Untitled 1

हठयोगोक्त कुंडलिनी क्रियांचा क्रम आणि अजपा ध्यान

एक योगाभ्यासी साधक अनेक वर्षे योगसाधना करत होता परंतु त्यात त्याला समाधानकारक यश काही मिळत नव्हते.  एकदा त्याची शेगावच्या संत श्रीगजानन महाराजांशी भेट झाली. त्याने मोठ्या विनयाने त्यांच्याकडे योगाभ्यासात सफलता मिळावी म्हणून प्रार्थना केली. श्रीगजानन महाराज त्याला म्हणाले की अरे बाबा, योग साधणे फार कठीण गोष्ट आहे. त्यांनी त्या योगाभ्यासी साधकाला एक लाल रंगाचा दगड प्रसाद म्हणून दिला. तो योगामार्गी त्या दगडाला पूज्य मानुन त्याची पूजा-अर्चा करू लागला. त्या लाल दगडापुढेच रोज योगसाधना करण्यास त्याने सुरवात केली आणि आश्चर्य म्हणजे त्याला हळू-हळू योगमार्गात सफलता मिळत गेली. श्रीगजानन महाराजांनी त्या लाल दगडाच्या रूपाने त्या योगसाधकाच्या प्रगतीचा जणू "श्रीगणेशा" करून दिला. ईश्वरी तत्वाशी त्याचे कनेक्शन जोडून दिले.

ही गोष्ट सांगण्याचे कारण असं की आज हठयोग आणि कुंडलिनी योग सर्वत्र उपलब्ध झालेला आहे. परंतु त्यांत ठोस सफलता मिळवलेले साधक कमी आहेत. त्याचं कारण म्हणजे शारीरिक आणि मानसिक योगक्रीयांना जोवर दैवी परीसस्पर्श होत नाही तोवर त्या आध्यात्मिक प्रगती घडवून आणू शकत नाहीत. हठयोगातील आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा, नादश्रवण, ध्यान वगैरे कितीही आदळआपट करा, जर त्या प्रयत्नांना ईश्वरी अनुमोदन नसेल तर त्या योगक्रिया फळत नाहीत. आता हे ईश्वरी अनुमोदन कसे मिळवायचे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. कोणा गुरुकडे जायचे की एखाद्या चैतन्य रूपाने वास करणाऱ्या सत्पुरुषाच्या भक्तीच्या जोरावर ते साधायचे की स्वप्रयत्नाने इष्ट दैवतेला प्रसन्न करून ते मिळवायचे हा शेवटी व्यक्तिगत श्रद्धेचा विषय आहे. कोणत्या का स्वरूपात होईना योगाभ्यासी साधकाने ते मिळवण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. हठयोगाचे ग्रंथ सांगतात की -

सुप्ता गुरुप्रसादेन यदा जागर्ति कुण्डली ।
तदा सर्वाणि पद्मानि भिद्यन्ते ग्रन्थयोऽपि च ॥

अर्थात सर्वसाधारणपणे सुप्तावस्थेत असलेली कुंडलिनी सद्गुरुंच्या कृपाप्रसादाने जेंव्हा जागते तेंव्हा सुषुम्ना मार्गातील सर्व पद्मांचे आणि ग्रंथींचे भेदन होते. येथे जो "गुरुप्रसाद" सांगितला आहे तो म्हणजेच वरीलपैकी कोणत्यातरी मार्गाने ईश्वरी अनुमोदन मिळणे हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. गुरुकृपा किंवा ईश्वरी कृपा हा एक भाग झाला परंतु साधकाचे स्वप्रयत्न आवश्यक असतातच. एखाद्या खाद्य पदार्थाच्या रेसिपीत प्रत्येक घटक जेंव्हा आवश्यक प्रमाणात पडतो तेंव्हाच त्तो रुचकर लागतो. अन्यथा बेचव लागतो किंवा प्रसंगी वायाही जातो. त्यामुळेच सर्व हठ ग्रंथ कुंडलिनी जागृती करता गुरुप्रसादाच्या जोडीला सम्यक स्वरूपात "मुद्राभ्यास" करण्याची आवश्यकता प्रतिपादित करतात -

तस्मासर्वप्रयत्रेन प्रबोधयितुमश्विरीम् ।
ब्रह्मरन्ध्रमुखे सुप्तां मुद्राभ्यासं समाचरेत् ॥

अर्थात सर्व प्रयत्न करून योगसाधाकाने सुप्तावस्थेतील ईश्वरी किंवा कुंडलिनीला मुद्राभ्यासाने जागे करावे. या विवेचना वरून तुम्हाला क्रियात्मक साधना आणि त्या फळण्यासाठी कोणत्यातरी "उच्च स्त्रोताशी" आवश्यक असलेले कनेक्शन या दोघांचेही महत्व समजू शकेल.

