Untitled 1

कुंडलिनी जागवणारा अजपा भस्त्रिका कुंभक

गेले काही दिवस सर्वत्र कडाक्याची थंडी पडते आहे. अशा वातावरणात मनसोक्त पणे करता येईल अशा एका अद्भुत प्राणायामा विषयी मी आज विस्ताराने सांगणार आहे. हठयोगातील सूर्यभेदना सारखे काही प्राणायाम शरीरात अत्याधिक उष्णता निर्माण करतात. परिणामी ते त्रिदोषांतील पित्त दोष वाढवतात.  काही शितली / सित्कारी सारखे प्राणायाम शरीराला थंडपणा देतात. असे प्राणायाम कफ विकार वाढवत असतात. काही प्राणायाम असे आहेत की जे कफ-वात-पित्त या तिघांपैकी कोणताही विशिष्ठ दोष न वाढवता त्रिदोष समान करण्यासाठी उपयोगी पडतात. असाच एक प्राणायाम म्हणजे अजपा भस्त्रिका कुंभक.

अजपा भस्त्रिके विषयी विस्ताराने काही सांगण्यापूर्वी हे अवश्य सांगितले पाहिजे की हा प्राणायाम करण्यास इतर प्राणायामांपेक्षा अधिक ताकद लागते. त्यामुळे अशक्त किंवा सध्या कोणत्यातरी रोगाने त्रस्त असलेल्या लोकांनी हा प्राणायाम टाळावा किंवा अतिशय काळजीपूर्वक करावा. त्याचं बरोबर उच्च रक्तदाब किंवा फुफ्फुसांचा काही विकार असलेल्या लोकांनी हा प्राणायाम अतिशय काळजीपूर्वक करावा. कोणत्याही प्रकारे आवाक्याबाहेरील पूरक-रेचक-कुंभक अजिबात करू नये.

भस्त्रिका कुंभक हा योगाभ्यासी साधकांमध्ये सुपरिचित असा कुंभक प्रकार आहे. परंतु अनेक साधक भस्त्रिका योग्य प्रकारे करत नाहीत. विशेषतः त्यांतील "कुंभक" हा भाग एक तर वगळला जातो किंवा चुकीच्या प्रकारे केला जातो. तेंव्हा या लेखात विषद केलेल्या प्राचीन योगशास्त्र संमत विधीकडे नीट लक्ष द्यावे. त्या विधीत मी अजपा जपाची गुंफण कशी केलेली आहे त्याकडेही काळजीपूर्वक लक्ष द्यावे. तरच या प्राणायामाचे संपूर्ण फायदे तुम्हाला मिळू शकतील.

अजपा भस्त्रिका प्राणायाम करण्यासाठी तुम्हाला चार गोष्टी येणे आवश्यक आहे. त्या म्हणजे पद्मासन, जलद पूरक-रेचक, वायुधारण विधी अर्थात कुंभक आणि अजपा जप. मी असं गृहीत धरतोय की तुम्हाला हे चार घटक येत आहेत. सर्वसाधारणपणे यांतील पहिले तीन घटक तरी अनेक योगाभ्यासी साधकांना येत असतात. त्यामुळे त्यांविषयी आवश्यक तेवढे मोजके विवरणच खाली दिलेले आहे.

भस्त्रा या शब्दाचा अर्थ आहे भाता. या प्राणायामात साधकाची छाती लोहाराच्या भात्याप्रमाणे आत-बाहेर होते म्हणून यांचं नाव भस्त्रिका. काही नवीन साधक येथे एक चूक करतात ती अशी की या नावाप्रमाणे श्वास आत घेण्याचा आणि बाहेर सोडण्याचा विधी तर करतात परंतु त्यांतील कुंभकाचा विधी टाळतात. अनेकदा टीव्हीवर किंवा व्हिडिओं मध्ये सुद्धा हा कुंभक विधी गाळलेला आढळतो. त्या विधीशिवाय फायद्यांत कमतरता येईल हे उघड आहे.

असो. आता हा शास्त्रसंमत "भस्रा" अजपा जपा सहित कसा करायचा ते पाहू या.

सम्यक् पद्मासनं बद्ध्वा सम-ग्रीवोदरः सुधीः।
मुखं संयम्य यत्नेन प्राणं घ्राणेन रेचयेत्॥

प्रथम पद्मासनात बैठक मारावी. या प्राणायामात पूरक आणि रेचक वेगावेगाने होत असल्याने पद्मासनाची दृढ भक्कम बैठक खुप उपयोगी पडते. मेरुदंड सरळ रहातो. अन्यथा छाती आणि धड हलण्याची शक्यता असते. जर काही कारणांनी तुम्हाला पद्मासनात बसतं येत नसेल तर जे कुठले आसन निवडाल ते असे निवडा की डोके, छाती आणि धड बिलकुल हलणार नाही. पद्मासनात बसल्यावर ताठ बसायचं आहे आणि तोंड बंद ठेऊन नाकाने छातीतील सर्व हवा प्रश्वासावाटे बाहेर टाकायची आहे. हा श्वास बाहेर टाकताना मनातल्या मनात अजपा जपाच्या मुलमंत्रातील "हकार" अर्थात "हं" बीजाचा उच्चार करायचा आहे.

यथा लगति हृत्-कण्ठे कपालावधि सस्वनम्।
वेगेन पूरयेच् चापि हृत्पद्मावधि मारुतम्॥

त्यानंतर श्वास वेगाने आत ओढायचा आहे. वेग असा ठेवायचा आहे की लोहाराच्या भात्याच्या जसा एक फस-फस असा आवाज होतो तसा हलका आवाज जाणवला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट म्हणजे ही हवा "हृत्पद्म" अर्थात छातीत भरायची आहे. भस्त्रिकेत उदर श्वसन असत नाही. तर ते thoracic breathing असते. त्यामुळे श्वास आत घेतला की छाती फुलली पाहिजे आणि छातीचा पिंजरा उभारला गेला पाहिजे. लक्षात ठेवा की श्वास आत घेतांना अजपा जपातील "सः" बीजाचा मानसिक जप करायचा आहे.

पुनर् विरेचयेत् तद्वत् पूरयेच् च पुनः पुनः।
यथैव लोहकारेण भस्त्रा वेगेन चाल्यते॥

सुरवात आपण "हं" सहित प्रश्वासाने केली. त्यानंतर "सः" सहित श्वास घेतला. आता श्वास न रोखता तो पुन्हा "हं" सहित बाहेर सोडायचा आहे. पुन्हा "सः" सहित आत घ्यायचा आहे. असं न थांबता वारंवार करायचे आहे जेणेकरून तुमची छाती लोहाराच्या भात्याप्रमाणे हलेल. येथपर्यंत झाला भस्त्रिकेचा "भात्याचा" विधी.

पुढे जाण्यापूर्वी एक साधकांकडून होणारी एक गमतीशीर चूक सांगतो. काही वेळा साधक वर सांगितल्या प्रमाणे वेगावेगाने पूरक-रेचक करतात. छाती भात्याप्रमाणे हलते वगैरे. त्यांना असं जाणवतं की हाताची बोटं, ओठ, चेहरा वगैरे भागांमध्ये हलक्या हलक्या झीणझीण्या येत आहेत. त्यांना असं वाटतं की त्यांची कुंडलिनी जागृत होत आहे. पण हे असतं Hyperventilation चं लक्षण. तुमचा रेचक-पुरकाचा वेग जर चुकला तर असं होतं. तेंव्हा कोणत्याही भ्रामक समजुती खाली राहू नये.

असो. आता कुंभकाचा विधी सुरु होतो.

तथैव स्वशरीरस्थं चालयेत् पवनं धिया।
यदा श्रमो भवेद् देहे तदा सूर्येण पूरयेत्॥

आधी सांगितलेले वेगवान पूरक-रेचक किती काळ करायचे तर दमायला होई पर्यंत. त्यानंतर वेगाने होणारे पूरक-रेचक थांबवून सूर्य नाडीने अर्थात उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे आत घ्यावा. श्वास आत घेत असतांना मनातल्या मनात दीर्घ "सो" चा उच्चार करा.

येथे तुम्हाला थोडे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. योगग्रंथ "दमायला होई पर्यंत" करायला सांगतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही अगदी गलितगात्र होई पर्यंत "भाताच" चालवत बसाल. मी असं सांगेन की सुरवातीला साधारण वीस स्ट्रोकस झाले की भाता थांबवा आणि पुढच्या भागाकडे जा.

यथोदरं भवेत् पूर्णम् अनिलेन तथा लघु।
धारयेन् नासिकां मध्या-तर्जनीभ्यां विना दृढम्॥

श्वास संपूर्णपणे आत घेतला की तुम्हाला चंद्र नाडी अर्थात डावी नाकपुडी बंद करावी लागेल. अंगठा आणि अनामिका + करंगळी यांच्या सहाय्याने हे साधावे. आणि मग...

विधिवत् कुम्भकं कृत्वा रेचयेद् इडयानिलम्।

विधिवत कुंभक करावा अर्थात श्वास आत रोखून धरावा. श्वास रोखलेला असतांना ओंकाराचे ध्यान करावे. आता श्वास किती काळ रोखावा हा ज्याच्या त्याच्या क्षमतेचा प्रश्न आहे. त्या बाबतीत हटवादीपणा करून अतिरेक अजिबात करू नये. जेव्हढा झेपेल तेव्हढाच कुंभक करावा. कुंभक झाल्यावर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने रेचक करावा. रेचक करत असतांना मानसिक रुपात "हं" चा उच्चार करा. हे झालं भस्त्रिका प्राणायामाच एक आवर्तन. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर २० वेळा "हंसात्मक" भाता + सूर्य नाडीने "सो" रुपी पूरक + ओंकार ध्यानासहित कुंभक + चंद्र नाडीने "हं" रुपी रेचक हे झाले एक आवर्तन. सुरवातीला अशी एक ते तीन आवर्तने करा. हळूहळू तरबेज बनलात की हा कालावधी आणि आवर्तने वाढवू शकता.

आता भास्त्रिकेचे फायदे कोणते ते पाहू.

वात-पित्त-श्लेष्म-हरं शरीराग्नि-विवर्धनम्॥
कुण्डली बोधकं क्षिप्रं पवनं सुखदं हितम्।
ब्रह्म-नाडी-मुखे संस्थ-कफाद्य्-अर्गल-नाशनम्॥
सम्यग् गात्र-समुद्भूत-ग्रन्थि-त्रय-विभेदकम्।
विशेषेणैव कर्तव्यं भस्त्राख्यं कुम्भकं त्व् इदम्॥

भस्त्रिका हा वात, पित्त आणि कफ असे तीनही दोष नाहीसे करतो. तो शरीरातील अग्नी वृद्धींगत करतो. तो कुंडलिनी जागृत करतो. सुशुम्नेच्या मुखाशी साठलेली अशुद्धी तो नाश करतो. तो तीन ग्रंथीच्या भेदनासाठी उपयोगी आहे. त्यामुळे साधकांनी भस्त्रिकेचा अभ्यास जरूर केला पाहिजे. येथे एक गोष्ट लक्षात घ्या की भस्त्रिका त्रिदोष घालवणारा सांगितला असला तरी तो अग्नि प्रदीप्त करणारा परिणामी उष्णता वाढवणारा आहे. त्यामुळे तो कफ विकारांसाठी विशेष लाभप्रद आहे तर पित्त वाल्यांनी याचा अभ्यास मर्यादित स्वरूपात केला पाहिजे. भस्त्रिका अधिक प्रमाणात करायचा असल्यास तो हिवाळ्यात किंवा थंड हवेत करणे जास्त हितकारक आहे.

वरील विवेचना वरून तुम्हाला भास्त्रिकेचा विधी बराचसा कळला असेल. सर्व कुंडलिनी क्रीयांप्रमाणे यांतही काही गोपनीय tips and tricks आहेत. परंतु योगग्रंथांची मर्यादा राखत त्या येथे प्रकटपणे देत नाही. तुम्ही आपापल्या गुरुवर्यांकडून अथवा ज्ञानाच्या स्त्रोताकडून त्या प्राप्त कराव्यात हे उत्तम.

असो.

अशा या बहुगुणी भस्त्रिकेचा भाता योगाभ्यासी वाचकांचे अज्ञान नष्ट करून कुंडलिनी उत्थान घडविणारा ठरो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 20 January 2020