्शन तर सोडाच पण साध्या साध्या इच्छाही पूर्ण झाल्या नाहीत. शेवटी तो संसाराला आणि कटकटींना वैतागला. त्याने काशीला जावून सन्यास घेतला. गायत्री उपासनेची आवड अजुनही त्याच्या मनात टोकून होती. त्याने चोवीसावे पुनश्चरण करण्यास प्रारंभ केला. पुनश्चरण पूर्ण झाले आणि काय आश्चर्य! गायत्री माता त्याच्या समोर प्रगट झाली. "काय हवे ते माग" असे म्हणाली. त्यावर त्या साधकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो म्हणाला, "माते! आज मी सन्यास घेतलाय. मला आता काही नको. पण मला एक सांग मला जेव्हा गरज होती तेव्हा तु का आली नाहीस. माझ्या इच्छा पूर्ण का केल्या नाहीस?" स्मित हास्य करत देवि उत्तरली, "बाळा! तुम्ही माणसं केवळ एकाच जन्माचा विचार करता. हे बघ." असे म्हणत देवीने आपली बोटे त्याच्या डोळ्यांवर ठेवली. साधकाला असे दिसले की तेवीस पर्वत भस्म होऊन पडले आहेत. देवी पुढे म्हणाली, "तु पहिले पुनश्चरण पूर्ण केल्यानंतर मी तुझ्याकडे येण्यास निघाले होते. तुझ्या पूर्वजन्मीच्या पापांचे पर्वत एवढे होते की मला वाटच मिळेना. एकेका अनुष्ठानानंतर पापांचा एक एक पर्वत मी दग्ध करत होते. ज्यावेळी तु सन्यास घेऊन निष्काम बुद्धीने अनुष्ठान केलेस तेव्हा तुझी उरलेली पापेही जळून गेली आणि मला तुझ्याकडे येता आले."

तात्पर्य हे की गुरूमुखातून नाम जरी घेतले तरी प्रत्येक साधकाच्या कर्मसंचयानुसार ते फलित होते. कोणाला त्वरीत अनुभव येईल तर कोणाला सारे आयुष्य घालवावे लागेल. जरी एखाद्याला काही आध्यात्मिक अनुभव आले नाहीत तरी त्याने हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की योग्य प्रकारे केलेले नामस्मरण आतल्याआत सुक्ष्म स्तरावर संस्कारक्षय करत असतेच. ज्याप्रमाणे पाण्याचे तापमान 100 डिग़्री झाले की त्याला उकळी फुटतेच त्याचप्रमाणे योग्य वेळ आली की आध्यत्मिक प्रगती होतेच होते. महत्वाचे आहे ते न कंटाळता, श्रद्धा न सांडता साधनारत रहाणे.

या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'शिवोपासना' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या.


Posted On : 15 Aug 2010


Tags : शिव मंत्रयोग साधना लेखमाला भक्ती नाथ

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates