Untitled 1

रावण, तैलंग स्वामी आणि खंड-मंड योग

नाथ संप्रदाय, कुंडलिनी योग आणि एकूणच शैव दर्शन विस्मयकारक आणि अचंबित करणार्‍या गोष्टींनी भरलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टी ऐकवायला मित्र-मंडळीही तसेच हवेत. केवळ हौशा-गौशा लोकांबरोबर या गप्पा करण्यात मजा नाही. ज्याप्रमाणे गायकाला उत्तम जाणकार श्रोते समोर असतील तर गाण्यात आनंद मिळतो त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे साधनामार्गावरून वाटचाल करणार्‍या मित्रमंडळीं बरोबर अशा गप्पा आनंद देतात.

नुकताच असा एक योग आला. आम्ही दोन-तीन योगमित्र काही कारणाने अचानक भेटलो. बर्‍याच दिवसांनी भेटत होतो त्यामुळे रात्री गप्पांचा फड रंगणार याची खात्री होतो. भजनाची आवड असणार्‍या एकाने दत्ताच्या भजनाने सुरवात केली आणि मग गप्पा सुरू झाल्या. एकामागून एक विषय येत होते. अनुभव, गोष्टी, गमतीजमती असा मस्त सुर जुळला होता. गप्पांच्या ओघात एकाने माझ्या श्रीरामाला नाथपंथी दीक्षा या ब्लॉग पोस्टचा उल्लेख केला आणि गप्पांचा ओघ रावण आणि त्याच्या शिवभक्तीकडे वळला. मी म्हटलं - आज तुम्हाला एका वेगळ्या साधनेविषयी सांगतो...

तुम्हाला माहीत असेल की रावणाला दहा शिरं होती. अशी कथा सांगतात की रावणाने भगवान शंकराची अतिशय उग्र तपश्चर्या केली होती. तपश्चर्या करत असताना आहुति म्हणून त्याने आपले एक-एक शिर अर्पण केले. सरते शेवटी श्रीशंकराच्या आशीर्वादाने त्याला त्याची सर्व शिरं परत मिळाली. आता दहा डोक्यांचा माणूस ही कल्पना आधुनिक विद्वानांना पटणारी नाही. त्यामुळे त्यांनी रावणाच्या या दहा डोक्यांचा आपआपल्यापरीने अर्थ लावला. रावण उच्च कोटीचा ज्ञानी शिवभक्त होता हे सर्वच अभ्यासक मान्य करतात. काहींच्या मते रावणाची दहा शिरं म्हणजे चार वेद आणि सहा शास्त्रे यांचे प्रतीक अर्थात त्याच्या विद्वत्तेचे निदर्शक आहेत. काही अन्य अभ्यासकांच्या मते षडरिपू आणि मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असा हा दहांचा समुदाय म्हणजे रावणाची दहा डोकी.

रावणाच्या दहा शिरांचा अर्थ अजून एका प्रकारे लावता येईल. रावण हा उच्च कोटीचा तांत्रिक होता. अघोर तंत्र शास्त्रात शव साधना, शिव साधना, स्मशान साधना अशा अनेक चित्रविचित्र साधना आहेत. अशीच एक साधना म्हणजे खंड-मंड योग. ही अतिशय उग्र आणि कठीण साधना आहे. कलियुगात ही साधना करणारा साधक म्हणजे अतिशय दुर्मिळ गोष्ट. या साधनेत साधक आपल्या शरीराच्या अवयवांचे स्वतः तुकडे करतो (म्हणून खंड-मंड)  आणि हवन कुंडामध्ये त्यांची आहुति देतो. विस्मयाची गोष्ट म्हणजे एका दिवसात त्या साधकाचे अवयव पूर्ववत होतात (म्हणून योग) असं म्हणतात. शरीरावर जखमेची कोणतीही खूण रहात नाही. असं शक्य आहे की रावण हा तांत्रिक साधना करणारा असल्याने त्याने हा खंड-मंड योग आचारला असावा. रावण उच्च कोटीचा साधक असल्याने त्याने थेट आपले मस्तक हवन कुंडात अर्पण केले. त्याने एकदा मस्तक अर्पण केल्यावर ते त्याला परत प्राप्त झाले. अशी साधना त्याने दहा वेळा केली असावी त्यामुळे त्याला दहा शिरं आहेत असे लोक काळाच्या ओघात म्हणू लागले असावेत.

आधुनिक काळात खंड-मंड योग करणारा फारसं कोणी एकण्यात नाही. अपवाद फक्त वाराणशीच्या तैलंग स्वामीचा. हा तैलंग स्वामी म्हणजे फार भारी प्रकरण होता. असं म्हणतात की तो जवळ-जवळ दोनशेऐंशी वर्षे जगाला ( इ.स. १६०७ -१८८७ ). त्याच्या नावावर इतके चमत्कार जमा आहेत की ब्रिटीशांच्या दफ्तरातसुद्धा त्यांची नोंद आढळते. परमहंस योगानंद यांनीही आपल्या Autobiography of a Yogi मध्ये त्याचे काही चमत्कार वर्णन केले आहेत.

तैलंग स्वामीना तेलंग स्वामी किंवा त्रिलिंग स्वामी या नावानेही ओळखले जाते.  तैलंग स्वामींची एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे. सदासर्वकाळ समाधीत आणि तंद्रेमध्ये मग्न असणार्‍या तैलंग स्वामींनी एकदा प्रत्यक्ष काशी विश्वेश्वराला आपल्या मल-मुत्राने अभिषेक केला. त्याच्या या विचित्र वागण्याने मंदिराचा पुजारी खूप संतापला. त्याने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तैलंग स्वामीला हाकलून दिले. त्या दिवशी रात्री काशीच्या राजाच्या स्वप्नात स्वतः श्रीशंकर आला आणि त्याने राजाला आपल्या भक्ताला त्रास दिल्याबद्दल समज दिली.  इकडे तैलंग स्वामीच्या मल-मुत्राचे रूपांतर सोन्यात झाले.

रामकृष्ण परमहंस आणि तैलंग स्वामी यांची एकदा भेट झाली होती. त्यांच्या भेटीत ते एकमेकाशी एकही शब्द बोलले नाहीत. रामकृष्ण परमहंसांनी तैलंग स्वामीच्या हातावर हात ठेवला पण कोणी काही बोलले नाही. कल्पना करा. रामकृष्ण परमहंस काली मातेचे उच्च कोटीचे उपासक म्हणजे शक्तीचे उपासक आणि तैलंग स्वामी शिवाचे उच्च कोटीचे उपासक. या दोन महात्म्यांना, शिवा-शक्तीच्या उपासकांना शब्दांची गरजच भासली नाही. नंतर लोकांनी जेंव्हा रामकृष्ण परमहंसाना त्याबद्दल विचारले तेंव्हा ते एवढच म्हणाले की तैलंग स्वामी चालता बोलता शिवच आहे.

अशा या तैलंग स्वामींनी खंड-मंड योग केला होता असं म्हणतात. हे खरं की खोटं याविषयी खात्रीलायक माहिती उपमब्ध नसली तरी त्यांचे प्रकांड चमत्कार पहाता ते शक्य कोटीतले असू शकेल.

या खंड-मंड योगाचा एक उच्च प्रकार म्हणजे - नवखंड योग. यात साधक शरीराचे नऊ तुकडे करत असे आणि त्यांची आहुति देत असे. या असल्या साधना आज अशक्य कोटीतीलच वाटतात हे जरी खरे असले तरी त्यात कुठेतरी सूक्ष्म संकेत जाणवतात. आता हा नवखंड योग बघा. गोरक्षनाथांनी आपल्या सिद्ध-सिद्धान्त पद्धतीमध्ये योग्याच्या शरीरात "नऊ खंड" विराजमान असतात असे म्हटले आहे. आता ही नऊ खंडांची संकल्पना ही पूर्णतः भारतीय आहे. या खंडांचा आशिया खंड, आफ्रिका खंड वगैरेंशी काही संबंध नाही. प्राचीन काळी संपूर्ण हिंदुस्तान नऊ खंडांमध्ये विभागला होता. ही नऊ खंडे याप्रमाणे - भारतखंड, काश्मीरखंड, करैर्परखंड, श्रीखंड, शंखखंड, एकपाद्खंड, गांधारखंड, कैवर्तकखंड आणि महामेरुखंड. ही नऊ खंड नाथ संप्रदायाच्या "पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी" या तत्वज्ञानानुसार शरीरातच विराजमान आहेत. कदाचित नवखंड योगाचा सूक्ष्म अर्थ या नऊ खंडानी बनलेल्या शरीराचा अर्थात जड देहाचा साधनेने नाश करणे असा असू शकेल.

अशा अनेक प्रकारच्या गप्पा करता करता मध्यरात्र कधी उलटून गेली ते कळलेही नाही. शेवटी एकदाचा गप्पांना आवर घातला. तांब्यातले पाणी घटाघटा पित असताना आठवलं - अरे! किनाराम अघोरीची गोष्ट सांगायची राहूनच गेली. असो. पुढच्या वेळी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 13 April 2015


Tags : योग अध्यात्म शिव कथा