असो. आता मूळ विषयाकडे येतो. नवीन वर्ष सुरु झालेले आहे. अनेक साधक हे औचित्य साधून योगसाधनेची सुरवात करतात. योग शिकण्यासाठी पुस्तके, व्हिडिओ, इंटरनेटवरील माहिती, टीव्ही वरील कार्यक्रम, योग संस्था असे अनेकानेक मार्ग आज साधक चोखाळताना दिसतात. साधना नुकतीच सुरु केलेल्या साधकांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका असतात. त्यांतील एक प्रश्न म्हणजे हठयोगातील निरनिराळया क्रिया नक्की कोणत्या क्रमाने करायच्या. काही योगाचार्य तुम्हाला सांगतील की योगासने प्रथम करावीत आणि मग प्राणायाम करावा. तर काही अन्य योगाचार्य सांगतील की प्राणायाम प्रथम करावा आणि नंतर योगासने करावीत. ही परस्पर विरोधी मते ऐकल्या-वाचल्यावर सहाजिकच नवीन साधकाला गोंधळून जायला होते.

येथे मी माझ्या स्टुडंसना जो साधना क्रम सांगतो तो थोडक्यात देत आहे. सर्वच बारीकसारीक गोष्टी काही प्रगटपणे सांगता येणार नाहीत परंतु तुम्हाला एक स्पष्ट रूपरेषा नक्कीच समजेल. जर तुम्ही कोणा गुरुच्या वगैरे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली साधना करत असाल तर तुम्ही तुम्हाला शिकवण्यात आलेला साधना क्रम मुद्दाम बदलण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा सध्याचा क्रमच सुरु ठेवावा हे तुमच्यासाठी उत्तम राहील. जर तुम्ही कोणताही विशिष्ठ असा साधना क्रम फॉलो करत नसाल आणि त्याविषयी तुमच्या मनात संभ्रम असेल तर येथे मी देत असलेला क्रम फॉलो करू शकता. येथे साधना क्रम देतांना मी असा अजपा कुंडलिनी योग साधक गृहीत धरला आहे की जो कुंडलिनी योगशास्त्रातील सर्व घटकांचा एकाच वेळी अभ्यास करत आहे. तुमच्या व्यक्तिगत साधने नुसार तुम्ही आवश्यक तेवढेच घटक आणि त्यांचा क्रम घ्यावा.

साधनेला सुरवात करतांना प्रथम warm up exercise करून घ्यावेत हे सांगायला नको. सर्वच जण असे व्यायाम करत नाहीत. जर तुम्ही करत असाल तर मस्तपैकी शरीर मोकळं करून घ्या. त्यानंतर सूर्य ज्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून उभे रहा आणि सूर्यनमस्कार घाला. म्हणजे सकाळी पूर्वेला तोंड करायचं आणि संध्याकाली पश्चिमेला. त्यानंतर उभ्याने करायची ताडासन वगैरे सारखी योगासनं करून घ्यायची. त्यानंतर बसून करण्याची आसने जसं पश्चिमोत्तानासान उरकून घ्यायची. त्यानंतर मांडी घालून करण्याची आसने जसं पद्मासन, सिद्धासन, पर्वतासन वगैरे करून घ्यायची. त्याच्या नंतर वज्रासनात बसून करण्याची आसने जसं गोमुखासन, अर्ध-मच्छिंद्रासन, उष्ट्रासन, शशकासन वगैरे उरकून घ्यायची. ती झाल्यानंतर पोटावर झोपून करण्याची आसने जसं शलभासन, भुजंगासन वगैरे करून घ्यायची. नंतर मग पाठीवर झोपून करण्याची आसने जसं पवनमुक्तासन, उत्तानपादासन वगैरे करून घ्यावीत. सर्व योगासने झाल्यावर शवासनात विश्रांती घ्या. हा केवळ एक ढोबळ मानाने दिलेला क्रम आहे हे लक्षात घ्या. काही वेळा आपल्याला काही विशिष्ठ स्नायू समूह विशिष्ठ क्रमाने हलवावे लागतात. त्यावेळी अर्थातच हा क्रमही आवश्यकतेनुसार बदलावा लागतो.

काही लोकं योगासनांना जोडूनच मुद्राभ्यास करायला सांगतात. मी तसं सांगणार नाही. कुंडलिनी योगात मुद्रांचा एक विशिष्ठ हेतू आहे. दिसायला मुद्रा ह्या योगासनांसारख्या भासत असल्या तरी त्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. अनेकांना हा फरक माहीतच नसतो. एक उदाहरण देतो. सर्वांगासन आणि विपरीतकरणी यांमध्ये खुप साधर्म्य आहे. परंतु त्यांचा उद्देश भिन्न-भिन्न आहे. एक आहे आसन आणि दुसरी आहे मुद्रा. विपरीतकरणी मुद्रा जर फक्त एक योगासन म्हणून केली तर तिचे संपूर्ण फायदे कधीच मिळणार नाहीत. सांगायचा मुद्दा हा की मी मुद्राभ्यास आणि योगासनं यांची सरमिसळ करू नये असं सांगीन. त्यामुळे वरील क्रमात मी फक्त योगासनांचाच विचार केलेला आहे.

शवासनाने योगासनांच्या अभ्यासाची सांगता केली की मग प्राणायामाचा प्राथमिक अभ्यास करायचा. प्राणायामांत कपालभाती आणि भस्त्रिका सर्वात आधी उरकून घ्यायचे. या दोन प्राणायामांत शरीरात उर्जा येते. मरगळ नाहीशी होते. त्यामुळे नंतरचे प्राणायाम करतांना फायदा होतो. त्यानंतर अनुलोम-विलोम, नाडीशोधन, सूर्यभेद्न, चंद्रभेदन वगैरे प्राणायाम करायचे. नंतर शितली, सित्कारी सारखे प्राणायाम करावेत. त्यानंतर भ्रामरी, उद्गीथ वगैरे प्राणायाम करायचे. हा क्रम सुद्धा ढोबळ मानाने सांगितला आहे. सर्वच प्राणायाम करण्याची गरज नसते. ऋतू नुसार आणि गरजेनुसार कोणते प्राणायाम आवश्यक आहेत ते ठरवावे लागते. पण सर्वसाधारणपणे वर दिलेला क्रम उपयोगी पडतो.

मी प्राणायामाचा वरील उल्लेखलेला अभ्यास प्राथमिक म्हटला आहे कारण त्यांत फक्त प्राणायामच आहे. मुद्राभ्यासामध्ये शारीरिक स्थिती बरोबरच प्राणायाम, मंत्र आणि धारणा यांचा समावेश होतो. त्यामुळे मुद्राभ्यासाबरोबर होणारा प्राणायाम हा अधिक परिपक्व असणे गरजेचे असते. हठग्रंथांमध्ये प्रामुख्याने "दशमुद्रा" वर्णन केलेल्या आहेत. त्यांपैकी महामुद्रा, महाबंध, महावेध, मूलबंध, उडीयान बंध, जालंधर बंध, विपरीतकारणी विशेष प्रचलित आहेत. या सर्व मुद्रा करण्याची गरज नसते. यांतील काही मुद्रा नेमक्या कशा करायच्या याविषयी वेगवेगळ्या परंपरांमध्ये मतभेद आहेत. उदाहरणार्थ शक्तीचालिनी मुद्रेचे वर्णन भिन्न-भिन्न योगाग्रंथांत भिन-भिन्न प्रकारे आलेले आहे. खेचरी मुद्रेला आवश्यक असलेले जिभेचे छेदन, दोहन असे विधी आजकाल त्यांतील संभाव्य धोक्यांमुळे टाळले जातात. दशमुद्रांपैकी तीन बंध हे विशेष लोकप्रिय आहेत कारण ते प्राणायाम करतांना सुद्धा लावता येतात. परंतु महामुद्रा, महाबंध आणि महावेध सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. या मुद्रांचे विस्ताराने वर्णन येथे करत नाही. त्यांत अनेक सूक्ष्म गोष्टी आहेत आणि त्या सर्वच येथे प्रकट करता येणार नाहीत. तुम्ही तुमच्या "ज्ञानाच्या स्त्रोता" कडून त्यांविषयी सखोल माहिती घ्यावी हे उत्तम. या लेखाच्या दृष्टीने सांगायची गोष्ट म्हणजे प्राथमिक "पवनाभ्यास" झाल्यावर मग मुद्राभ्यास त्यांतील प्राणायाम-मंत्र-धारणा या घटकांसहित करावा. मुद्राभ्यास हा एकसंध न करता cycles मध्ये सुद्धा करता येतो. त्या विषयी पुन्हा कधीतरी सांगीन. योगासने केल्यानंतर काही लोकांना थकवा जाणवतो. खरंतर तसं होता कामा नये परंतु मुद्राभ्यासाच्या बाबतीत हे कटाक्षाने लक्षात ठेवावे. मुद्राभ्यास केल्यावर जर तुम्हाला थकवा वाटला तर तुमचं काहीतरी चुकत आहे असं समजावे. आपली साधना नीट काळजीपूर्वक तपासून पहावी.

आता साधना क्रमाच्या शेवटच्या घटकाकडे तुम्ही जाऊ शकता - अजपा ध्यान. खरंतर अजपा ध्यान ही एक स्वयंपूर्ण साधना आहे. फक्त अजपा ध्यानाचा अवलंब करू देखील ध्यानामार्गात उत्तम प्रगती साधता येते. परंतु त्या जोडीला जर तुम्ही हठयोगातील अन्य साधनांचा अवलंब केलात तर त्यांचा अजपा ध्यानावर सुपरिणाम होतो. विशेषतः प्राणायाम आणि मुद्राभ्यास त्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. अजपा ध्यान करण्यापूर्वी जर तुम्ही स्तोत्रे वगैरे म्हणत असाल तर ती पहिले पूर्ण करायची. त्यानंतर तुमच्या इष्टमंत्राचा जप १, ३, ५, ... माळा अशा विषम संख्येने करावा. त्यानंतर जपमाळ बाजूला ठेऊन अजपा जप, अजपा गायत्री, सोहं साधना अशा विविध नावांनी ओळखले जाणारे "हंसात्मक" अजपा ध्यान करावे. अजपा ध्यान करतांना त्यांत नभोमुद्रा / खेचरी मुद्रा / ज्ञान मुद्रा / शांभवी मुद्रा अशा ध्यानामय मुद्रांचा समावेश करता येतो. तुमची साधना किती प्रगल्भ झाली आहे त्यावर ते अवलंबून आहे. अजपा ध्यान संपल्यावर लगेच आसनावरून उठू नये. एक-दोन मिनिटे तरी मौनपणे बसून राहावे आणि नंतर आसन उचलावे.

योगसाधना करण्यासाठी उत्तम वेळ कोणती हा नवीन साधकांचा अजून एक प्रश्न असतो. योगसाधना करण्यासाठी पहाटेची / सकाळची वेळ ही सर्वोत्तम आहे. परंतु जर काही कारणांनी सकाळी योगाभ्यास करता येणार नसेल तर जेंव्हा जमेल तेंव्हा तो करावा. शेवटी साधना घडणे हे जास्त महत्वाचे आहे. शक्यतो ठरलेल्या वेळी योगसाधना करावी. सकाळच्या वेळी वातावरण शुद्ध असते. शरीर-मनही ताजेतवाने असते. त्या जोडीला अजून एक कारण आहे - डोपामिन. मानवी शरीरात निर्माण होणारे डोपामिन (Dopamine) हे रसायन माणसाची आनंदी अवस्था आणि मानसिक स्थिती किंवा मूड्स यांच्यावर परिणाम करत असते. आधुनिक विज्ञानाने डोपामिनवर सखोल अभ्यास करून हा संबंध सिद्ध केलेला आहे. तर हे डोपामिन सकाळच्या वेळी अधिक प्रमाणात तयार होत असते. तसंच व्यायामामुळे त्याच्या निर्मितीला चालना मिळत असते. त्या दृष्टीने सुद्धा सकाळचा कालावधी योगाभ्यासासाठी अधिक योग्य आहे.

ह्या छोटेखानी लेखात योगसाधनेतील सर्वच बारीक-सारीक गोष्टींचा लेखाजोखा मांडणे अशक्य आहे. आशा आहे ह्या साधना क्रमाचा उपयोग तुम्हाला स्वतःची योगसाधना आखताना होईल.

असो.

सर्व योगाभ्यासी वाचक जगदंबा कुंडलिनीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी योगमार्गावर आरूढ होवोत या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 13 January 2020